मुंबई,दि.२१ : प्रतिनिधी ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी. लांबीच्या खाडी किनारा मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेले असून या कामाची एकूण किमंत रू.३,३६४.६२ कोटी इतकी आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.४५ कि.मी. असून यातील ६.६४ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे या लांबीकरिता काम सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही, अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
या उत्तरात म्हंटले आहे की, या प्रकल्पाची एकूण लांबी १३.४५ कि.मी. असून यातील ६.६४ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. उर्वरित ६.८१ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक असून ही परवानगी प्राप्त करण्याची प्रक्रिया मे, २०२१ पासून ठाणे महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. यातील एकूण १५ टप्प्यांपैकी सध्या १४ टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. आता दि.०५. मार्च २०२५ रोजी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाची अंतिम परवानगी प्राप्त झाली आहे. त्यानुसारच, दि.०२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्राधिकरणाच्या कार्यकारी समिती बैठकीत या प्रकल्पाकरिता निविदा प्रक्रियेतील लघुत्तम निविदाकार मे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांची निविदा स्विकारण्यास मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पाकरिता प्राधिकरणामार्फत या प्रकल्पाचा सन २०२४ मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून सविस्तर प्रकल्प अहवालानुसार रू. ३,३६४.६२ कोटी इतकी रक्कम अंदाजित आहे. त्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त करून पुढील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.