औरंग्याच्या कबरीला 'काँग्रेसी ढाल'; १९७३ मध्येच वक्फचा दावा

सुन्नी विचारानुसार कुठल्याही कबरीचे महिमामंडन इस्लाम विरोधीच

    21-Mar-2025   
Total Views |

Aurangzeb Tomb Congress Protection

मुंबई (ओंकार मुळ्ये) : (Aurangzeb Tomb) 
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. शिवजयंतीच्या दिवशी नागपुरात झालेल्या हिंसाचाराने ते आणखीनच पेटले. 'औरंग्याच्या कबरीची महाराष्ट्रात गरज काय? ती उखडून टाका' अशा प्रकारच्या भावना पुन्हा एकदा प्रखरतेने हिंदूंच्या मनात जागृत झाल्या. मात्र चार संगमरवरी भिंतीत नव्हे तर कायद्याच्या चौकटीत बंदीस्त या कबरीला संरक्षण देण्याचे काम काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याचे समोर आले आणि इथूनच पुढे त्याचे महिमामंडन होत गेले.

हे वाचलंत का? : अवैध उत्खननावर 'ड्रोन'ची नजर : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस सरकारच्या काळात कबरीची जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणांतर्गत (एएसआय) सुरक्षित झाली खरी; त्याचबरोबर वक्फ बोर्डानेसुद्धा याच सरकारच्या काळात कबरीच्या जागेवर दावा केला. त्यामुळे एएसआयने जरी भविष्यात संरक्षण मागे घेतले, तरी वक्फ बोर्डचे संरक्षण औरंग्याच्या कबरीला हे असूच शकते. मग अशावेळी प्रश्न पडतो की, वक्फने दावा केला तेव्हा काँग्रेस गप्प का होती?

१७०७ मध्ये मृत्यू पावलेल्या औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे आहे. अशी माहिती आहे, की सुरुवातील कबरीचे बांधकाम कच्च्या स्वरुपाचे होते. वास्तविक आपली कबर साधी असावी असे खुद्द औरंगजेबाचेच म्हणणे होते. मात्र पुढे लॉर्ड कर्झनच्या काळात तिथे संगमरवरी बांधकाम करण्यात आले. १९५१ मध्ये ही जागा 'एएसआय' सुरक्षित करण्यात आली आणि पुढे १९७३ मध्ये 'महाराष्ट्र वक्फ बोर्डा'ने तिच्यावर दावा केला. हे घडले तेव्हा केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार होते.

वक्फ अधिनियम ५१(अ) आणि १०४(अ) नुसार म्हणायचे झाल्यास राज्य सरकार त्या जागेवर कारवाई करू शकत नाही. त्यासाठी जमिनीची मालकी सरकारकडे असणे आवश्यक आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या संमतीने ती जागा ताब्यात घ्यावी लागेल किंवा मग वक्फ न्यायालयात याचिका दाखल करून जागा सरकारी मालमत्ता असल्याचं सिद्ध करावं लागेल. १९७३ मध्ये काँग्रेसने घेतलेली गप्प राहण्याची भूमिका आज कबरीच्या वादाला कारणीभूत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
 
कुठल्याही कबरीचे महिमामंडण इस्लाममध्ये हराम

औरंगजेब हा सुन्नी मुसलमान होता. 'वहाबी' हा सुन्नी मुसलमानांचाच एक पंथ. त्यांच्या मते कुठल्याही कबरीवर दर्गाह बांधणे, त्याचे महिमामंडण करणे इस्लाम विरोधी कृत्य आहे. वास्तविक इस्लाम धर्मानुसार मनुष्याला मृत्युनंतर गाढण्याची प्रथा आहे. त्यामुळे शिया किंवा सुन्नी लोकांच्या कबरी बांधणे हे धर्मानुरुपच आहे. सुन्नी लोकांच्या मते अल्लाह शिवाय कुठल्याही व्यक्तीचे उदात्तीकरण होत असेल तर ते चुकीचे आहे, कारण ते अल्लाहला पर्याय म्हणून पुढे उभे राहतात. त्यामुळे औरंगजेबाची कबर आहे तशी ठेवायला हरकत नाही, परंतु कुठल्याही कबरीचे महिमामंडण करणे इस्लाममध्ये हराम आहे.

- डॉ. प्रमोद पाठक, इस्लाम अभ्यासक


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक