महिलांसाठी विशेषत: त्यांच्यात आत्मबळ निर्माण व्हावे, म्हणून कार्य करणार्या रणरागिणी गौरी बेनकर-पिंगळे यांच्याविषयी...
महिला स्वातंत्र्याबाबत आता तसे बघितले तर फार चिंतेची गरज नाही. कारण, प्रत्येक क्षेत्रात आपल्या भारतीय महिलांनी प्रगतीची शिखरे सर करून कर्तृत्वाचा इतिहास रचला आहे. सामान्य महिलांना मात्र अनेकदा पुरुषी वर्चस्वाचा सामना करताना मानसिक त्रास होताना दिसतो. तथापि, सामान्य महिलांची असामान्य कामगिरी आता अशा पुरुषी वर्चस्वाला जुमानणार नाही. उलट त्यांनादेखील खांद्याला खांदा लावून काम करण्याचा विश्वास देईल, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण होत आहे. व्यवसाय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी अनेक योजनांमुळे महिलांना उल्लेखनीय कामगिरी करता आली. त्यांच्या अशा वैविध्यपूर्ण आणि इतरांना प्रेरक अशा कामगिरीमुळे आपल्या सर्वांना अभिमान वाटावा, अशी स्थिती अनेक क्षेत्रात दिसून येते.
आज ज्यांची ओळख करून देण्याची संधी मिळाली त्या गौरी अक्षय पिंगळे या अशाच कर्तृत्ववान महिला. पुण्यातील धायरी येथे जन्मलेली ही रणरागिणी आपल्या सासर माहेरकडील पैलवानकीचा वारसा अत्यंत अभिमानाने जोपासत तर आहेच. मात्र, कालानुरूप आता महिलांना आव्हानांना तोंड देताना सशक्त होण्याची गरज ओळखून, त्या अत्यंत धाडसाने हे गौरवास्पद कार्य करीत आहेत. गौरी पिंगळे या सदैव सामाजिक कार्यात सक्रिय असतात. तथापि, त्यांच्या कुटुंबाचा इतिहास कुस्ती आणि सामाजिक कार्याशी निगडित आहे. त्यांचे श्वसूर प्रताप पांडुरंग पिंगळे यांनी समाजसेवेसाठी बहुमोल कार्य केले. शिवाय वडील दिवंगत पैलवान वसंतराव सयाजी बेनकर यांचीही कुस्ती क्षेत्रात मोठी परंपरा असल्याने गौरी बेनकर-पिंगळे यांनी सामाजिक कार्य, कुस्तीच्या क्षेत्रात महिला सशक्तीकरण, माळी-मराठा वधू-वर मेळावा, ‘शासन आपल्या दारी’ असे अनेक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला. ‘महात्मा फुले समता परिषदे’च्या माध्यमातूनदेखील त्या कार्यरत असतात.
कात्रज येथे महिला कुस्ती स्पर्धा भरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच फक्त १४ वर्षांखालील मुलींसाठी मॅटवरील तालुकास्तरीय कुस्तीगीर ही निमंत्रित रोख इनामाची स्पर्धा त्यांनी आयोजित केली. येथील प्रसिद्ध अशा मुंढवा जत्रेतदेखील महिलांची पहिली कुस्ती खेळविण्यात आली. योगायोगाने यावर्षी दि. ८ मार्च रोजी ही जत्रा आल्याने महिला सक्षमीकरणाचा येथे अध्याय लिहिला गेला. राष्ट्रीय विजेती सोनाली मंडलिक आणि संजना दिसले यांच्यातही चुरस रंगली. या कुस्तीत सोनाली मंडलिक यांनी विजय मिळवला. महिलांचे सशक्तीकरण आणि सुरक्षितता यावर त्यांचा कायमच भर असतो. त्यामुळे लहानपणापासूनच मुलींना लाल मातीत घडवले पाहिजे, अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे. “प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलींना संरक्षणाचे धडे द्यावेत, त्यांना आत्मरक्षण शिकवावे, तरच महिलांवरील अत्याचार थांबू शकतील, अत्याचाराचा सामना करण्याचे धाडस त्यांच्यात येईल,” असे त्या आवर्जून सांगतात.
मुंढवा येथील रहिवासी असलेल्या गौरी यांचे शिक्षण ‘एमकॉम’, ‘एलएलबी डीटीएल’ असे आहे. त्या येथील ‘आनंदी प्रतिष्ठान’च्या संस्थापक-अध्यक्ष, ‘आनंदी उद्योग समूहा’च्या संस्थापक-अध्यक्ष आणि ‘गौरी पिंगळे मोफत वधू-वर केंद्रा’च्या संस्थापक- अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात. ‘मुंढवा पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटी’च्या त्या सदस्यदेखील आहेत. विशेष म्हणजे, ओबीसी समुदायाच्या हक्कांसाठीचा अथक संघर्ष, आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीतले त्यांचे नेतृत्व अतुलनीय असे आहे.
गरिबांसाठी अन्नछत्र, महिला सक्षमीकरणाचे मोर्चे आणि युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे याद्वारे त्यांनी समाजाच्या मूलभूत गरजांकडे वेळोवेळी सरकारचे आणि समाजाचे लक्ष वेधले. झोपडपट्टी भागात शिक्षण आणि आरोग्यसेवा पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न समाजकार्याचा आदर्श ठरला आहे.
माहेरच्या बेनकर कुटुंबातून मिळालेला धाडसीपणा आणि सासरच्या पिंगळे कुटुंबाचा संघर्षशील वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. केवळ ओबीसी समाजापुरते मर्यादित न राहता, सर्व समाजाला एकत्र आणण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. गरजूंना मदत करणे आणि सढळ हाताने समाजासाठी खर्च करणे, हे त्यांचे जीवनसूत्र राहिले. १३ हजार महिलांना ‘आनंदी उद्योग समूहा’तून रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. ‘आनंदी प्रतिष्ठान’द्वारे १३ वर्षांमध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, कर्करोग शिबीर, महिलांसाठी महिलांना कायदेविषयक माहिती, संरक्षणाचे धडे, महिला दिनानिमित्त बुलेट रॅली, महिलांच्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कुस्तीचे आयोजन, महिलांचे सक्षमीकरण, महिलांचे प्रौढ वर्ग शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षण देणे, झोपडपट्टीमधील महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणे, आदी विविध उपक्रम त्या अविरत राबवित असतात. पिंगळे वस्ती, मुंढवा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘ओबीसी रणरागिणी पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क : ८८८८७५०६३०)