'महा-वन्यजीव नुकसान भरपाई अॅप'चे लोकापर्ण; नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया आता एका क्लिकवर

    21-Mar-2025
Total Views |
app for compensation


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
वन्यजीवांमुळे झालेली वित्त वा जीवित नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वन विभागाच्या माहिती तंत्रज्ञान आणि धोरण विभागाने 'महा- वन्यजीव नुकसान भरपाई अॅप' तयार केले आहे (app for compensation). या अॅपचे लोकार्पण शुक्रवार दि. २१ मार्च रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे (app for compensation). नागरिकांना वन्यजीवांमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या अर्ज या अॅपच्या माध्यमातून भरता येणार आहे. तसेच अर्जावरील प्रक्रिया देखील पाहता येणार आहे. (app for compensation)
 
 
राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे. काही प्रदेशांमध्ये माकड, रानडुक्कर, गवे, हत्ती आणि रोही या वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. वाघ आणि बिबट हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. अशा नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेत बऱ्याचदा दप्तरदिरंगाई होते. महिनोंमहिने नुकसान भरपाई ग्रस्त लोकांना वन विभागाच्या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. नागरिकांचा हा वेळ वाचवून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळखाऊ होऊ नये म्हणून वन विभागाने 'महा- वन्यजीव नुकसान भरपाई अॅप'ची निर्मिती केली आहे.
 
 
'प्ले-स्टोअर'वरुन 'महा- वन्यजीव नुकसान भरपाई अॅप' डाऊनलोड करता येणार आहे. शेतपिकांचे नुकसान, मानवावर झालेला हल्ला, पशुधन किंवा घरगुती प्राण्यांवर हल्ला याविषयीच्या नुकसान भरपाईचा अर्ज या अॅपमध्ये दाखल करता येणार आहे. तसेच नुकसान भरपाई मिळेपर्यंत अर्जाची सद्यस्थिती देखील या अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. मात्र, या अॅपमुळे शेतकऱ्यांचे मार्ग सुकर होणार की तांत्रिक माहितीच्या अभावी तो अधिक बिकट होणार, हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.


मुख्य वैशिष्ट्ये:
सोपा आणि मराठी व इंग्रजीत उपलब्ध
विना इंटरनेट ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा
अर्जाची स्थिती थेट ट्रॅक करण्याची संधी
पारदर्शक आणि वेगवान प्रक्रिया
हेल्पलाईन आणि थेट मदत
📲 डाउनलोड करा: महा वन्य-जीव भरपाई ॲप https://play.google.com/store/apps/details?id=com.mahaforest