मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS ABPS Day 2 Press Conference) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळुरु येथे होत आहे. बांगलादेशातील हिंदू समाजासोबत एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्याबाबतचा प्रस्ताव बैठकीच्या दुसऱ्या दिवशी (शनिवार, दि. २२ मार्च) संमत करण्यात आला. सहसरकार्यवाह अरुण कुमारजी यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर देखील उपस्थित होते.
हे वाचलंत का? : डॉ. हेडगेवारांचा एकतेचा संदेश पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक
मिळालेल्या महितीनुसार, या बैठकीत झालेल्या प्रस्तावाद्वारे बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर इस्लामिक कट्टरपंथी घटकांकडून सातत्याने होत असलेल्या हिंसाचार, अन्याय आणि अत्याचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही स्पष्टपणे मानवी हक्क उल्लंघनाची गंभीर बाब असल्याचे त्यात म्हटले आहे. बांगलादेशातील सत्तांतराच्या काळात मठ, मंदिरे, दुर्गापूजा मंडप आणि शैक्षणिक संस्थांवर हल्ले, मूर्तींची विटंबना, महिलांचे अपहरण आणि अत्याचार, त्यांची क्रूर हत्या, सक्तीचे धर्मांतर अशा अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा घटनांना राजकीय संबोधून त्यांचे धार्मिक पैलू नाकारणे म्हणजे सत्यापासून दूर जाणे होय, कारण बहुतांश बळी हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायातील आहेत.
प्रस्तावात पुढे असेही म्हटले की, बांगलादेशातील इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदू समाजावर, विशेषत: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर होणारे अत्याचार ही नवीन गोष्ट नाही. बांगलादेशातील सतत घटणारी हिंदूंची लोकसंख्या तेथील लोकांचे अस्तित्व संकटात असल्याचेच दर्शवते. विशेषतः गेल्या वर्षभरात हिंसाचार आणि द्वेषाला दिलेले राज्य आणि संस्थात्मक समर्थन ही गंभीर चिंतेची बाब आहे.
बांगलादेशकडून सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये केल्याने दोन्ही देशांमधील संबंधांचे खोलवर नुकसान होऊ शकते. अविश्वासाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण करून, एका देशाला दुसऱ्या देशाविरुद्ध उभे करून भारताच्या शेजारील प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही आंतरराष्ट्रीय शक्ती जाणूनबुजून करत आहेत. त्यामुळे भारतविरोधी वातावरण, पाकिस्तान आणि 'डीप स्टेट'च्या सक्रियतेवर लक्ष ठेवून त्यांचा पर्दाफाश करण्याची विनंती चिंतनशील वर्ग आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी अभासकांना प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.
प्रतिनिधी सभा हे सत्य अधोरेखित करू इच्छिते की, या संपूर्ण क्षेत्राची एक समान संस्कृती, इतिहास आणि सामाजिक संबंध आहे, ज्यामुळे एकाच ठिकाणी कोणतीही उलथापालथ झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण क्षेत्रावर होतो. भारत आणि शेजारी देशांचा हा समान वारसा मजबूत करण्यासाठी सर्व जागरूक लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. उल्लेखनीय आहे की, बांगलादेशातील हिंदू समाजाने शांततापूर्ण, संघटित आणि लोकशाही पद्धतीने या अत्याचारांना धैर्याने विरोध केला, भारतातील आणि जगभरातील हिंदू समाजाने त्यांना नैतिक आणि भावनिक पाठिंबा दिला, हे देखील कौतुकास्पद आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज भारत सरकारने व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारबरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी सतत संवाद सुरू ठेवावा आणि बांगलादेशातील हिंदू समुदायाची सुरक्षा, सन्मान सुनिश्चित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू ठेवावेत, याविषयी विनंती प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर होत असलेल्या अमानुष वागणुकीची संयुक्त राष्ट्र आणि जागतिक समुदायासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि या हिंसक कारवाया थांबवण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणला पाहिजे. बांगलादेशी हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या समर्थनार्थ संघटित होऊन आवाज उठवण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे.