प्रेमाची अलवार वीण उलगडणारा ‘हार्दिक शुभेच्छा’

    22-Mar-2025   
Total Views |
 
 
 
 
 
 
प्रेम, नातेसंबंध आणि हास्याचा सुरेख संगम साधणारा ‘हार्दिक शुभेच्छा’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. चित्रपटाची सुरुवातच मुळी एका मजेशीर ‘व्हॉईस ओव्हर’ने होते, जो लगेचच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. माधव (पुष्कर जोग) हा एक सरळसोट, प्रेमाच्या शोधात असलेला तरुण. त्याच्या पालकांनी त्याच्या लग्नाची जबाबदारी उचलली असून, सतत नव्या मुलींचे फोटो ते त्याला पाठवत असतात. पण, माधवला त्याच्या मनासारखी मुलगी काही पसंत पडत नाही. त्याचा मित्र रवी (पृथ्वीक प्रताप) त्याला सतत प्रोत्साहन देत असतो. त्याच्या चेष्टेखोर स्वभावामुळे चित्रपटात विनोदाचा एक खुसखुशीतपणा कायम जाणवतो. पुढे माधवची भेट राधिकाशी (हेमल इंगळे) होते आणि इथूनच त्यांच्या प्रेमाची गोडसर गोष्ट सुरू होते.
 
पहिली भेट थोडीशी गोंधळलेली, पण त्यानंतर दोघांमधील गप्पा वाढू लागतात, नाते फुलायला लागते. चित्रपटातील हलक्या-फुलक्या संवादामुळे कथानक पुढे सरकत राहते. मात्र, भूतकाळातील काही घटना राधिकाला माधवपासून दूर ठेवतात, ज्यांमुळे कथेमध्ये नाट्यमय प्रसंग निर्माण होतात. एकूणच चित्रपटातील संवाद, कलाकारांचे हावभाव आणि रमणीय दृश्यांची मांडणी यामधून कथा अधिकच रंजक बनते.
 
वेगवेगळे विषय निवडून त्या विषयांवर सादरीकरण करण्यात मराठी चित्रपटसृष्टीचा मोलाचा वाटा आहे. पुष्कर जोग हा मराठी चित्रपटसृष्टीतील असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या अभिनयशैलीत सातत्याने नवनवे प्रयोग केले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची कथा जरी प्रेमकथेभोवती रुंजी घालणारी असली, तरी ती मांडण्याची पद्धत मात्र नेहमीच वेगळी आणि अनोखी असते. महत्त्वाचे म्हणजे, ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द पुष्कर जोगने केले आहे. प्रेमातल्या समस्यांवर पळ काढण्यापेक्षा त्यावर तोडगा काय, या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही तुमचे नाते टिकवण्यात यशस्वी ठरू शकता. त्याकरिता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! असा संदेश हा चित्रपट देऊन जातो.
 
'Captain of the Ship’ म्हणजेच संपूर्ण चित्रपटाची जबाबदारी स्वीकारणारा दिग्दर्शक आणि त्यासोबत अभिनयाचे ओझे किती मोठे असते, हे त्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीलाच ठावूक. अशाप्रकारे जेव्हा हा कप्तान दोन्ही बाजूंनी खिंड लढवत असेल, तेव्हा साहजिकच त्याची जबाबदारी आणखी वाढते. पण, पुष्कर जोगने ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटामध्ये केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर प्रत्येक कलाकाराचा अभिनय खुलून दिसेल, याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभ्यास, त्या भूमिकांना दिलेली भावनिक बैठक आणि त्यांच्या अभिव्यक्तींवर घेतलेली मेहनत, यामुळे त्याचे विशेष कौतुक करावेसे वाटते. अभिनयातली सहजता आणि प्रत्येक प्रसंगातील बारकावे जपत, पुष्करने हा चित्रपट फक्त एक भूमिका म्हणून नाही, तर संपूर्ण अनुभवच म्हणून जिवंत केला आहे. त्यामुळे दुहेरी जबाबदारी सांभाळताना त्याने कर्तव्यात कुठेही कसूर केलेली नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
पुष्कर जोगने माधवच्या भूमिकेत उत्तम अभिनय केला आहे. त्याच्या भूमिकेचा साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव अगदी सहज भावतो. एका प्रेमकथेला वेगळ्या पद्धतीने उलगडताना पुष्करने माधवच्या व्यक्तिरेखेत नवा गहिरेपणा दिला आहे. नायक असला, तरी तो परिपूर्ण नाही. त्याच्या चुकाही आहेत, गोंधळसुद्धा आहे. परंतु, प्रेमप्रवासात तो शिकत जातो, बदलत जातो. त्यामुळे माधवची भूमिकाही प्रेक्षकांशीही आपसुकच जोडली जाते.
 
विनोदाची महाराणी असलेल्या विशाखा सुभेदारची भूमिकादेखील तितकीच लक्षवेधी ठरली आहे. माधवची आई म्हणून तिने उत्तम भूमिका साकारली आहे. एका बाजूला विनोद आणि आपल्या मुलाप्रति असलेली तिची काळजी, प्रेम फक्त संवादातूनच नाही, तर डोळ्यांतूनही दिसून येते. एकूणच तिच्या अभिनयात गहिरेपणा आहे. चित्रपटातील एक प्रसंग विशेष अधोरेखित करावासा वाटतो. जिथे विशाखा आणि अभिजीत त्यांच्या मुलाच्या म्हणजेच माधवच्या भविष्याची काळजी करत असतात, तेव्हा आपण आपल्या मुलासाठी १३ स्थळे पाहिली, पण त्याने सगळ्या मुलींना नकार दिला. त्यावेळी विशाखा सहज बोलून जाते, “काय हो, आपल्या मुलाला मुलींऐवजी मुले तर आवडत नसतील ना?” यावर अभिजीतने दिलेली प्रतिक्रिया पाहून हसल्याशिवाय राहवत नाही. पृथ्वीक प्रताप (रवी) आणि अभिजीत चव्हाण (वडील) या व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी या चित्रपटात प्रासंगिक विनोदाची अचूक ‘टायमिंग’ साधून हास्याचे रंग भरले आहेत, तर दिग्गज अभिनेते विजय पाटकर हॉटेल मॅनेजरच्या भूमिकेत दिसून येतात. नेहमीप्रमाणेच ‘कॉमिक टायमिंग’चा अप्रतिम उपयोग करून त्यांनी गंभीर प्रसंगातसुद्धा हास्यनिर्मिती केली. याचा एक प्रसंग सांगायचा झाला, तर युरोपमधल्या हॉटेलमध्ये एका व्यक्तीशी तुटकपणे इंग्रजी भाषेत साधलेला संवाद आणि त्याचबरोबर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे विनोदाची उकळी फुटल्याशिवाय राहात नाही. विजय पाटकर यांनी केवळ विनोदचे नाही, तर माधवला समजून घेणारा आणि समजावून सांगणारा वरिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे भूमिका बजावली.
 
चित्रपटात संहिता, कथा, अभिनय हे सगळे जितके महत्त्वाचे तितकेच चित्रपटाला आणखी रंजक करण्याचे माध्यम म्हणजे पार्श्वसंगीत. बर्‍याचदा चित्रपटाची कथा संथ आणि पार्श्वसंगीताचा उद्रेक जास्त असला की, चित्रपट समतोल राखण्यात असमर्थ ठरतो. ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातले संगीत त्या त्या प्रसंगाला पूरक होते. ’रंगून या प्रेमात’ हे संगीत त्यांच्या प्रेमाच्या प्रसंगाला अगदी साजेसे आहे. या संगीताने आपल्या मन:पटलावर आपापल्या प्रियकर-प्रेयसीसोबतचे प्रेमळ क्षण कल्पित होऊ लागतात आणि कळत-नकळतपणे ओठांवर स्मितहास्य उमटते. स्मितहास्य का येऊ नये? प्रेमाच्या सुमधुर सुरांना सोनू निगमच्या आवाजाचा स्पर्श असेल तर क्या बात...! चित्रपट संपल्यानंतरही एक गाणे गुणगुणत बाहेर पडाल, हे मात्र नक्की. चित्रपटाचे पार्श्वसंगीत ही त्याची आणखी एक जमेची बाजू. प्रत्येक दृश्यात सहज मिसळणारे संगीत प्रेक्षकांना भावनिकरित्या गुंतवून ठेवते. पार्श्वसंगीताचा एक प्रसंग सांगायचा झाला, तर राधिका हे पात्र जेव्हा भूतकाळात डोकावते, त्या भयानक दृश्यांना दिलेले पार्श्वसंगीत खरोखरच मनाला धस्स करणारे आहे.
 
‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे, युरोप आणि पॅरिसमधील मनमोहक स्थळांवरील चित्रीकरण. चित्रपटातील दृश्यांमध्ये या रम्य ठिकाणांचे सौंदर्य अत्यंत देखण्या पद्धतीने टिपण्यात आले आहे. सहसा मराठी चित्रपटांमध्ये परदेशात चित्रीकरण करणे, हे आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान असते. पण, पुष्कर जोगने या सर्व अडचणींवर मात करून, शक्य तितक्या वास्तव ठिकाणी चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या धाडसी विचारसरणीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत नवा बदल घडू शकतो. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दर्जेदार आणि व्यापक स्वरूपाचे होतील, असा विश्वास या चित्रपटाद्वारे निर्माण केला आहे.
 
‘हार्दिक शुभेच्छा’ हा चित्रपट एक हलकाफुलका, मनोरंजक आणि भावनिक चित्रपट आहे. त्यात हास्य, प्रेम, संघर्ष आणि उत्कंठा या सगळ्या भावनांचा समतोल साधण्यात आला आहे. माधव आणि राधिकाच्या नात्यात दाखवली गेलेली भूतकाळातली गुंतागुंत प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवते. शेवटी माधवला प्रश्नांची उत्तरे मिळतात का? त्याचे प्रेम यशस्वी होते का? माधव समजूत काढणारीच्याच प्रेमात पडतो की काय? राधिका तिच्या भूतकाळाला विसरू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट नक्की पाहा!
 
लेखन आणि दिग्दर्शन : पुष्कर जोग.
कलाकार : पुष्कर जोग, हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, किशोरी अंबये, पृथ्वीक प्रताप, अनुष्का सरकटे, पूर्वी मुंदडा
रेटिंग : ⭐⭐⭐
 
 
 
 
 

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.