बैठ्या चाळीत थाटली मशीद

22 Mar 2025 11:51:46
 
Mosque built in charkop Chawl yogesh sagar
 
मुंबई: ( Mosque built in charkop Chawl yogesh sagar ) चारकोपच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये बैठ्या चाळीत तीन घरे एकत्र करून त्यांचे मशिदीत रूपांतर केल्याची धक्कादायक माहिती आ. योगेश सागर यांनी शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी विधानसभेत दिली.
 
हा प्रकार अत्यंत गंभीर असून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर, “संबंधित अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम एका महिन्याच्या आत पाडण्यात येईल,” अशी ग्वाही मंत्री शंभुराज देसाई यांनी सरकारच्या वतीने दिली.
 
आ. योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा गंभीर प्रकार विधानसभेत मांडला. ते म्हणाले की, ‘’चारकोप, सेक्टर-१ मध्ये प्लॉट नं. १४५ वर ‘नशेमन सहकारी गृहनिर्माण संस्था’ ही ‘म्हाडा’ची निवासी वास्तू अस्तित्वात आहे. तेथील खोली क्र. १४ ते १६ मध्ये अनधिकृतरित्या मशीद सुरू करण्यात आली आहे. या खोली मालकांनी धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत हाऊसिंग सोसायटी, महापालिकेकडून अथवा ‘म्हाडा’कडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही. सद्यस्थितीत या सोसायटीतील ३० पैकी २७ घरांमध्ये हिंदू कुटुंबे राहतात. मशिदीमुळे मुस्लीम समाजाच्या व्यक्तींची या वास्तूत सातत्याने वर्दळ असते.
 
स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी संबंधितांनी मुंबई पालिका, स्थानिक पोलीस, ‘म्हाडा’ आणि लोकप्रतिनिधींकडे केल्या. ही बाब अतिशय गंभीर असून या परिसरात नाहक जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबीची तातडीने चौकशी करून कारवाई करावी. हाऊसिंग सोसायटीमधून मशीद तत्काळ हटविण्यात यावी,” अशी मागणी योगेश सागर यांनी केली. त्यावर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की
 
“संबंधित हाऊसिंग सोसायटीत ३५ बैठ्या खोल्या आहेत. त्यातील १४, १५ आणि १६ क्रमांकाच्या खोल्या विशिष्ट समाजाच्या आहेत. स्थळपाहणी केल्यानंतर या खोल्या एकत्र करून अनधिकृत प्रार्थना स्थळ तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची सुनावणी दि. १८ मार्च रोजी संबंधितांना नोटीस पाठवून ठेवण्यात आली होती. मात्र, त्यास कोणीही हजर राहिले नाही किंवा लेखी म्हणणे मांडले नाही. सकृतदर्शनी हे धार्मिक स्थळ बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आल्याने एका महिन्याच्या आत हे अतिक्रमण पाडण्यात येईल. ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल करण्याबाबत ‘म्हाडा’च्या क्षेत्रीय अधिकार्‍यांना सूचना केली जाईल,” असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0