मिस्टर बी, लिंकन आणि यादवी युद्ध

Total Views |

Mr. B, Lincoln
 
1861 सालच्या मार्चमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर, देशातला सर्वांत यशस्वी फोटोग्राफर म्हणून मॅथ्यू ब्रॅडीचा जेव्हा लिंकनशी परिचय करून देण्यात आला; तेव्हा लिंकन म्हणाला, “मिस्टर बी, याला कोण ओळखत नाही. त्याने काढलेला फोटो आणि ‘कूपर इन्स्टिट्यूट’मधले ते भाषण यांनीच तर मला विजय मिळवून दिलाय.”
 
आपल्याकडच्या इंग्रजी पत्रकारांना पश्चिमेच्या संकल्पनांची नक्कल करायला फार आवडते. भारतातला चित्रपट उद्योग म्हणजे म्हणे ‘बॉलिवूड.’ का? तर अमेरिकन चित्रपट उद्योगाला ‘हॉलिवूड’ असे म्हणतात, म्हणून.
 
जगातल्या अन्य प्रगत देशांमध्येही चित्रपट निर्मिती चालते. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन, इराण इत्यादी देशांमध्येही प्रतिभावान कलावंत आहेत. तिथेही अत्याधुनिक, सुसज्ज स्टुडिओज आहेत. पण, तिथे नावाची अशी नक्कल केली जात नाही.
 
काही वर्षांपूर्वी खुद्द अमिताभ बच्चनने ‘बॉलिवूड’ या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला होता. पण, नंतर बहुधा त्याची स्वतंत्र वृत्ती वितळून गेली असावी. इंग्रजी पत्रकारितेत खुद्द अमिताभचा उल्लेख ज्या ‘बिग बी’ या नावाने केला जातो, ती ही नक्कलच आहे. मूळ ‘मिस्टर बी’ हा कलावंत अमेरिकन होता. त्याचे नाव होते मॅथ्यू ब्रॅडी. न्यूयॉर्क शहरात त्याचा मोठा स्टुडिओ होता. हा फोटोग्राफी स्टुडिओ होता. फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रण किंवा प्रकाशचित्रण ही कला आज कळसाला पोहोचली आहे. तिच्या सुरुवातीच्या काळातल्या महान कलावंतांमध्ये मॅथ्यू ब्रॅडी हे एक मोठे नाव होते.
 
न्यूयॉर्क राज्यात जन्मलेला मॅथ्यू ब्रॅडी उत्तम चित्रकार होता. विल्यम पेज या नामवंत चित्रकाराकडे तो ‘पोर्ट्रेट पेन्टिंग’ शिकत होता. तेवढ्यात म्हणजे सन 1839 साली विल्यम पेजचा गुरू सॅम्युअल मोर्स हा फ्रान्सहून परत आला. हाच तो ‘टेलिग्राफ’ या अत्यंत क्रांतिकारी शोधाचा जनक सॅम्युअल मोर्स. मुळात तो रसायनशास्त्रज्ञ. पण, त्याला असंख्य विषयांमध्ये उत्तम गती होती. आताच्या फ्रान्स दौर्‍यात मोर्स हा लुई झाक दागुएर या फ्रेंच कलावंताला भेटून आला होता. एका खोक्याला भोक पाडून त्यातून प्रकाशकिरणांच्या साहाय्याने समोरच्या सजीव किंवा निर्जीव वस्तूंची प्रतिमा काचेवर घ्यायची आणि मग सिल्व्हर नायट्रेट किंवा तत्सम रसायनाच्या उपयोगाने ती प्रतिमा पकडून ठेवायची; अशासारखे प्रयोग युरोपात विशेषतः इटली आणि फ्रान्समध्ये वर्षानुवर्षे चालू होते. लुई दागुएर या फ्रेंच कलावंताने यात खूपच प्रगती केली होती.
 
मोर्स दागुएरकडून हे तंत्र शिकून आला आणि त्याने न्यूयॉर्कला ते तंत्र शिकवण्याचे चक्क क्लासेस काढले. मॅथ्यू ब्रॅडी हा मोर्सच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या फळीतला एक. अतिशय वेगाने ब्रॅडीने फोटोग्राफीचे तंत्र आत्मसात केले आणि 1844 साली न्यूयॉर्कमध्ये पहिला फोटो स्टुडिओ उघडला. पुढच्या पाच वर्षांत ब्रॅडीचा स्टुडिओ इतका लोकप्रिय झाला आणि त्याने इतक्या प्रसिद्ध लोकांचे फोटो काढले की, 1850 साली त्याने ‘नामवंत अमेरिकन व्यक्तींचा चित्रसज्जा’ असे प्रदर्शनच भरवले.
 
1860 सालची गोष्ट. इलिनॉईस राज्यातल्या स्प्रिंगफील्ड या ठिकाणाहून एक राजकारणी वकील न्यूयॉर्कला आला. गुलामगिरीची प्रथा चालू राहावी की रद्द करावी, या प्रश्नावरून संपूर्ण अमेरिकेत प्रचंड वाद चालू होता. त्याबाबत न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध ‘कूपर इन्स्टिट्यूट’ने एक परिसंवाद ठेवला होता. त्यात भाषण करण्यासाठीच तो वकील आला होता. तसा तो अगदीच सामान्य माणूस नव्हता. तो चांगला वक्ता आणि लोकप्रिय वकील होता. शिवाय तो खासदार होता. पण, न्यूयॉर्कवाल्यांच्या दृष्टीने बाहेरच्या राज्यातला माणूस म्हणजे गावंढळच! आणि ब्रॅडीने काढलेल्या त्याच्या या सुप्रसिद्ध चित्रात तो दिसतोयही तसाच. खप्पड गाल, लांबुळकी मान, या मानेभोवती गुंडाळल्यासारखी दिसणारी कॉलर, चुरगळलेला कोट. पण, तो होता अब्राहम लिंकन!
 
1860 साली स्प्रिंगफील्डचा खासदार अब्राहम लिंकन ‘कूपर इन्स्टिट्यूट’मध्ये गुलामगिरी प्रथेच्या विरोधात भाषण देण्यासाठी न्यूयॉर्कला आला. न्यूयॉर्कला आलेला कोणताही माणूस प्रथम ब्रॅडीच्या स्टुडिओत जाऊन स्वतःचा फोटो काढून घ्यायचा. लिंकननेही तेच केले. नंतर तो भाषणाला गेला. त्याचे ते भाषण कमालीचे गाजले. त्या भाषणानेच त्याला 1860 वर्षाच्या अखेरच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपद मिळवून दिले.
 
1861 सालच्या मार्चमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर, देशातला सर्वांत यशस्वी फोटोग्राफर म्हणून मॅथ्यू ब्रॅडीचा जेव्हा लिंकनशी परिचय करून देण्यात आला; तेव्हा लिंकन म्हणाला, “मिस्टर बी, याला कोण ओळखत नाही. त्याने काढलेला फोटो आणि ‘कूपर इन्स्टिट्यूट’मधले ते भाषण यांनीच तर मला विजय मिळवून दिलाय.”
 
लगेचच म्हणजे एप्रिल 1861 साली अमेरिकेचे प्रख्यात ‘यादवी युद्ध’ सुरू झाले. उत्तरेेकडच्या प्रांतांनी गुलामगिरी पद्धत रद्द करण्याच्या लिंकनच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दक्षिणेकडच्या प्रांतांना मात्र गुलामगिरी पद्धत हवी होती. ते प्रांत म्हणाले की, “आम्ही अमेरिकन संयुक्त संस्थानांमधून वेगळे निघतो.” लिंकनने या फाळणीला ठाम विरोध केला. यावरून रीतसर युद्ध सुरू झाले.
 
तरुण मुले उत्साहाने सैन्यात भरती होऊन आघाडीवर जाऊ लागली. मॅथ्यू ब्रॅडीने त्यांचे फोटो काढून जपून ठेवण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रवृत्त करणार्‍या कल्पक जाहिराती छापल्या. थोडक्यात, व्यावसायिक दृष्टी दाखवून खूप धंदा केला. पण, मग अचानक त्याला जाणीव झाली की, हे साधे युद्ध नाही. हा फार मोठा इतिहास घडतो आहे. तो कॅमेर्‍यात बांधून ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे; झाले. ब्रॅडी त्या दिशेने कामाला लागला. तत्कालीन कॅमेरे रणांगणावर नेणे, तेथे ते स्थिरपणे उभे करणे, हे सोपे काम नव्हते. पण, आपला जुना मित्र जनरल विनफिल्ड स्कॉट याच्या मदतीने ब्रॅडी पुन्हा थेट लिंकनपर्यंत पोहोचला आणि त्याने रणांगणावर जाऊन प्रकाशचित्रण करण्याची परवानगी मिळवली. अर्थात, हे प्रकरण किती खर्चिक आणि धोकादायक आहे, याची लिंकनला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्याने परवानगी दिली; पण सर्व जबाबदारी ब्रॅडीची स्वतःची असेल, हेही बजावून सांगितले. मित्र, बायको, हितचिंतक हे सगळे जण पुनःपुन्हा विनवण्या करीत असूनही ब्रॅडी ‘बुल रन’ इथल्या लढाईत जातीने हजर राहिला आणि त्याने लढाईचे प्रकाशचित्रण केले. युद्धात फोटोग्राफीचा वापर झाल्याची आधुनिक युगातली ही पहिली घटना आणि अशा प्रकारे युद्ध कॅमेर्‍याद्वारे ‘कव्हर’ करणारा पहिला प्रकाशचित्र वार्ताहर, म्हणजे मॅथ्यू ब्रॅडी उर्फ ‘मिस्टर बी.’
 
नंतर मात्र ब्रॅडीने स्वतः रणांगणावर न जाता दोन डझन प्रकाशचित्रकार नोकरीवर ठेवले. जेम्स गार्डनर, टिमोथी ओसुलिवान, विल्यम पायवेल, जॉर्ज बर्नार्ड, टॉमस रोश हे त्यांपैकी काही नामवंत लोक. या सगळ्यांनी वेगवेगळ्या रणभूमींवर प्रत्यक्ष हजर राहून अक्षरशः हजारो प्रकाशचित्रे काढली. त्यामुळे अमेरिकन जनतेला रणांगण काय असते, याचा बराच प्रत्यक्ष अंदाज आला.
 
इथे तत्कालीन प्रकाशचित्रण तंत्राबद्दल थोडे सांगायला हवे. तत्कालीन कॅमेरे फक्त स्थिरचित्रण करू शकत होते. त्यांना ‘एक्सपोझर’साठी फार वेळ लागत असे. त्यामुळे समोरची वस्तू जराशी जरी हलली, तरी चित्र ‘ब्लर’ म्हणजे धूसर होत असे. म्हणजे ब्रॅडी आणि त्याच्या सहकार्‍यांनी काढलेली चित्रे ही स्थिर आहेत. प्रत्यक्ष ‘अ‍ॅक्शन’ त्यांना कॅमेर्‍यात पकडता येत नव्हती. पण, ‘अ‍ॅन्टिएटम’ इथल्या लढाईत ठार झालेल्या हजारो लोकांची प्रेते आणि तोफांच्या मार्‍याने उद्ध्वस्त झालेला परिसर यांची प्रत्यक्ष स्थिर चित्रे पाहूनही लोक हादरून गेले. युद्ध हे किती भीषण आणि विनाशक असते, हे त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी नव्हे, पण निदान कॅमेर्‍याच्या डोळ्यांनी तरी कळले.
 
‘यादवी युद्धा’च्या साधारण चार वर्षांच्या काळात बॅ्रडीने किमान दहा हजार प्रकाशचित्रे काढली. यासाठी त्याला त्या काळी एक लाख डॉलर्स खर्च आला. पुढे युद्ध संपले. अमेरिका अभंग राहिली. पण, लवकरच अब्राहम लिंकनचा खून झाला. नव्या सरकारकडे ब्रॅडीने अर्ज केला की, आपण काढलेली चित्रे हा संपूर्ण देशाचा एक ऐतिहासिक ठेवा आहे. तेव्हा सरकारने तो विकत घेऊन त्याचे संग्रहालय बनवावे. पण, नव्या सरकारने या प्रस्तावाला चक्क नकार दिला.
 
भारतीयांना इतिहासाची दृष्टी नाही. ते चित्रे, पत्रे किंवा कसलीही दस्तऐवजी साधनसामग्री जपून ठेवत नाहीत, म्हणून शिमगा करणार्‍या अर्धवट सुशिक्षितांनी वरील घटना नीट लक्षात ठेवावी. ऐतिहासिक ‘यादवी युद्धा’ची प्रत्यक्ष चित्रे विकत घेऊन जपून ठेवण्यास, नव्या अमेरिकन सरकारने चक्क नकार दिला.
 
आणि इथून मॅथ्यू ब्रॅडीच्या नशिबाचा फासा पलटला. त्याचे दिवाळे वाजले. त्याला आपला स्टुडिओ विकावा लागला. त्याचा चित्रसंग्रह म्हणजे ‘ग्लास निगेटिव्हज्’ चक्क लिलावात निघाला. अनेक इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट लोकांनी त्या काचा स्वस्तात विकत घेऊन, आपापल्या गिर्‍हाईकांच्या बंगल्यांच्या खिडक्यांना लावल्या. सूर्याच्या प्रखर प्रकाशाने त्या काचांवरच्या प्रतिमा हळूहळू नाहीशा करून टाकल्या. अमेरिकन ‘यादवी युद्धा’च्या इतिहासाची साधने अशी अनेक कथित सुशिक्षितांच्या डोळ्यांदेखत नाहीशी झाली.
 
अखेर त्यातल्या बर्‍याच काचा 1912 साली एडवर्ड ईटन या संशोधकाला एका धुळीने नि कोळीष्टकांनी भरलेल्या पेटीत सापडल्या. त्याने ती चित्रे ‘दि फोटोग्राफिक हिस्ट्री ऑफ सिव्हिल वॉर’ या नावाने प्रसिद्ध केली. स्वतः मॅथ्यू ब्रॅडी मात्र त्यापूर्वीच, म्हणजे 1896 साली न्यूयॉर्कच्या एका सार्वजनिक रुग्णालयात पूर्ण कफल्लक अवस्थेत मरण पावला.
 
आज त्याच्या एकंदर चित्रांपैकी सहा हजार चित्रे ‘नॅशनल आर्काईव्हज्’मध्ये जतन करून ठेवण्यात आली आहेत. ‘मिस्टर बी’ या प्रकाशचित्रण क्षेत्रातल्या महान कलावंताची एवढीच स्मृती शिल्लक आहे.‘मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय, हाय!’ हाच अखेर सर्वभक्षक काळाचा न्याय आहे.
 
 
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.