कल्याण: ( Take aptitude test of 16 lakh students of class 10th BJP Anil Bornare demand to the Education Minister ) दहावीनंतर करिअरची दिशा ठरविणारी कलचाचणी चार वर्षांपासून बंद असून ही कलचाचणी सुरू करण्याची मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
“खासगी ‘अॅप्टिट्यूड टेस्ट’ करून घेणे सर्वसामान्य पालकांना परवडत नाही. म्हणून यापूर्वी ही कलचाचणी शिक्षण विभाग मोफत आयोजित करीत असे. याचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थी घेत असत. दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण. कारण, त्यानंतर करिअरची दिशा ठरते. विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे, हे समजून घेण्यासाठी शिक्षण विभागातर्फे कलचाचणी घेतली जात होती.
तथापि मागील चार वर्षांपासून कलचाचणी बंद असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्यात अडचणी येत आहेत. खासगी संस्थांकडून कलचाचणी करून घेण्याचा खर्च सर्वसामान्य पालकांना परवडणारा नाही. यासाठी शिक्षण विभागाने कलचाचणी पुन्हा सुरू करून यंदा परीक्षेला बसलेल्या 16 लाख विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा द्यावा,” असेही अनिल बोरनारे यांनी निवेदनात म्हटले आहे. “राज्यात समुपदेशकांची संख्या केवळ एक टक्काच आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत समुपदेशक नेमणे शक्य नसले, तरी परिसरातील आठ ते दहा शाळा मिळून एका पूर्ण वेळ समुपदेशकाची नेमणूक करावी,” अशीही मागणी बोरनारे यांनी केली आहे.