'सोशालिस्ट डेमोक्रेटिक’ समूहाचे राफेल ग्लुक्समन यांनी अमेरिकेने ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा अर्थात स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा परत फ्रान्सला द्यावा, अशी तीव्र शब्दांत नुकतीच मागणी केली. यावर अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “फ्रान्सच्या राजनीतीतज्ज्ञाने लक्षात घ्यावे की, अमेरिका नसती तर फ्रान्स जर्मन भाषा बोलत असता. अमेरिका होती म्हणून फ्रान्स आत जर्मन भाषा बोलत नाही. त्यासाठी फ्रान्सने आमच्या महान देशाविषयी नेहमी कृतज्ञ राहायला हवे. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा फ्रान्सला कधीही परत दिला जाणार नाही.”
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा अमेरिकेने फ्रान्सला का परत द्यावा? यावर राफेल ग्लुक्समन यांचे म्हणणे की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची विदेशनीती ही स्वातंत्र्य मूल्यांच्या विरोधात आहे. अमेरिकेची युक्रेनबाबत भूमिका योग्य नाही. तसेच स्वतंत्रतावादी वैज्ञानिकांना अमेरिकेमधे नोकरीतून पायउतार केले गेले. त्यामुळे अमेरिकेला स्वातंत्र्य मूल्याची पर्वा नाही. मग स्वातंत्र्याचा संदेश देणारा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ अमेरिकेमध्ये काय कामाचा? त्यापेक्षा तो पुतळा फ्रान्सला परत द्यावा.” त्यांच्या या मागणीचे फ्रान्सच्या जनतेने स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे उच्चशिक्षण आणि अनुसंधानमंत्री फिलिप बापटिस्ट यांनी देशातील संशोधन क्षेत्रातील विविध संस्थांना आणि नेत्यांना आवाहन केले आहे की, अमेरिकेने नोकरीहून पायउतार केलेल्या वैज्ञानिकांना आपल्या देशात संशोधनाची संधी देण्यासाठी ठोस प्रस्ताव तयार करा. अमेरिकेतून संधी गमावलेल्या वैज्ञानिकांना फ्रान्स संधी देणार.
फ्रान्सच्या या भूमिकेमागे कारण काय? तर युरोपीय देशांनी अमेरिकेच्या व्हिस्कीवर ५० टक्के आयातशुल्क लावण्याची भूमिका घेतली. यावर ट्रम्प प्रशासनाने युरोपीय देशांतून त्यामध्ये फ्रान्सवरूनही येणार्या दारूवर २०० टक्के आयातशुल्काचे नियोजन केले. यामध्ये फ्रान्सचे आर्थिक नुकसान आहेच. त्याशिवाय फ्रान्सच्या ‘हवामान बदल’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामधून ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिका बाहेर पडली. यामुळेही फ्रान्सचे नुकसान झाले. या सगळ्यामुळे फ्रान्स हा अमेरिकेच्या विदेश तसेच आर्थिक नीतीच्या विरोधात आहे. कॅनडा, ग्रीनलँड आणि पनामा कालवा याबाबतही ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच अमेरिकेची युक्रेनसंदर्भात भूमिकासुद्धा युरोपसाठी अनुकल नाही. यामुळेही युरोपीय देश चिंताग्रस्त आहेत. अमेरिका आणि ट्रम्प यांच्याविरोधात थेट जाणे परवडण्यासारखे नाहीच. त्यामुळे फ्रान्सच्या ग्लुक्समन यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळाच परत मागितला.
असो. १८८६ साली अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त फ्रान्सने हा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा अमेरिकेला प्रदान केला.
फ्रान्सीसी ऑगस्टे बार्थोल्डी यांनी यांनी निर्मित केलेल्या २ लाख, ५० हजार पाऊंड वजनाच्या आणि १५५ फूट उंचीच्या तांब्याच्या पुतळ्याचे पूर्ण नाव आहे ‘लिबर्टी एनलाइटिंग द वर्ल्ड.’ रोमन देवता ‘लिबर्टस’च्या नावाने हा पुतळा आहे. हा पुतळा स्वातंत्र्य मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो. या स्वातंत्र्याच्या मूल्यांचा गजर करतच अमेरिका जगभरातल्या इतर राष्ट्रांच्या भूमिकेमध्ये मध्यस्थी करत असतो. असे असताना स्वातंत्र्यदेवीचा पुतळा परत द्या, ही मागणी फ्रान्सच्या राजनेत्याने केली आहे. अर्थातच, ग्लुक्समन यांची ही मागणी शुद्ध स्वातंत्र्याचा हेतू मनात बाळगून केली असेल का? तर नाहीच!
कारण, फ्रान्सची जनता राष्ट्रनिष्ठ आहे.देशविरोधी घटना, व्यक्ती आणि शक्तीविरोधात ही जनता एकवटते. त्यामुळे अमेरिकेच्या फ्रान्सविरोधी भूमिकेचे भांडवल केले, तर जनतमेमध्ये आपले नेतृत्व सिद्ध होईल, अशी खात्री ग्लुक्समन यांना असणारच, तर स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा परत मागणार्या फ्रान्समध्ये ‘आयफेल टॉवर’ला हिजाब घातलेली मेराचीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्याचा जयघोष करत हिजाबवर बंदी घालणारा फ्रान्स. मात्र, त्याच फ्रान्सचा मानबिंदू असलेल्या ‘आयफेल टॉवर’लाच हिजाब परिधान केलेले दाखवले गेले. स्वातंत्र्य मूल्यावरच घाला घालणारी ही कट्टरपंथी विचारधारा. या पार्श्वभूमीवर वाटते की, जगभरात अनेक वाईट घटना घडत असतात, तरीसुद्धा स्वातंत्र्याची प्रेरणा ही जगभरात कायम आहे. स्वातंत्र्यदेवतेच्या सन्मानासाठी वाटते, जगभरात कट्टरपंथी आक्रमणकर्त्या प्रवृत्तीचा नाश व्हावा आणि शाश्वत मानवी मूल्यांचा विजय व्हावा.