मार्च महिना म्हटला की, कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचार्यांना वेध लागलेले असतात ते पगारवाढीचे आणि व्यवस्थापनाचे लक्ष असते ते कर्मचार्यांच्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यमापनाकडे. याबरोबरच काही कंपन्या वर्षभर सामाजिक वा परोपकारी क्षेत्रात आपल्या कर्मचार्यांनी त्यांच्या इच्छेनुसार काम करावे, यासाठी देखील प्रयत्नशील असतात. तेव्हा, कॉर्पोरेट क्षेत्रातील अशाच या आगळ्यावेगळ्या प्रोत्साहनाविषयी...
कंपन्या व कंपनी व्यवस्थापनातर्फे आपापल्या स्तरावर व विविध प्रकारे कर्मचार्यांना प्रोत्साहित केले जाते. या प्रोत्साहनाचा वा अशा उपक्रमांचा फायदा कर्मचारी-कंपनी या उभयतांना होत असतो. यामध्ये प्रत्यक्ष व्यवसाय वा तत्सम कामावर भर असणे स्वाभाविक असते. मात्र, त्याशिवाय अन्य प्रकारे व विविध स्वरूपात पुढाकार घेऊन सामाजिक वा परोपकारी क्षेत्रात आपल्या कर्मचार्यांनी त्यांच्या इच्छेनुसार व आवर्जून काम करावे, यासाठी भारतातील प्रमुख कंपन्या ज्या प्रकारे व पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देत आहेत, ते मुळातून पडताळून पाहणे देखील महत्त्वाचे ठरते. कंपनीच्या कर्मचार्यांना विविध प्रकारे परोपकारी व सामाजिक काम करण्यासाठी आवर्जून प्रोत्साहित करणार्या कंपन्यांमध्ये आपल्याकडील ‘इन्फोसिस’, ‘प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल’, ‘कॅप-जेमिनी’, ‘स्टॅन्डर्ड चार्टर्ड’, ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’, ‘वेट-अॅप व प्राईस अॅण्ड वॉटर’ यांसारख्या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
या उदाहरणादाखल नमूद केलेल्या कंपन्यांतर्फे आपल्या कर्मचार्यांना समाजातील विविध घटक व क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणार्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य सेवा, नागरी सेवा व आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण इत्यादी विषयात स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व प्रसंगी मार्गदर्शन केले जाते. विविध कंपन्यांच्या या समाजाभिमुख व कर्मचारीपूरक उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपन्यांतर्फे कर्मचार्यांना समाजसेवेसाठी देण्यात येणार्या प्रयत्नांमध्ये त्यांनी याकामी अधिकाधिक वेळ परिणामकारकरित्या देणे, त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविणे, त्यांच्या प्रयत्नांचे मूल्यमापन करून त्यांना आवश्यकतेनुरूप मार्गदर्शन करणे, त्यांच्या समाजसेवी प्रयत्नांना अधिक परिणामकारक करणे व अशा प्रकारे काम करणार्या कर्मचार्यांना कामाच्या तासांमधून सवलत व मुभा देणे, त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय काही कंपन्यांमध्ये तर सातत्यपूर्ण व परिणामकारकपणे समाजोपयोगी कामे करणार्या कर्मचार्यांच्या यशस्वी प्रयत्नांची दखल त्यांच्या कामकाजाचे वार्षिक मूल्यमापन व पगारवाढीच्या वेळी केले जाते, हे यासंदर्भात उल्लेखनीय.
कंपन्यांतर्फे कर्मचार्यांना सुलभ व सामान्य-जनांना उपयुक्त व प्रसंगी कमी वा फावल्या वेळात करता येण्यासारख्या कार्यक्रम आणि उपक्रमांना आवर्जून प्राधान्य दिले जाते. यामध्ये इंजिनिअरिंग अथवा ‘एमबीए’ पात्रता पूर्ण केलेल्या अथवा करणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाखतीची पूर्वतयारी, संवाद-संभाषण कला, व्यक्तिमत्त्व विकाम इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होत असतो. या प्रयत्नांचा संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीनंतरच्या रोजगारासाठीच्या मुलाखतीला सामोरे जाताना विशेष फायदा होतो. याशिवाय या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार्या उपक्रमांत सहभागी होण्याचे मोठे समाधान संबंधित कर्मचार्यांना लागत असते.
काही कंपन्या तर याच प्रयत्नातील पुढील टप्प्यात छोटी शहरे, जिल्हा स्थाने वा तत्सम ठिकाणच्या विशेषत: इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रत्यक्ष उद्योगांसाठी वा उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक विषयांवर व्याख्यानवजा मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करतात. याकामी कंपन्यांच्या अनुभवी तंत्रज्ञ वा व्यवस्थापकांना प्रोत्साहन दिले जाते व त्यांच्या अनुभवाचा फायदा नव्या विद्यार्थी-पदवीधरांना होतो. याशिवाय प्रत्यक्ष उद्योग-कारखान्याला भेट व चर्चा, अल्पकालीन उमेदवारी, प्रशिक्षण इत्यादी पण या विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा कौशल्य विकासाचे काम या कंपन्या व त्यांचे कर्मचारी समाधानकारकरित्या करतात. या उपक्रमाचा फायदा गेल्या आर्थिक वर्षात ६८ हजार विद्यार्थ्यांना झाला, ही आकडेवारी पुरेशी बोलकी ठरते.
याच धरतीवर ‘प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल’ या कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमाचा लाभ सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना झाला आहे. अशा प्रकारे शिक्षण आणि शिक्षणाशी संबंधित विविध उपक्रमांना आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. याचाच परिणाम म्हणजे, ‘प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल’ कंपनीच्या प्रयत्न आणि पुढाकारातून स्वयंसेवी पद्धतीने काम करणार्या सुमारे २५० युवकांना एकत्रित करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांच्या विविध गटांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रम व पात्रतेच्या जोडीला त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणार्या भावनिक प्रज्ञाशिलता, सकारात्मक विचार, सहकारी कार्यपद्धती, विश्लेषणपर वृत्ती, व्यावसायिक पत्रव्यवहार, संभाषणकला, स्वत:चा करिअर विकास व त्यासाठी करावयाचे प्रयत्न इत्यादीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.‘प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल’ कंपनीचा हा विद्यार्थी विकास प्रकल्प युवा स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर व पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राशिवाय गोवा, हिमाचल प्रदेश, गुजरात व तामिळनाडू या राज्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला. याला चांगला प्रतिसाद देखील लाभला.
विद्यार्थ्यांच्या ‘शैक्षणिक विकास’ विषयक प्रयत्नात कर्मचार्यांच्या माध्यमातून विशेष विकास विषयक उपक्रम यशस्वीपणे राबविणारी कंपनी म्हणून ‘कॅप जेमिनी’ कंपनीचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार, ‘कॅप जेमिनी’ कंपनीच्या ९० हजार कर्मचार्यांनी गेल्या वर्षी आपल्या उत्स्फूर्त प्रयत्नातून २ लाख, ४३ हजार तास प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी मोठे काम केले. याशिवाय कंपनी कर्मचार्यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शक करण्यात आले. आगामी काळात कंपनी कर्मचार्यांच्या या विशेष उपक्रम प्रयत्नात सुमारे २० टक्क्यांनी वाढ करण्याचा कंपनीचा मानस आहे. या नव्या उपक्रमात नव्याने पदवी वा पदवीका उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी योग्य प्रकारे स्वत:ची माहिती मांडणे, मुलाखतीची पूर्वतयारी, मुलाखतीचा सराव, अभिरूप मुलाखत यांसारखे मार्गदर्शन केले जाते हे विशेष. याशिवाय आता विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय साश्ररतेची जोड दिली जाणार आहे.
‘स्टॅन्डर्ड चार्टर्ड’ बँकेत तर कंपनीच्या धोरणात्मक निर्णयानुसार, बँकेच्या कर्मचार्यांना दरवर्षी तीन दिवसांची विशेष रजा सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून समाजकार्य करण्यासाठी दिली जाते. या दरम्यान कर्मचार्यांना त्यांच्या समाजकार्य प्रकल्पासाठी मार्गदर्शन व गरजेनुरूप साहाय्य केले जाते. ‘स्टॅन्डर्ड चार्टर्ड’ बँक आणि त्यांच्या कर्मचार्यांच्या संयुक्त सामाजिक प्रयत्नातून सुमारे १२ हजार कर्मचार्यांनी गेल्या वर्षी निवडक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते. यासाठी काही कर्मचार्यांनी अशा गरजू विद्यार्थ्यांचे ‘शैक्षणिक पालकत्व’ स्वीकारले आहे. यातून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शनासह पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया व विविध उपलब्ध संधी पोहोचविण्याचे मोठे व महत्त्वाचे काम होत आहे.
यावर्षीपासून ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीने सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम सातत्याने करणार्या कर्मचार्यांच्या सामाजिक योगदानाची विशेष नोंद घेत, त्यांच्या यशस्वी प्रयत्नांसाठी त्यांना प्रोत्साहनासह पुरस्कृत करण्याची विशेष योजना आखली आहे. हा उपक्रम कंपनीच्या १६ उत्पादक कारखान्यांसह मुख्यालय व विविध कार्यालयांच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. कंपनी अंतर्गत एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून याकडे कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी पाहात आहेत. कंपनी व्यवस्थापनानुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुमारे ८० टक्के कर्मचार्यांनी समाजकार्यात आपले योगदान द्यावे, यासाठी प्रयत्न करण्याची महत्त्वाकांक्षी योजना कंपनी कर्मचारी या उभयतांनी संयुक्तपणे आखली आहे. पूर्वी कंपनी स्तरावर समाजसेवा वा सामाजिक कामासाठी केवळ आर्थिक मदत देऊन आपल्या सामाजिक भानाची इतिश्री मानणार्या कंपन्या आज याकामी कर्मचार्यांना सोबत घेऊन प्रोत्साहन देत आहेत, ही बाब निश्चितच अभिनंदनीय ठरते.
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६