आपल्या कारकिर्दीत राज्यातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अन्याय करण्याचे कर्तृत्व उद्धव ठाकरे सरकारने गाजविले आहे. सत्तेचा मद चढलेल्यांना आपली कुकर्मे कधीच बाहेर येणार नाहीत, असा विश्वास वाटत असतो. पण, खुनाला वाचा फुटते, यावर पोलिसांचा विश्वास असतो. आता गेली पाच वर्षे दाबून टाकण्यात आलेल्या दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता दिसत असून, त्यातून धक्कादायक सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
हिंदू तत्त्वज्ञानात काळ हा चक्राकार गतीत फिरतो, असे मानले आहे. त्यालाच ‘कालचक्र’ म्हणतात. केलेल्या कर्मांची फळे याच जन्मी भोगावी लागतात, असे हिंदू तत्त्वज्ञान मानते. त्यामुळे आपल्या राजकीय किंवा आर्थिक ताकदीच्या जोरावर केलेला एखादा गुन्हा काही काळ दाबून टाकता आला, तरी यथावकाश तो पुन्हा पृष्ठभागावर येतोच. दिशा सालियान या एका तरुण व्यावसायिक महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येऊ पाहात आहे, हा त्याच कालचक्राचा परिणाम!
पाच वर्षांपूर्वी दिशा सालियान ही चित्रपटसृष्टीशी संबंधित एक तरुण व्यावसायिक होती. उभरत्या कलाकारांच्या जनसंपर्काचे काम ती करीत असे. कथित आत्महत्या केलेला तरुण अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याही जनसंपर्काचे काम दिशाच पाहात असे. दिशाच्या आकस्मिक आत्महत्येचा सुशांतसिंहच्या मनावर सखोल आणि विपरित परिणाम झाला होता. आपणही लवकरच मरणार, असे तो वारंवार बोलत असे आणि तसेच झाले. दिशाच्या मृत्यूनंतर आठच दिवसांत सुशांतनेही आत्महत्या केली. या दोघांचे मृत्यू हे आत्महत्या होती की हत्या, हे गूढ आजही कायम आहे. आता हे गूढ अंशत: उकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी ‘सीबीआय’मार्फत व्हावी, असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. “दिशावर बलात्कार झाला होता आणि त्यात राज्यातील काही प्रभावशाली व्यक्ती गुंतल्या होत्या. त्यामुळे त्या गुन्ह्यावर पांघरूण टाकण्यासाठी तिला १४व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आले आणि तिने आत्महत्या केली, असे भासविले गेले” असा दावा सतीश सालियान यांनी आपल्या अर्जात केला आहे. “इतकेच नव्हे, तर या प्रकरणी तत्कालीन मंत्री आणि सध्याचे उबाठा सेनेचे आ. आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जावी,” असेही त्यांनी या अर्जात नमूद केले आहे. हा अर्ज दाखल झाल्यास राज्यात नवा राजकीय वादंग उठेल, हे निश्चित.
दिशाचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचा अहवाल पोलिसांकडून दाखल करून घेण्यात आला. दिशा आणि सुशांतसिंह या दोघांच्या आत्महत्येच्या स्थळावर असलेले अनेक पुरावे पोलिसांनीच मिटवून टाकले, अशा आशयाच्या बातम्या तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या होत्या. ज्या रात्री दिशाची हत्या झाली, त्या रात्री तिच्या घरी एक पार्टी होती. “या पार्टीत काही राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती सहभागी झाल्या होत्या,” असा दावा तत्कालीन आ. नितेश राणे यांनी केला होता. त्यांनी याप्रकरणी थेट आदित्य ठाकरे यांचे नावही घेतले होते. पण, “पोलिसांनी या तपासात त्यांचे नाव वगळले,” असा आरोपही त्यांनी केला होता. या पार्टीला आलेल्या अनेकांना गप्प बसविण्यात आले, तर काही जणांना मुंबईबाहेरही पाठवून देण्यात आले, अशा बातम्या वृत्तवाहिन्यांकडून आणि वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.
या दोन्ही तरुण व्यक्तींच्या मृत्यूबाबत संशय निर्माण व्हावा, असे वर्तन तत्कालीन सरकारच्या नेत्यांकडून झाले होते, यात शंकाच नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी आपणहून काही खुलासेही केले होते. दिशाच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासासंदर्भात न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, असा अर्ज ‘कॅव्हेट’ आदित्य ठाकरे यांच्या वकिलाने काही आठवड्यांपूर्वीच दाखल केल्यामुळे काहींच्या भुवया उंचावल्या होत्या. या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचा दावा आदित्य ठाकरे करीत असतात. मग त्यांनी हा अर्ज का केला, असा प्रश्नही वकिली वर्तुळात चर्चेत होता. आता या मृत्यूचा तपास नव्याने होणार असेल, तर त्यात ठाकरे यांच्या संबंध काय आणि किती होता, हेही स्पष्ट होईल.
परंतु, उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात राज्यात महिलांवर सर्वाधिक अन्याय-अत्याचार झाले, हे खरेच. याचा सविस्तर तपशील देणारे वृत्त दि. २० मार्च रोजीच्या अंकातच आम्ही प्रसिद्ध केले होते. त्यावरून ठाकरे यांच्या सरकारकडून आपल्या सत्तेचा दुरुपयोग कसा आणि किती केला गेला, ते स्पष्ट होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री हे आपल्यावरील टीकेबाबत अतिशय असहिष्णू होते. ज्यांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांची सत्तेचा गैरवापर करून मुस्कटदाबी करण्यात आली, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात रेडिओ जॉकी मलिष्का हिचेही प्रकरण आहे. मुंबईतील रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांवर उपहासात्मक गाणे रचल्याचा राग उद्धव ठाकरे यांना आला. कारण, महापालिकेत त्यांच्या पक्षाची सत्ता होती. त्यांनी महापालिका अधिकार्यांना तिच्या घरी पाठविले आणि तिच्या घरात डासांची पैदास होते, असा शोध लावला आणि त्याबद्दल तिला दंड केला. दीड कोटींची लोकसंख्या असलेल्या मुंबईत या अधिकार्यांनी नेमके मलिष्का यांचेच घर कसे निवडले, हा प्रश्नच आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात कारवाई असो की, केतकी चितळे या अभिनेत्रीला सबळ कारणाशिवाय महिना-दीड महिना तुरुंगात टाकण्यात आल्याचे प्रकरण असो, यावरून ठाकरे सरकारची आपल्यावरील टीकेकडे आणि महिलांकडे पाहण्याची दूषित व असहिष्णू दृष्टी स्पष्ट होते. खासदार असलेल्या नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती यांना ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालिसा म्हटल्याबद्दल तुरुंगात टाकण्यासारखे कृत्य केवळ ठाकरे सरकारच करू शकत होते. याच मुशीत तयार झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या हातून सत्तेच्या अहंकारातून काही दुष्कृत्य घडले असेल, तर त्यात काही नवल नाही.
दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूचे किती धागेदोरे शिल्लक आहेत, त्यातून आरोपींना शिक्षा होईल इतका पुरावा उपलब्ध आहे का, यांसारखे अनेक प्रश्न सध्या तरी काळाच्या उदरात आहेत. तिच्या मृत्यूचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविला गेला, तर त्यावर प्रकाश पडू शकतो. या तपासातून काय बाहेर येईल, ते आज सांगणे अवघड असले, तरी या तपासातून दिशाचा मृत्यू ही आत्महत्या होती की हत्या, ते निश्चितच स्पष्ट होईल.