मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात न्यायालय काय म्हणते? न्यायालयात काय पुरावे दिले जातात? त्यावर पुढची भूमिका ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी दिली.
'वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. दिशा सालियन प्रकरणाविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ही सगळी चर्चा न्यायालयातील याचिकेमुळे सुरू झाली. उच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनीही एक मुलाखत दिली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणते? न्यायालयात ते काय पुरावे देतात? यावर पुढची भूमिका ठरेल. आतातरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आतातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मनपा निवडणूक एकत्र लढणार
महायुती मनपा निवडणूक एकत्र लढणार. मुंबईत एकत्र आहोतच, जेथे शक्य तेथे एकत्र लढू. मुंबई एकत्र हे पक्के, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना महायुतीत घेणार का, असा सवालही त्यांना विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंच्यासंबंधात आजतरी निर्णय झालेला नाही. त्यांचा निर्णय ते घेत असतात. त्या-त्यावेळी विचार केला जाईल, असे विधान त्यांनी केले.