पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या आपल्या व्यवसायाबरोबरच येवला तालुक्याला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार्या प्रवीण पहिलवान यांच्याविषयी...
अत्यंत गरीब विणकराच्या घरी जन्मलेल्या प्रवीण बाळासाहेब पहिलवान यांचे पणजोबा, आजोबा आणि वडिलांनी पैठणीलाच आपले सर्वस्व मानत आयुष्यभर पैठणी विणण्याचे काम केले. घरातून पैठणी विणण्याचे बाळकडू मिळालेल्या प्रवीण यांना पैठणी विणण्याचे काम शिकवण्याची गरज पडली नाही. कांड्या भरणे, बुट्ट्या काढण्याबरोबरच पैठणी विणकामाच्या अगोदरची छोटी-मोठी कामे प्रवीण अगदी लीलया पार पाडायचे. परंतु, विणकर क्षेत्रातून उपजीविका भागविणे शक्य नसल्याने या व्यवसायावर मोठे गंडांतर आले. परिणामी, येवल्यातून अनेक कारागिरांनी भिवंडी, सुरत येथे स्थलांतर केले. याच काळात प्रवीण यांचाही हातमाग बंद झाल्याने प्रवीण यांचे काका गुडदाणी, मसाले तयार करून आठवडे बाजारात विकू लागले. पण, इतर क्षेत्रांत मन रमत नसल्याने त्यांच्या घरच्यांनी पुन्हा विणकामाला सुरुवात केली.
पण, पैठणी तयार करणारे कारागीर कमी झाल्याने ‘येवले वाण’ म्हणून प्रसिद्ध असलेली ‘फूल किनार’, ‘चटई किनार’, ‘मोठी किनार’ अशा साड्यांचे विणकाम चालायचे. हळूहळू पैठणी तयार करण्याचा उद्योगही बाळसे धरू लागल्यानंतर अनेकजण पुन्हा पैठणी तयार करायला लागले. सुरुवातीच्या काळात येवल्यात फक्त पाच हातमाग होते. मात्र, १९८० नंतर येवला शहरात पैठणी व्यवसाय आकार घ्यायला लागल्याचे प्रवीण सांगतात. चार-पाच वर्षे पैठणीचे काम चांगले चालले की, मध्येच त्याला खीळ बसायची. त्यामुळे प्रवीण यांनी आईच्या आग्रहाखातर त्यांच्या शेजारी असलेल्या फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. फोटोग्राफी शिकत असतानाच, प्रवीण रात्रीच्या वेळी पैठणी विणण्याचे काम करायचे. फोटोग्राफीत प्राविण्य मिळविल्याने लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याने प्रवीण यांच्याकडे कामाची कमतरता नव्हती. त्यामुळे ते राजकीय व्यक्तींच्या संपर्कात येत गेले. ‘प्रेस फोटोग्राफर’ म्हणून काम केलेल्या प्रवीण यांचा फोटोग्राफी मुख्य उत्पन्नाचा स्रोत झाल्याने पैठणी व्यवसायापासून काहीसे दुरावलेल्या प्रवीण यांनाही आपण ‘पैठणी पर्यटन केंद्रा’चे व्यवस्थापक आणि ‘पैठणी क्लस्टर’चे संचालक होऊ, असे स्वप्नातही वाटले नव्हते.
दरम्यान, २००४ साली छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. फोटोग्राफीच्या माध्यमातून प्रवीण यांची भुजबळांसोबत ओळख झाली. पुढे २००९ साली प्रवीण यांच्या पत्नी ‘राजश्री येवला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँके’च्या संचालक झाल्या. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीला छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने राजश्री यांना नगरसेवकपदासाठी उभे करण्यात आले. नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या राजश्री यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. नंतर २०१२ साली छगन भुजबळ यांनी येवला शहरात ‘पैठणी क्लस्टर’ उभारण्याची संकल्पना मांडली. त्या अनुषंगाने गावातल्या काही लोकांना एकत्रित करून तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी येवला तहसील कार्यालयात बैठक घेतली. त्यामध्ये सर्वानुमते ‘पैठणी क्लस्टर’चे ‘श्री छगन भुजबळ पैठणी क्लस्टर’ हे नाव ठरवत कामाला सुरुवात केली. त्यातच छगन भुजबळ यांच्याकडे पर्यटन खात्याच्या कार्यभार असल्याने त्यांनी येवला शहरात ‘येवला पैठणी पर्यटन केंद्र’ सुरू केले. तसेच ‘डीपीडीसी’च्या माध्यमातून ६ कोटी, ५० लाख रुपयांचा निधी वापरून पर्यटन केंद्राची इमारत उभी केली. यामध्ये पैठणी खरेदी करताना ग्राहकांना चांगल्या दर्जाची पैठणी मिळावी, या उद्देशाने या ‘पैठणी क्लस्टर’ची उभारणी करण्याचा घाट घातल्याचे प्रवीण आवर्जून सांगतात.
दरम्यानच्या काळात ‘पैठणी क्लस्टर’साठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश आले असून मागच्या आठवड्यामध्ये १२ कोटींच्या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. येथे विणकरांना पैठणी तयार करण्यासाठी बंगळुरू येथून येणारा कच्चा माल स्थानिक ठिकाणी कसा निर्माण होईल, त्यासाठी एक ट्विस्टिंग मशीन घेतले जाईल. त्यासोबतच डिझाईन सेंटरही उभारले जाणार असून, हजारो डिझाईन तयार केल्या येणार आहेत. त्यामुळे पैठणींमध्ये दिसणार्या एकसारख्या डिझाईन यापुढे दिसणार नाहीत. ग्राहकांच्या पसंतीनुसार नक्षीकाम केलेली पैठणी तयार करणे शक्य होणार असल्याचे प्रवीण सांगतात. सध्या एक हातमाग दहा ते १२ फुटांची जागा व्यापतो. त्यासाठी ‘वार्फिंग सेंटर’ची उभारणी करून आठ फूट लांब आणि पाच फूट रुंद, असा हातमाग तयार केला जाणार असल्याने एका हातमागाच्या जागेत दोन बसतील. एखादा रंग तयार केला, तर पुन्हा तो तसाच तयार होईलच, याची शाश्वती देता येत नाही. त्यासाठी ‘डाय सेंटर’ची उभारणी करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने पैठणीसाठी रंग निर्माण केले जाणार असल्याचेही प्रवीण यांनी सांगितले. तसेच धागा टेस्टिंग मशीनही क्लस्टरमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा व्यवसाय येवल्यासह ८५ खेड्यांमध्ये पसरला असून १२ हजार, ३०० विणकर पैठणीनिर्माणाचे काम करत आहेत. यापुढेही अनेक विणकर निर्माण होऊन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ‘पैठणी क्लस्टर’ नावारुपाला येत आहे. प्रवीण पहिलवान यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.