ढाका : बांगलादेशात (Bangladesh) अवामी लीगच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार राहण्यास भाग पाडले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर अवामी लीगचे मतदार, पक्षाचे सदस्य आणि अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यात आला आहे, आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. अशातच शुक्रवारी २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी अवामी लीगशी संबंधित असलेल्या लोकांनी ढाक्यातील धनमोंडी परिसरात एका रस्त्यावर मोर्चा काढला. ज्यात पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.
एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, विद्यार्थी आणि स्थानिकांनी अवामी लीग आणि संबंधित लोकांनी धनमोंडीच्या परिसरातील एका रस्त्यावरील मिरवणूक रोखली, ज्यात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी जय बांगलाचे नारे दिले होते. अशातच काही धर्मांधांनी रॅलीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.
त्यावेळी अवामी लीगच्या काही सदस्यांना तसेच काही कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये जुबो महिला लीगचा कार्यकर्ता लबोनी या अवामी लीगचा कार्यकर्ता सिराजुल आणि बीसीएलचा कार्यकर्ता राजू यांचा समावेश आहे.
दरम्यान, डीएमपीचे अतिरिक्त उपायुक्त ज्वेल राणा म्हणाले की, मोहम्मदपूर पोलिसांनी विद्यार्थी आणि लोकांच्या मदतीने अवामी लीगच्या मिरवणुकीतील तीन जाणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ते म्हणाले की, इफ्तारनंतर सुमारे ४०-५० अवामी लीग आणि बीसीएल कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढण्यात आली. अशातच अटक करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत.
दरम्यान, मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन करून अनेक महिने होऊन गेले मात्र, अद्यापही हिंदू अल्पसंख्यांकांवरील अन्याय अत्याचार थांबात नाहीत. धर्मांधांकडून मूर्तींची विटंबना करणे, हिंदू सण-उत्सव साजरे करण्यास विरोध असा अन्याय हिंदूंवर होत आहे.