कल्याण: ( Kalyan-Dombivli Municipal Corporation presents budget of Rs 3,361 crore ) कल्याण-डोंबिवली महापालिकेचा सन 2025-26 सालचा 3 हजार, 361 कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प गुरुवार, दि. 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ केली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणीतीही दरवाढ केली नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे. अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य व्यवस्था, लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था, उद्यान व इतर नागरी सोयीसुविधा यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी या अर्थसंकल्पास मान्यता दिली.
काय आहेत नव्या तरतुदी
1 ई-गव्हर्नन्सवर भर- महापालिका नागरिकांसाठी ‘सिटीझन फ्रेन्डली’
महापालिका सेवा नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्यासाठी ई-गव्हर्नन्स प्रणाली विकसित केली जाणार आहे. याद्वारे तक्रार निवारण प्रणाली सुधारली जाणार असून विविध सेवांची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होणार आहे.
2 उत्पन्न वाढीसाठी नवे उपाय
महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी मालमत्तांचे नवीन सर्वेक्षण आणि जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे कर संकलनाचा वेग वाढेल.
3 महिलांना काय मिळणार?
महिला व बालविकास विभागातंर्गत नोकरदार महिलांसाठी शहाड येथे महिला वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याला शासनाकडून प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे. महिलांना कायदेशीर सल्ला देण्याकरिता समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. बालवाडी सक्षमीकरणासाठी स्थापत्य, शिक्षण आणि आहार यांचे चांगले नियोजन करणार आहे. महिलांसाठी महापालिका विकास आरखड्यात वेगवेगळे आरक्षणाच्या तरतुदी आहेत. त्यानुसार महिलांच्या विविध संस्था बचतगटांना देण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शाळा सुरक्षित केल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविले आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने ही पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त परिमंडळ-3 मधील महिला पोलिसांच्या दामिनी पथकाकरिता 16 स्कूटी भेट देण्यात येणार आहेत.
4 शासकीय बससेवेला मिळणार बळकटी
या आधारावर राज्य शासनाच्या धोरणानुसार कडोंमपा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी या स्थानिक स्वराज्य संस्थांची एकत्रित परिवहन सेवा ‘केएमपीएमएल’द्वारे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यांच्या संरचनेला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. ही बससेवा प्रकल्प पुढे नेण्यासाठी सुरू आहे. उल्हासनगर, भिवंडी, कडोंमपाला 100 ई-बस उपलब्ध होणार आहेत. वेट लीज मॉडेलवर ही आधारित असणार आहे. यामुळे रिजन्ल ट्रान्सपोर्ट सेवेला बळकटी मिळणार आहे.
5 नागरिकांसाठी दिलासा-कोणतीही दरवाढ नाही
महापालिकेच्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ प्रस्तावित नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी ‘कॅपिट व्हॅल्यू बेस’ कर प्रणाली राबविण्याच्या प्रक्रियेसाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.