मुंबई, दि.२२ : प्रतिनिधी राज्यतील पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी आणि राज्यातील कोणत्याही भागातून गतिमान रस्ते प्रवासासाठी राज्यात विविध रस्ते प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व रस्ते प्रकल्पांची कामे गतीने हाती घेण्यासोबतच नवीन प्रकल्पांसंदर्भात प्राधान्याने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध विकास कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत विधान भवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
यात शक्तिपीठ महामार्गासह मल्टीमॉडल कॉरिडोर, नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर-चंद्रपूर एक्सप्रेसवे, भंडारा-गडचिरोली एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्गाला जोडून वाढवण-नाशिक एक्सप्रेसवे, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा विस्तार, भिवंडी-कल्याण उन्नत मार्ग इत्यादी प्रकल्पांचा समावेश होता. एमएसआरडीसीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तत्काळ पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी निधीची उभारणी करण्यात यावी. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे ₹१ लाख कोटी लागणार आहेत. कोणताही प्रकल्प मागे ठेवू नका. त्यासाठी कर्ज, बॉण्ड्स आणि सिक्युरिटायझेशन असे प्रारूप तयार करून त्याचे नियोजन करा. पण सर्व प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला सुद्धा गती द्या. नवीन प्रकल्पांसंदर्भात प्राधान्याने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.