मुंबई : वा! चित्राताई वाघ वा! अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी आमदार चित्रा वाघ यांचे तोंडभरून कौतूक केले. गुरुवार, २० मार्च रोजी अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केली. त्यावर चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले. याबद्दल नारायण राणे यांनी ट्विट करत त्यांचे कौतूक केले.
दिशा सालियनचे वडिल सतिश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करत दिशाच्या मृत्यूची चौकशी पुन्हा करावी अशी मागणी केली आहे. यावर सभागृहात चर्चा सुरु असताना उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी मंत्री संजय राठोड यांचे नाव घेत चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. यावरून चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी परब यांना जशास तसे उत्तर दिले.
याबद्दल कौतूक करताना नारायण राणे म्हणाले की, "छत्रपती शिवरायांच्या १५ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरपराध मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्यांना आपण चव्हाठयावर आणले. आपल्याला विरोध करणाऱ्यांच्याही तुम्ही चिंधड्या उडविल्या. तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज आहे. आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी तुमचा गौरवच केला असता. लगे रहो चित्राताई," अशा शब्दात त्यांनी चित्रा वाघ यांचे कौतूक केले.