मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dr. Hedgewar book publishing in Rajbhavan) "देशात आजही काही राज्यांमध्ये फुटीरतावादी प्रवृत्ती सक्रिय असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. हेडगेवार यांचा एकतेचा संदेश पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक झाला आहे.", असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. शनिवार, दि. २२ मार्च रोजी राजभवन येथे ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा लिखित 'हेडगेवार : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी' हा इंग्रजी चरित्रात्मक ग्रंथ राज्यपालांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल उपस्थितांना संबोधत पुढे म्हणाले, आपसांत एकी नसल्याने अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी भारतावर अनेक दशके राज्य केले. याच फुटीरतेमुळे महाराणा प्रताप यांना देखील पराभव स्विकारावा लागला होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराज अश्या फुटीर प्रवृत्तींना पुरून उरले. परकीय शासकांमुळे भारत एकसंध राष्ट्र झाला, असे चुकीचे दावे अनेकदा केले जातात. मात्र सम्राट अशोक यांच्या काळात भारत कितीतरी दूरपर्यंत जोडला गेला होता, हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक व अध्यात्मिक दृष्टया भारत नेहमीच एक राष्ट्र होते.
ग्रंथ लिहिण्यामागचा सात वर्षांचा प्रवास तसेच ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त करताना लेखक सचिन नंदा म्हणाले, "प.पू. डॉ. हेडगेवारांचे संघ प्रवासातील विविध पैलू उलगडणारे हे पुस्तक आहे. त्याचबरोबर डॉ. हेडगेवारांच्या विलक्षण जीवनाबरोबर त्यांचा राजकीय प्रवास उलगडून दाखविणारे देखील हे पुस्तक आहे. वसाहतवादी भारतातील एका अनाथ मुलापासून देशाच्या इतिहासात विश्व स्तरावर कार्य करणाऱ्या संघटनेटचे शिल्पकार असा डॉ. हेडगेवार यांचा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे."
पुढे ते म्हणाले, "आधुनिक भारत समजून घेण्यासाठी आपल्याला आधी संघ समजून घ्यावा लागेल. हिंदू समाजातील समस्या समजून घेण्याच्या आणि त्या सोडवण्याच्या त्यांच्या संघर्षांवरही हे पुस्तक प्रकाश टाकते. चरित्रात्मक लेखनापेक्षा अधिक भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांचा सखोल शोध म्हणून मी या पुस्तकाकडे अधिक लक्ष दिले. संघाची निर्मिती आणि आज भारतावरील त्याचा प्रभाव यावर एक सूक्ष्म दृष्टीकोन सादर करण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे केला आहे."
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन, सचिन नंदा यांच्यासह एशियन पेंट्सचे प्रवर्तक जलज दाणी, अवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल, मोहित डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहित मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या शारदा यांनी केले. हे पुस्तक अमेरिकेतील पेंग्विन पब्लिशिंग ग्रुपद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.