अजितदादा-जयंत पाटील भेटीवरून राऊतांना पोटशूळ! म्हणाले, "त्यांचे उत्तम..."
22-Mar-2025
Total Views |
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. परंतू, यावरुन संजय राऊतांना पोटशूळ उठल्याचे दिसले. त्यामुळेच त्यांचे उत्तम चालले असते, असे वक्तव्य राऊतांनी केले.
संजय राऊत म्हणाले की, "अजित पवार आणि जयंत पाटील यांचे उत्तम चालले असते. शिवसेनेतूनही काही लोक सोडून गेले. पण आम्ही शक्यतो त्यांच्या वाऱ्यालाही फिरकत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसला. त्यामुळे आम्ही त्यांच्या आसपाससुद्धा जाणार नाही. पण यांचे बरे असते. त्यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, विद्याप्रतिष्ठान असते, सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. पण आमच्याकडे असे काहीही नाही. त्यामुळे आमच्या कुणाशी भेटीगाठी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो. राजकारणात संवाद ठेवला पाहिजे वगैरे दांभीक गोष्टींवर आमचा विश्वास नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होती. नका जाऊ. विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था या चांगल्या संस्था आहेत. आमच्याकडे अशा संस्था नाहीत. आम्ही रस्त्यावरचे फाटके लोक आहोत. आम्ही भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवत राहू," अशा शब्दात संजय राऊतांनी आपला पोटशूळ बोलून दाखवला.