ज्याची जशी लायकी तेवढाच...; चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

    21-Mar-2025
Total Views |

Chitra Wagh Sushma Andhare
 
मुंबई : ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात, असा पलटवार आमदार चित्रा वाघ यांनी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे. शुक्रवार, २१ मार्च रोजी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
गुरुवारी चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात सभागृहात खडाजंगी झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात. त्यांनी काल ज्यापद्धतीने माझ्याबद्दल ट्विट केले ते त्या नेहमीच करतात. सतत माझ्या कॅरेक्टरवर वेडेवाकडे बोलण्याचा प्रयत्न असतो. पण मला प्रश्न पडला की, हे अजून किती वर्षे हे प्रश्न विचारणार? माझ्या कॅरेक्टरला धरुन जे बोलले जाते, जे विचारले जाते, तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय? विषय सुषमा अंधारेंचा नव्हताच. त्यांचे नेते अनिल परब यांनी माझ्याकडे बोट दाखवून मला प्रश्न विचारला. मग मी त्यांना उत्तर देऊ नको का?" असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  वा! चित्राताई वाघ वा! खासदार नारायण राणेंकडून तोंडभरून कौतूक
 
महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला?
 
हा प्रश्न फक्त एकट्या चित्रा वाघचा नाही. तुम्ही महिलांवर दादागिरी करता? तुम्ही असाल मोठे शहाणे, पण महिलांचा अपमान करायचा, त्यांच्यावर दादागिरी करायची, त्यांचा आवाज दाबायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा मेसेज होता. पण या सटर फटर वटवाघळांची लायकी तेवढी आहे. कुठल्याही परिस्थितीतून काहीतरी घाणेरडे निर्माण करायचे आणि बोलायचे, अशी टीका त्यांनी सुषमा अंधारेंवर केली.
 
"मी जे बोलले त्याचा मला अभिमान आहे. महिलांना हलक्यात घेऊ नका हा मेसेज यातून दिला आहे. जेव्हा तुमच्याकडे बोलायला काही नसते तेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात. हम किसीको छेडते नहीं है. लेकिन हमें किसी ने छेडा तो उसे छोडते भी नहीं है, हा एकच उसूल आहे. कोण काय बोलते याने मला काहीही फरक पडत नाही. मी लढले आणि मी लढणार. आज ठेचले, परत नादी लागलात तर परत ठेचून काढेन," असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.
 
उद्धव ठाकरेंनीच पक्षप्रवेशासाठी निरोप पाठवला
 
"उद्धव ठाकरे यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता. चित्राताई एकदा येऊ भेटा. तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे, असा तो निरोप होता. मी जाणे न जाणे हा नंतरचा भाग होता. पण त्यांच्या शब्दाला मान म्हणून मी नक्की गेले होते. पण मी स्वत:हून गेले नव्हते तर त्यांनी मला बोलावले. त्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा होते. त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्याकडेदेखील घेऊन गेले. तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, मला ठरवू द्या मी अजून विचार केलेला नाही. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे देखील होते. मिलींद नार्वेकर यांच्याकडे स्वत: उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवला होता. बाळासाहेब जिथे बसायचे तिथले दर्शन घ्यायची माझी ईच्छा होती आणि यानिमित्ताने ही एकच गोष्ट त्यावेळी चांगली झाली. हा सगळा घटनाक्रम बोलण्याआधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांना विचारा," असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.