नागपूर हिंसाचाराचे मालेगाव कनेक्शन? काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

    22-Mar-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
नागपूर : नागपूर हिंसाचाराच्या घटनेत मालेगावचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शनिवार, २२ मार्च रोजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागपूर प्रकरणाच्या बांग्लादेशी कनेक्शनबाबत तपास सुरु आहे. जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करतात त्यातील काही लोकांच्या पोस्टमध्ये अशा गोष्टी आढळल्या ज्या बांग्लादेशी वाटतात. परंतू, आज यात बांग्लादेशी अँगल आहे किंवा विदेशी हात आहे असे म्हणणे उचित होणार नाही. या घटनेत मालेगावचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मालेगावमधील जे पक्ष या दंगेखोरांना मदत करताहेत आणि आरोपींनी तिथे जे ऑफिस उघडले यातून मालेगाव कनेक्शन दिसत आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  ...तर नागपूरातील दंगेखोरांची मालमत्ता विकणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा
 
दंगेखोरांना कठोर शासन दिल्याशिवाय थांबणार नाही!
 
"महिला पोलिसावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. परंतू, माध्यमांनी ज्याप्रकारे बातम्या चालवल्या त्याबाबत मी स्वत: पोलिस आयुक्तांकडून माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, तशा प्रकारचा अभद्र प्रकार झालेला नाही. पण महिला पोलिसावर दगडफेक करणे ही बाबसुद्धा चुकीची असून याबाबत कारवाई करण्यात येईल. या घटनेत सहभागी लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही," असेही ते म्हणाले.
 
दंगेखोरच दंग्याची चौकशी करणार!
 
नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसने स्थापन केलेल्या समितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "ज्यांच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे तो आरोपीच काँग्रेसच्या समितीचा सदस्य आहे. याचा अर्थ आता दंगेखोरच दंग्याची चौकशी करण्यासाठी येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरश: लांगूलचालन आणि पाय चाटणे आहे," अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.