स्वातंत्र्यलढ्यातील मूक साक्षीदार बोलायला लागतो तेव्हा...

    22-Mar-2025
Total Views |

Shantaram Chawlchi Smarangatha
 
भारताचा स्वातंत्र्यलढा हा प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचा विषय. परंतु, जेव्हा या इतिहासातील काही अपरिचित पाने आपल्यासमोर उलगडायला लागतात, तेव्हा त्याच इतिहासाची रोमांचकारी बाजू आपल्या समोर येते. याच स्वातंत्र्यलढ्याच्या केंद्रस्थानी असलेले मुंबईतील गिरगाव, हे या चळवळींचे शक्तिकेंद्रच होते. या गिरगावातील अनेक चळवळींची साक्षीदार असलेल्या आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शांताराम चाळीचा इतिहास शब्दबद्ध केला आहे, ‘शांताराम चाळीची स्मरणगाथा’ या पुस्तकातून.स्वातंत्र्यलढ्याच्या मूक साक्षीदाराचे जणू हे आत्मकथनच...
 
या कथनाची सुरुवात होते, 1893 सालापासून. स्वातंत्र्यचळवळीत असंख्य तरुणांचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली. लोकमान्यांच्या याच प्रेरणेतून, शांताराम चाळीतील रहिवाशांनीही गणेशोत्सवाची सुरुवात केली. शांताराम चाळीचे एक वैशिष्ट्य होते. गिरगावातील अगदी केंद्रस्थानी असलेल्या या चाळीला, समोर विस्तीर्ण असे पटांगण लाभले होते. त्यामुळे साहजिकच ही चाळ स्वातंत्र्यलढ्याचे बौद्धिककेंद्र बनत गेली. या चाळीचा गणेशोत्सव हा स्वातंत्र्याच्या चळवळीचे स्फूर्तिस्थान बनू लागला. अनेक पुढार्‍यांची भाषणे इथूनच होऊ लागली.
 
या पुस्तकात शांताराम चाळीच्या 150 वर्षांच्या इतिहासात घडून गेलेल्या काही महत्त्वाच्या सभांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. प्रत्येक सभेचे त्यावेळी वृत्तपत्रांमधून कसे वार्तांकन केले गेले होते, याबद्दलही नमूद करण्यात आले आहे. या पुस्तकाची खासियत म्हणजे, हे पुस्तक बघता बघता आपल्याला स्वातंत्र्यलढ्याच्या त्या मंतरलेल्या दिवसांत घेऊन जाते. त्यातूनच हे पुस्तक आपल्या मनाची पकड घेते.
 
आता एवढ्या सगळ्या विवेचनानंतर, या सभांच्या इतिहासाबद्दल थोडे लिहिणे अगत्याचे ठरते. यातील सर्वांत उल्लेखनीय पहिली सभा म्हणजे, दि. 27 ऑगस्ट 1898 रोजीची शिवजयंतीची सभा. या सभेसाठी त्याकाळी शिवजयंतीचे मेळे जमले होते. प्रत्यक्ष लोकमान्य टिळक या सभेस उपस्थित होते. त्यावेळी भाषण करताना त्यांनी काढलेले उद्गारही खूप महत्त्वाचे आहेत. पुण्याच्या ‘केसरी’तही याबद्दल विस्तृत लिहून आले होते. टिळक आपल्या भाषणात म्हणतात की, “शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ दूर तिकडे बंगालमध्ये कार्यक्रम झाले. यावरून भारत एक देश झाला, हे जगासमोर आले आहे. शिवाजी महाराजांना चोर-डाकू म्हणणार्‍यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो की, जर महाराज लुटेरे होते, तर तुम्ही ज्याचे गोडवे गाता तो क्लाईव्ह कोण आहे? शिवजयंतीचा उत्सव आपल्या पूर्वजांची महती आजच्या पिढीला कळावी, या उदात्त हेतूनेच केला जात आहे.”
 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याला मदत व्हावी आणि त्यातून लोकोपयोगी कामे करता यावीत, यासाठी काँग्रेसने त्याकाळी ‘पैसा फंड’ सुरू केला होता. याच फंडाचीही एक सभा चाळीत झाली होती. त्यावेळी या ‘पैसा फंडा’त 21 हजार, 543 रुपये जमले होते. यानंतर पुस्तकात धावता आढावा घेण्यात आला आहे, तो दि. 11 फेब्रुवारी 1917 रोजीच्या सभेचा. या सभेत कर्ज घेतल्याने त्या ओझ्याखाली स्वीकाराव्या लागणार्‍या दास्यत्वाविरोधात ठराव पारित करण्यात आला. ही सभा ‘सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’च्यावतीने घेण्यात आली होती आणि महत्त्वाचे म्हणजे, या सभेला महात्मा गांधी उपस्थित होते. यानंतर लष्कर भरतीची एक सभा झाली. भारतीय तरुणांना लष्करी प्रशिक्षण मिळावे व स्वतंत्र भारताचे लष्कर तयार करताना देशाला त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळावा, यासाठी पहिल्या महायुद्धात इंग्लंडच्या बाजूने लष्करात भरती होण्याचे आवाहन या सभेत भारतीयांना करण्यात आले.
 
यातील सर्वांत महत्त्वाची सभा म्हणजे, दि. 16 जून 1918 रोजीची. ही सभा एका विशिष्ट कारणासाठी घेण्यात आली होती. लॉर्ड वेलिंग्टन यांच्या विरोधातील ही सभा होती. लॉर्ड वेलिंग्टन याने, टाऊन हॉलमध्ये एक युद्ध परिषद घेतली होती. या युद्ध परिषदेत उपस्थित राहिलेल्या सर्व भारतीय पुढार्‍यांना वेलिंग्टन याने महायुद्धात सहकार्य करण्याचे आवाहन केले. भारतीय पुढार्‍यांनी ही मागणी मान्य करण्याच्या बदल्यात, भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली. साहजिकच ती धुडकावली गेल्याने, भारतीय पुढार्‍यांनी सभा त्याग केला. त्यावेळी या घटनेच्या निषेधार्थ शांताराम चाळीत सभा भरली होती. या सभेसाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बॅ. मोहम्मद अली जिना हे अग्रगण्य होते. या सभेची वर्णने वाचताना आजही थक्क व्हायला होते. या सभेला इंच न इंच माणसे जमली होती. ज्यांना सभेसाठी आत शिरायला मिळाले नाही, अशी माणसे बाजूच्या चायना बागेत जमली होती. या सभेत वेलिंग्टनच्या विरोधात ठराव पारित करण्यात आला. या ऐतिहासिक सभेचे छायाचित्र आज उपलब्ध आहे. अशा अनेक रोमांचकारी प्रसंगांनी हे पुस्तक भरले आहे.
 
पुढे काळाच्या ओघात मुंबई बदलली, गिरगाव बदलायला लागले. शांताराम चाळीचा इतिहासही विस्मृतीत गेला. तब्बल 150 वर्षांचा इतिहास जपणारा गणेशोत्सव मात्र दिमाखात सुरू होता. याच चाळीचे रहिवासी अमेय जोशी यांना चाळीच्या इतिहासाबद्दल समजताच, झपाटल्यासारखे काम करून हा इतिहास पुन्हा जिवंत केला. मणिभवन, केसरीवाडा, एशियाटिक लायब्ररी या सर्व ठिकाणी भेटी देऊन, त्यांनी सर्व संदर्भ साधने धुंडाळून, त्यातून सगळा इतिहास शोधला. त्यांना या कामासाठी शांताराम चाळीच्या ‘लोकमान्य गणेशोत्सव मंडळा’च्या अध्यक्षा अनघा बेडेकर, तसेच इतिहास विषयाच्या अभ्यासिका अपर्णा बेडेकर यांनी पाठिंबा दिला. यातूनच हे पुस्तक साकार झाले. अशा या इतिहासातील आजपर्यंत मूक राहिलेल्या एका साक्षीदाराची रोमांचकारक कहाणी अनुभवायलाच हवी.
 
हर्षद वैद्य

संकल्पना संशोधन आणि लेखन :
अमेय जोशी
लेखन साहाय्य :
अपर्णा बेडेकर संपादक : अनघा बेडेकर, अध्यक्ष, शांताराम चाळ लोकमान्य गणेशोत्सव मंडळ
अग्रलेख
जरुर वाचा