हिंदू मूल्यांचा ‘ध्रुवतारा’

    22-Mar-2025
Total Views |

article on dr. shankar rao tattvawadi by gyanendra mishra
 
प्राध्यापक डॉ. शंकररावजी तत्ववादी हे एक प्रख्यात विद्वान, शिक्षक आणि समर्पित स्वयंसेवक होते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या जागतिक मोहिमेसाठी अर्पण केले. १९३३ साली जन्मलेले तत्ववादी राष्ट्रनिर्माण आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी भारतात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या मोठ्या योगदानासाठी ओळखले जात. तत्ववादी यांचे शैक्षणिक जीवन अत्यंत प्रगल्भ होते. त्यांनी नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तून ‘डॉक्टरेट’ प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी ‘टेक्सास विद्यापीठ’ (ऑस्टिन) आणि ‘कॅन्सस विद्यापीठ’ येथे ‘पोस्ट-डॉक्टोरल’ अभ्यास केला. विज्ञान, संस्कृत आणि अध्यात्म या विषयांवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे ते एक विलक्षण विद्वान नक्कीच होते.
 
संघाचे प्रचारक म्हणून तत्ववादी यांनी संघाच्या जागतिक विस्तारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखा स्थापन करण्यास मदत केली आणि आंतरराष्ट्रीय समन्वयक म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना ६०हून अधिक देशांमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली, जिथे त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याद्वारे अनेक पिढ्यांना प्रेरित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्ववादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना “त्यांचे राष्ट्रनिर्माण आणि भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनातील योगदान कायम स्मरणात राहील,” असे सांगितले. तसेच, त्यांनी तत्ववादी यांच्या विचारधारात्मक स्पष्टतेचे आणि काटेकोर कार्यशैलीचे कौतुक केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही तत्त्ववादी यांच्या निधनाला ‘समाजासाठी अपरिवर्तनीय हानी’ असे संबोधले. त्यांनी संघाच्या जागतिक विस्तारात तत्ववादी यांच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांना ‘फार मोठा विद्वान’ म्हणून गौरविले. जागतिक हिंदू समुदायाने तत्ववादी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, ‘हिंदू स्वयंसेवक संघ, अमेरिका’ या संघटनेनेही श्रद्धांजली अर्पण केली आहे.
 
प्रचारक म्हणून तत्ववादी यांनी संपूर्ण आयुष्य धर्म, संघ आणि समाजाच्या मूल्यांसाठी अर्पण केले. तत्ववादी यांनी आपल्या जीवनात नेहमीच आपल्या मूल्यांशी आणि तत्त्वांशी बांधील राहण्याचा आदर्श ठेवला. त्यांचा वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि राष्ट्रनिर्माण तसेच सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. तत्ववादी यांच्या जीवनाचा विचार करताना, निष्ठा, मेहनत आणि आपल्या मूल्यांबद्दलची बांधिलकी किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते. त्यांची कहाणी निःस्वार्थ सेवाशक्ती आणि एका व्यक्तीच्या प्रभावशाली कार्याची साक्ष देते.
 
तत्ववादी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण होते. ते ‘बनारस हिंदू विद्यापीठा’त प्राध्यापक होते आणि नंतर फार्मसी विभागाचे प्रमुख बनले. त्यांच्या संशोधनात विज्ञान आणि अध्यात्म यांचा उत्तम संगम होता. शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याव्यतिरिक्त, तत्त्ववादी हे एक उत्तम गायक आणि संगीतकारही होते. संस्कृत आणि हिंदू शास्त्रांविषयी त्यांना अतीव प्रेम होते आणि ते जटिल संस्कृत श्लोक सहजतेने सादर करत. सुभाष भागवत एक वरिष्ठ संघ कार्यकर्ता त्यांचे आणखी एक जीवलग सहकारी सांगतात की, “तत्ववादी संध्यावंदनाच्या नित्यकर्मावर भर देत. प्रवासातही ते संध्या-वंदनाचे साहित्य सोबत ठेवत आणि जेवणाच्या आधी धोतर परिधान करत, ही बाब सर्वांसाठी अविस्मरणीय ठरत असे.”
 
तत्ववादी यांचा वारसा केवळ त्यांच्या कार्यापुरताच मर्यादित राहिला नाही, तर त्यांनी आपल्या शिकवणुकीने, लेखनाने आणि सार्वजनिक संवादाद्वारे असंख्य लोकांना प्रेरित केले. संघाच्या तत्त्वांसाठी आणि हिंदू मूल्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान जागतिक हिंदू समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. तत्ववादी यांच्या जीवनाची आठवण काढताना, आपली सांस्कृतिक परंपरा जपणे आणि धर्म, संघ आणि समाजासाठी कार्य करणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. त्यांच्या जीवनाची कथा एक अर्थपूर्ण, समर्पित आणि सेवाभावी जीवन जगण्याची प्रेरणा देते. पंतप्रधान मोदी यांच्या शब्दांत “ॐ शांती - तत्त्ववादी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांचा वारसा आपल्या सर्वांना प्रेरित करत राहो.”
 
तत्ववादी यांच्या जीवनाचा आढावा घेत असताना, मार्गदर्शन आणि गुरुशिष्य परंपरेचे महत्त्वही अधोरेखित होते. संघामधील अनेक मोठ्या व्यक्तींच्या सान्निध्यात त्यांचे जीवन घडले आणि त्यांनीही असंख्य लोकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्याचा वारसा आपल्याला मजबूत सामाजिक नाती जोडण्याचे आणि संघभावना वृद्धिंगत करण्याचे महत्त्व शिकवतो. त्यांचे आणखी एक वरिष्ठ संघ कार्यकर्ता विनायक दीक्षित यांनी सांगितले की, “फेब्रुवारीमध्ये मी नागपूरला एका कौटुंबिक विवाहासाठी गेलो असता, कार्यक्रमानंतर महाल परिसरातील कार्यालयात जाऊन आदरणीय शंकरराव यांना भेटलो. त्यांची प्रकृती नाजूक होती, पण त्यांची मानसिक चुणूक तितकीच तीव्र होती. त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुशलक्षेमाची विचारपूस केली. त्यांच्या अफाट स्मरणशक्तीमुळे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची नावे, तसेच नाशिकच्या त्यांच्या भावाच्या कुटुंबाची आठवण सांगितली. ‘एचएसएस यूके’चे धीरज शाह आणि सुरेंद्र शाह यांचे उल्लेख करत, माझा मामा जयंत चितळे यांचा उल्लेख केला, जे त्यांचे शालेय सहाध्यायी होते. तत्ववादी यांचे निधन केवळ संघ आणि जागतिक हिंदू समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक मोठी हानी आहे. शिक्षण, संस्कृती आणि समाजातील त्यांचे योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
 
प्राध्यापक डॉ. शंकरराव तत्ववादी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांचा वारसा हे जिवंत उदाहरण आहे की, एक व्यक्ती जगावर किती मोठा प्रभाव टाकू शकते. निष्ठा, समर्पण आणि सेवाभावनेने भरलेले त्यांचे जीवन आपल्याला प्रेरित करत राहील. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि त्यांचा वारसा आपल्या सर्वांना सतत प्रेरणा देत राहो.
ज्ञानेंद्र मिश्र,
विश्व अध्ययन केंद्र, मुंबईचे महासचिव