मुंबई, दि.२२: विशेष प्रतिनिधी कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ची कामे हाती घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईची थेट बदलापूरला जोडणी देण्यासाठी मेट्रो १४ मार्गिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही मेट्रो मार्गिका ३८ किमी लांबीची असून या मार्गावर एकूण १५ स्थानके असतील. ही मार्गिका कांजूरमार्ग येथून सुरू होईल. घणसोली येथे ही मार्गिका भुमिगत असेल. जवळपास ५.७ किमी मार्गिका ही ठाणे खाडीखालून जाणारी असेल. घणसोली ते बदलापुर हा मार्ग उन्नत असेल. या मार्गिकेचा ४.३८ किमी लांबीचा मार्ग हा पारसिक हिल भागातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आलेला आहे. हा डीपीआर आयआयटी मुंबईकडून तपासून घेऊन एमएमआरडीएने अंतिम केला आहे. येत्या काही महिन्यात हा डीपीआर मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची तयारी एमएमआरडीएने पूर्ण केली आहे. राज्य सरकारकडून मंजूरी मिळताच या प्रकल्पाचे काम सुरु केले जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून मंजूरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रकल्पासाठी पर्यावरण मंजूरी घेण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे. ही मेट्रो मार्गिका ठाणे खाडी आणि पारसिक हिल या संवेदनशील भागातून जाणार आहे. तसेच फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातून ही मार्गिका जाणार आहे. त्यामुळे सल्लागाराला ९ महिन्यामध्ये पर्यावरण प्रभाव अहवाल (ईआयए) तयार करावा लागेल. तसेच कांदळवन जंगल, फ्लेमिंगो अभयारण्य आणि वनविभागाच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत.