भारत सरकारने 1972 साली ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केलेले, हिंदी भाषेचे विद्वान आणि राम, रामायण व समग्र विश्वातील रामकथेचे ख्यातनाम मर्मज्ञ-संशोधक डॉ. कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उगम आणि विकास’ हा हिंदी भाषेत लिहिलेला शोधप्रबंध जगातील सर्वच विद्यापीठांनी गौरवलेला आहे. रामकथेचा विश्वविख्यात विदेशी अध्ययनकर्ता संशोधक म्हणून डॉ. कामिल बुल्के ओळखले जातात. एक विदेशी गोरा माणूस ‘ईसाई मिशनरी’ म्हणून भारतात येतो काय आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवून रामकथेचा मर्मज्ञ होतो काय, “रामकथेचा अभ्याच हीच माझी साधना,” म्हणत, राममय जीवनाची भारतभूमीत सांगता करतो काय, हे सारेच आश्चर्यकारक आहे. डॉ. बुल्केचा राम प्रबंध रामकथेचा ‘विश्वकोश’ मानला जातो.
राम तेरा चरित्र स्वयं काव्य हैं।
कोई कवी बन जाये सहज संभव हैं।
श्रीरामाची कथा ही सदा सर्वदा प्रेरणेचा स्रोत राहिलेली आहे. रामकथेच्या प्रेरणेने अनेक जण कवी झाले, अनेक जण निरुपणकार-भाष्यकार झाले आणि काही जण अभ्यासक, संशोधक, लेखकही झाले. डॉ. कामिल बुल्के अशा रामकथेच्या प्रभावाने राममय झालेले एक थोर अभ्यासक, संशोधक आहेत. भारतीय ज्ञानसंपदा, संत साहित्य हा विदेशी अभ्यासक संशोधकांचा नेहमीच कुतूहलाचा, जिज्ञासेचा विषय आहे. विदेशातून भारतात येऊन येथील प्रादेशिक भाषा शिकून, येथील संतसाहित्य, प्राचीन ज्ञान ग्रंथ आणि तीर्थक्षेत्रे-स्थल माहात्म्ये यांचा अभ्यास करणार्या नामवंत संशोधकांची परंपरा मोठी आहे. केवळ महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर श्रीक्षेत्र पंढरपूर-पांडुरंग आणि मराठी संतसाहित्य याचा अभ्यास-संशोधन करणार्यांमध्ये फादर जस्टिन अॅम्बट, डॉ. रिसाईड, डॉ. गुन्थर सोन्थामयर, फादर जी. ए. डलरी, डॉ. एरिक सॅन्ड ही काही नावे महत्त्वाची आहेत. या अभ्यासकांमध्ये दोन ईसाई धर्मप्रचारक आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. (मॅक्समुलर आदी ब्रिटिश काळातील मनी कुटिल षडयंत्राचा भाव बाळगून, भारतीय विद्या-ग्रंथाचा अभ्यास करणारे काही विदेशी अभ्यासकही होते.)
डॉ. कामिल बुल्के वयाच्या 25व्या वर्षी इ. स. 1934 मध्ये भारतात आले आणि तुलसीदासांच्या रामकथेच्या प्रेमात पडले. राममय होऊन त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. 48 वर्षांच्या भारत वास्तव्यात राम अध्ययनरत जीवन जगून, अखेर दिल्लीत त्यांनी 1982 साली अंतिम श्वास घेतला. ‘रामकथा’ हाच त्यांचा ध्यास-अभ्यास होता. त्यासाठी ते हिंंदी, अवधी, बृजभाषा शिकले, संस्कृतचाही अभ्यास केला. ते सदैवच विद्यार्थी दशेत वावरले. आपल्या रामकथा प्रेमाविषयी डॉ. बुल्के म्हणतात, “गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ने मला श्रीराम व रामकथेचा महामार्ग दाखवला. वाल्मिकी-तुलसीदास माझ्या अध्ययनाचे दीपस्तंभ आहेत.”
स्नेह, वात्सल्य आणि करुणामूर्ती म्हणून ओळखले जाणारे डॉ. कामिल बुल्के यांचा जन्म, बेल्जियम देशातील रम्सकपैले या गावी इ. स. 1909 मध्ये झाला होता. 1930 साली त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. एकदा फुटबॉल मैदानावर खेळ संपल्यावर ते एक पुस्तक वाचत असतानाच, आपण संन्यास घेऊन ‘ईसाई मिशनरी’ व्हावे आणि भारतात जावे, असे त्यांच्या मनात आले. ‘जेसुईट ख्रिश्चन धर्मप्रसार संस्थे’शी त्यांनी संपर्क केला आणि भारतात पाठवणार असाल, तर मी मिशनरी कार्यास जीवन समर्पित करू इच्छितो असे म्हणत, ते ‘ईसाई धर्मप्रचारक’ अर्थात फादर झाले. त्यानंतर 1934 साली ते भारतात आले. मुंबई, दार्जिलिंग येथील मिशनमध्ये काम करून, ते तत्कालीन बिहारच्या गुमला-रांचीमध्ये आले. तेथील ख्रिश्चन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक झाले. आता भारत हीच आपली कर्मभूमी असे मानून त्यांनी हिंदी, बृजभाषा, अवधी भाषा आत्मसात केल्या. पंडित बद्रिप्रसाद शास्त्री हे त्यांचे भाषा गुरू होते. हिंदी समवेतच संस्कृतचाही त्यांना अभ्यास केला. त्यांनी गोस्वामी तुलसीदासजींचे ‘रामचरितमानस’ वाचले, ऐकले, पंडिजींकडून समजून घेतले आणि ते श्रीराम कथा-तुलसीदास यांचे उपासक-भक्त झाले. 1940 साली प्रयाग विद्यापीठातून त्यांनी ‘हिंदी विशारद’ पदवी घेतली, तर 1943 साली कोलकाता विद्यापीठातून ‘संस्कृत’ची पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी ‘रामकथा’ हा विषय घेऊन केवळ भारतातीलच नव्हे, तर देशविदेशातील रामकथांचा शोध घेऊन अत्यंत तार्किक व वैज्ञानिक निकषावर ‘पीएच.डी’चा प्रबंध लिहिला. ‘रामकथा उदय आणि विकास’ या त्यांच्या प्रबंधास 1945 मध्ये प्रयाग विद्यापीठाने ‘पीएच.डी’ देऊन, त्यांचा सन्मान केला. डॉ. माताप्रसाद गुप्त हे त्यांचे प्रबंध मार्गदर्शक होते. विशेष म्हणजे डॉ. बुल्के यांनी हट्टाने आपला प्रबंध इंग्रजीत न लिहिता चक्क हिंदीतून लिहिला, तेव्हा प्रबंध फक्त इंग्रजीतच मान्य केले जात होते. डॉ. बुल्केच्या हट्टापायी विद्यापीठाने नियमात बदल केला. डॉ. बुल्के हे हिंदी भाषेत प्रबंध लिहिणारे पहिले विद्यार्थी ठरले.
डॉ. बुल्के हे आज हिंदीचे विद्वान, भाषातज्ज्ञ आणि रामकथेचे मर्मज्ञ म्हणून जगभर ओळखले जातात. भारत सरकारच्या ‘केंद्रीय हिंदी समिती’चे सदस्य म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे ‘हिंदी-इंग्रजी शब्दकोशाचे कार्य’ आणि त्यांचा ‘रामकथा : उदय आणि विकास’ हा जगविख्यात प्रबंध याची दखल घेऊन, 1972 साली भारत सरकारने बुल्के यांचा ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने गौरव केलेला आहे. ‘रामकथा : उदय आणि विकास’ या पुस्तकांच्या आजवर 29 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत.
डॉ. कामिल बुल्के यांनी जगभरातील रामकथांचा जेवढा व्यापक शोध घेतला, तेवढा आजवर अन्य कोणाही अभ्यासकाने घेतलेला नाही. त्यांचे अभ्यास-लेखन भाबडे नाही, तर पूर्णतः तार्किक, चिकित्सक आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेले आहे. “वाल्मिकी रामायण’ हे महाकाव्य श्रेष्ठ दर्जाचे असून राम हे काल्पनिक पात्र नाही, तर तो भारताच्या इतिहासातील एक इतिहासपुरुष आहे,” असे डॉ. बुल्के यांनी ठामपणे साधार प्रतिपादन केलेले आहे. ‘रामकथा ः उगम आणि विकास’ या प्रबंधामध्ये पाच प्रकरणे (अध्याय) आहेत. 1) वैदिक साहित्य आणि रामकथा (वाल्मिकी कृत रामायण, महाभारत, बौद्ध, जैन रामायणे), 2) रामकथेची उत्पत्ती (विविध मतांचा ऊहापोह) 3) अर्वाचिन रामकथा (सर्व प्रादेशिक, भाषिक व विदेशात रामकथाचा आढावा), 4) रामकथेचा विकास (प्रत्येक कांडाचे विश्लेषण व मतमतांतरे), 5) उपसंहार (निष्कर्ष). “रामकथेची शोध यात्रा ही माझी आध्यात्मिक साधना आहे, रामकथेचा विश्वसंचार हा भारतीय संस्कृतीचा दिग्विजय आहे,” असे डॉ. बुल्के म्हणतात.
विद्याधर ताठे
॥ जय श्रीराम ॥
9881909775
(पुढील लेखात : रामो भूत्वा रामम् यजेत् । )