...तर नागपूरातील दंगेखोरांची मालमत्ता विकणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

    22-Mar-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis Nagpur Violence
 
नागपूर : नागपूर हिंसाचार प्रकरणात आता जे काही नुकसान झाले ते सगळे दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता विकली जाईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "औरंगजेबाची कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जाळल्याचा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला. त्यानंतर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात जमाव तयार झाला आणि त्यांनी तोडफेड, दगडफेड करत गाड्या तोडल्या. लोकांवर हल्ला केला. जवळपास चार-पाच तासांतच या संपूर्ण दंगलीला पोलिसांनी आवर घातला. या घटनेशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि लोकांनी केलेल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून दंगेखोरांना अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. आतापर्यंत १०४ लोकांची ओळख पटली असून ९२ लोकांना अटक केली आहे, तर १८ वर्षांच्या खाली असलेल्या १२ जणांवर कायद्यानुसार कारवाई सुरु आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  अजितदादा-जयंत पाटील भेटीवरून राऊतांना पोटशूळ! म्हणाले, "त्यांचे उत्तम..."
 
'त्या' लोकांना सहआरोपी करणार!
 
"जो जो व्यक्ती दंगा करताना आणि दंगेखोरांना मदत करताना दिसतो त्या प्रत्येकावर कारवाई करण्याची पोलिसांची मानसिकता आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचे ट्रॅकिंग करून ज्यांनी ही घटना घडण्यासाठी प्रवृत्त करणारी पोस्ट केली त्या सर्वांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवले जाणार आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आतापर्यंत जवळपास ६८ पोस्ट डिलीट झाल्या असून आणखी काही पोस्टची माहिती घेणे सुरु आहे," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "या घटनेत ज्या लोकांचे नुकसान झाले त्या सर्वांना येत्या तीन ते चार दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आता जे काही नुकसान झाले ते सगळे दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता विकली जाईल. नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. नागपूरचा एक शांततेचा इतिहास राहिला आहे. १९९२ नंतर नागपूरमध्ये कधीही अशी मोठी घटना घडली नाही. त्यामुळे आता या दंगेखोरांना सरळ न केल्यास त्यांना अशीच सवय पडेल. त्यामुळे अशा घटना सहन न करण्याच्या सूचना पोलिस विभागाला देण्यात आल्या आहेत," असेही त्यांनी सांगितले.