चंदीगड : पंजाबमधील भटिंडामध्ये गुरू काशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिहार येथून आलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, बिहारमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले आणि तलवारीने हल्ला करण्यात आला असून अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली होती, तर काही विद्यार्थ्यांची हाडे तुटली असून विद्यार्थी रक्तबंबाळ दिसत होते. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली.
भटिंडाच्या गुरू काशी विद्यापीठातील पीडित विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या ५ दिवसांपासून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये बी. टेक. बी. फार्मा, बीसीए, एमसीए, एमबीएसारख्या विभागाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. ते शिक्षणासाठी आपल्या घरापासून कोसोमैलाहून दूर आले होते, पण आता त्याचा जीव धोक्यात आहे.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांमध्ये स्थानिक लोकही होते, ज्यांनी हल्ला करताना तलवारीचा वापर केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, पंजाब पोलिसांनी त्यांना मदत करण्याऐवजी बिहरमधील विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश असून त्यांचे असे म्हणणे आहे की, हल्लेखोरांमध्ये सुरक्षारक्षकांचाही समावेश असून त्यांनी गोळीबार केला. रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिक्षण मंत्र्यांना ईमेलच्या माध्यमातून माहिती पाठवून मदतीची हाक दिली आहे. या संबंधित घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
त्याच वेळी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. के. बावा म्हणाले की, ही लढाई बिहारी आणि पंजाबी विद्यार्थ्यांमध्ये नव्हती, तर बिहारमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये होती. एका गटाने त्यांच्या स्थानिक मित्रांना बोलावले आणि त्यांना विद्यापीठातून आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली. तसेच हल्लेखोर विद्यार्थ्यांची ओळख पटली असून त्यांना विद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे.