अनुभूतीचा ‘अनादि अनंत’ साक्षात्कार!

    22-Mar-2025   
Total Views |

article about the veteran painter sharad tawde s paintings
 
निसर्ग हा अनादि अनंत... माणूस त्याला आपल्या अधिपत्याखाली आणू शकत नाही. माणूस फक्त त्या निसर्गाची अनुभूती घेऊ शकतो. ही अनुभूती चित्रांच्या माध्यमातून साकारणारे ज्येष्ठ चित्रकार शरद तावडे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे दि. १८ ते दि. २४ मार्च दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलारसिकांसाठी खुले आहे. त्यानिमित्ताने या चित्रसंपदेचा रसास्वाद घेणारा हा लेख...
 
विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो एकदा म्हणाले होते, “सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे एक सरळ रेष काढणे.” चित्रांचे भव्य मनोरे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले आहेत. या चित्रांमध्ये रंगांची केलेली उधळण डोळे सुखावणारी असते. छोट्याशा कागदावरसुद्धा ऐटीत वावरणारे आकार, आपला जिवंतपणा दर्शवत असतात. या सगळ्या भव्यतेच्या मुळाशी असते, एक साधी रेष. ही रेष त्या चित्राचे भविष्य घडवणारी असते किंवा बिघडवणारी! आपल्या जीवनातसुद्धा आता या भव्यतेने प्रवेश केला आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वेगाने होणारे बदल आत्मसात करताना होणारी दमछाक आपण सगळेच अनुभवत आहोत. वेगाने बदलणारा भवताल आणि त्याचे आकलन यावर आता विचारमंथन सुरू आहे. वर्तमानकाळाला जर माणसाच्या भव्यतेचे प्रतीक म्हणायचे, तर याचे मूळ नेमके कुठे आहे, याचासुद्धा शोध घ्यायला हवा. माणसाला भाषा अवगत झाली, त्याच्या मेंदूचा विकास झाला, कृषिसंस्कृती जन्माला आली अशा अनेक टप्प्यांमध्ये त्याची विभागणी करता येईल. परंतु, त्याआधीसुद्धा माणूस हा निसर्गाचा एक भाग होता, हे विसरून चालणार नाही. शहरीकरणाच्या झपाट्यात या निसर्गापासून माणूस दिवसेंदिवस तुटत चालला आहे. त्याला या निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो.
 
पण, हाच निसर्ग जसा दिसतो, तसा आपल्या कुंचल्यातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे, ज्येष्ठ चित्रकार शरद तावडे यांनी. मुंबईच्या ‘जहांगीर कला दालन’ येथे दि. १८ मार्च ते दि. २४ मार्च या कालावधीत शरद तावडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे नाव ‘अनादी अनंत.’ निसर्गाचे खरे रूप या दोन शब्दांमध्ये खरोखर व्यक्त होते. माणसाने निसर्गावर विजय मिळवला, अशी एक भ्रामक समजूत घेऊन तो वावरत असतो. समुद्राच्या किनार्‍यावर अचानक एक भली मोठी लाट येते आणि वाळूचा किल्ला उद्ध्वस्त करते. अनेक प्रगतिशील राष्ट्रांच्या समुद्रकिनारी असलेली शहरेसुद्धा वाळूचे किल्ले आहेत, हे निसर्ग वेळोवेळी दाखवून देतो. निसर्गाबद्दलचे अपुरे आकलन हे मानवी व्यवहाराच्या दुःखाचे आणखी एक मूळ. पण, या निसर्गाला समजून घेतले पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्याच्या आकलनासाठी आधी त्याचा अनुभव घेतला पाहिजे, हा विचार शरद तावडे यांनी केला आणि या चित्रशिल्पांची साधना सुरू झाली.
 
ही साधना करत असताना, मानवनिर्मित माध्यमांना मर्यादा असते, हे त्यांना पुरते ठावूक आहे. शब्दांमध्ये किंवा रंगांमध्ये निसर्गाला पकडणे सहजासहजी शक्य नाही, हे सत्य ते ओळखून आहेत. निसर्गाचा मोठेपणा स्वीकारण्यासाठी आपण आपला क्षुद्रपणा स्वीकारायला हवा, असे ते म्हणतात. माणसाला चौकटीत जगण्याची सवय असते. स्वतःच्या अवतीभोवती चौकटी निर्माण करत त्याची जन्मवारी सुरूच असते. या चौकटीत त्याचे स्वतःचे कायदे, नियम असतात. एकदा हे सगळे ओलांडले की, निसर्गाचा खरा अविष्कार त्याच्या लक्षाात येतो. शरद तावडे यांच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्टी घडली आणि याच गोष्टीचे वेगळेपण त्यांच्या चित्रांमध्ये उमटले.
 
‘अनादी अनंत’ या चित्रप्रदर्शनातील चित्रांचा वेगळेपणा म्हणजे, या चित्रांमध्ये निसर्गाचे अस्सलपण जपले गेले आहे. चित्र साकारताना कुठेही कृत्रिमपणा नजरेस येत नाही. ‘वॉटर कलर’चा वापर करून साकारलेली पानवेल तिचे अस्तित्व जपून आहे. त्यातला रेखीवपणा हा कुंचल्यातून अगदी सहज साकारलेला. त्यावर रंग शिंपडले नसून, त्यांचा मूळ जन्मच जणू कागदावर झाला आहे, असा भास व्हावा. निसर्ग हे या चित्रप्रदर्शनाचे मुख्य सूत्र असले, तरीसुद्धा ‘निसर्गाची अनुभूती’ हे या अभिव्यक्तीचे मर्म आहे. चित्र साकारताना त्या त्या वेळी कागदावर उमटणारे पीक आपल्या दृष्टीस येते. पण, ते पीक काढण्यासाठी केली जाणारी मशागतसुद्धा लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे. या मशागतीमध्ये त्या चित्रातील सौंदर्याचे मूळ आहे. आपल्या या निर्मितीप्रक्रियेवर भाष्य करताना शरद तावडे म्हणतात की, “निसर्ग जसा आहे, तसा आधी मी त्याचा स्वीकार केला पाहिजे. उदाहरणार्थ, मी गावामध्ये ज्या ठिकाणी राहात होतो, तिथे अवतीभोवती लोकवस्ती नव्हती. त्यामुळे ज्या वेळेला तुफान पाऊस पडायचा, वादळ यायचे, तेव्हा लोक गावात यायला सांगायचे. पण मी मुद्दाम जात नसे; कारण मला पावसाचे अस्सल रूप अनुभवयाचे होते. वादळवारा आल्यावर एका विशिष्ट प्रकारची गाज ऐकू येते. या वादळातील पावसाचीसुद्धा स्वतःची एक लय असते. तो पाऊस जेव्हा घराच्या छपरावर पडायाला सुरुवात होते, तेव्हाची वेळ आणि टप्प्याटप्प्याने जेव्हा हाच पाऊस रूद्रावतार धारण करतो, तेव्हाची वेळ यामध्ये नेमके काय बदललेले असते, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो.”
 
शरद तावडे यांच्या याच जाणिवांचे संचित मग कॅनव्हासवर उभे राहते. निसर्गाशी एकरूप होऊन त्याची अनुभूती घेतल्यामुळे ते याच निसर्गातील राखसुद्धा समर्थपणे उभी करतात. ‘राखरांगोळी झाली’ असे म्हणत आपण एखादी गोष्ट संपली, असे म्हणतो, पण याच राखेमध्ये झाडांचे मूळ आहे, याचीसुद्धा विलक्षण कल्पना त्यांनी मांडली. त्यांच्या कल्पनेतील जन्मलेल्या एका चित्रामध्ये दूरवर पसरलेला वणवा आपल्या दृष्टीस येतो. या वणव्याखाली वाळलेले गवत आहे. हा वणवा वार्‍याच्या वेगाने पसरतो आहे. हा वणवा पेटलेला असताना एक माणूस खाली उभा आहे. परंतु, हा माणूस एखाद्या ठिपक्याएवढाच आहे. या ठिपक्याएवढ्या माणसाच्या हातातसुद्धा पाण्याची एक बादली आहे. कारण, निसर्गाच्या रूद्रतांडवापुढे त्या माणसाची लायकी तेवढीच आहे. परंतु, त्यापलीकडेसुद्धा छोटी छोटी झाडे आहेत, ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
दुसर्‍या एका चित्रामध्ये एका बाईच्या डोक्यावर पेंढा आहे. पण, त्या पेंढ्याचा आकार तिच्यापेक्षा कैकपटीने मोठा आहे. हे असूनसुद्धा त्या पेंढ्याचा भार ती बाई सहजपणे डोक्यावर घेऊन चालत आहे. शेतातील कामे झाली की, घरदार, मुलेबाळे, सासू-सासरे ही यादी काही संपत नाही. पण, हे सारे ती स्त्री समर्थपणे घेऊन पुढे चालली आहे, हे त्या स्त्रीच्या चालण्यातून आपल्याला लक्षात येते. शरद तावडे यांच्या चित्रांचे वर्गीकरण कुठल्याही विशिष्ट शैलीमध्ये करता येत नाही. त्यांचे चित्र म्हणजे त्यांची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. या अभिव्यक्तीचे वेगळेपण म्हणजे इथे निर्मितीपेक्षा अनुभूतीला उजवा कौल आहे. ही अनुभूती कागदावर उमटली आणि चित्रशिल्प जन्माला आली. निसर्गामध्ये माणसाचे मूळ सामावलेले आहे, त्याच्याशी एकरूप होण्याचा संदेश देणारी ही कलात्मक अनुभूती अनेक गोष्टींचा नव्याने उलगडा करते, यात तीळमात्र शंका नाही.
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.