शेअर बाजारात आनंदी आनंद, ५०० अशांच्या वाढीसह ठरला ४ वर्षातील सर्वोत्तम आठवडा

21 Mar 2025 19:39:41
stock
 
मुंबई : जागतिक अर्थकारणातील उलथापालथींतही आपल्या तेजीचा सिलसिला कायम ठेवत भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी ५५७ अंशांची उसळी घेतली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजारात आनंदीआनंद पसरला होता. या आठवड्यात सेन्सेक्स सतत चढाच राहील्याने शेअर बाजारासाठी हा आठवडा ४ वर्षातील सर्वोत्तम आठवडा ठरला. शुक्रवारी जवळपास सर्वच महत्वाच्या क्षेत्रांत वाढ झाली. डॉलरच्या किंमतीत येणारी स्थिरता. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून भारतीय बाजारात गुंतवणुकीचा वाढलेला ओघ हे सर्व या उसळीला कारणीभूत ठरले आहे. यामुळे भारतीय गुंतवणुकदारांचाही उत्साह वाढला आहे.
 
शेअर बाजाराने ५५७ अंशांच्या उसळीसह ७६, ९०६ अंशांवर स्थिरावला. निफ्टीमध्येही १६० अंशांची वाढ होऊन, निर्देशांक २३,३५० अंशांवर स्थिरावला. शुक्रवारी बजाज फायनान्स, सन फार्मा, एलएनटी, कोटक महिंद्रा, नेस्टले इंडिया, टाटा मोटर्स या कंपन्यांचे शेअर्स जोरदार वधारले. क्षेत्रांमध्ये वित्त, ऊर्जा, हेल्थकेअर या क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली. या सर्वच कारणांमुळे शेअर बाजारात गुंतवणुकदार मालामाल झाले.
 
शेअर बाजारातील या उसळीमागे देशी गुंतवणुकदारांचा वाढता आत्मविश्वास हे प्रमुख कारण आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे दिले गेलेले संकेत यांमुळे गुंतवणुकदारांचा कल गुंतवणुकीकडे वाढतोय, तसेच डॉलरच्या स्थिरावणाऱ्या किंमतींनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील जोखीम कमी झाली आहे. हा सुध्दा भारतीय गुंतवणुकदारांचा विश्वास कायम राखण्यात मदत झाली आहे. हे सर्वच भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी अनुकुल वातावरण तयार करत आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0