‘हुतीं’च्या दहशतवादाला चाप

20 Mar 2025 10:01:49

trump s us military launches decisive and powerful military action against the houthi terrorists in yemen
 
 
"लाल समुद्रामध्ये ‘हुती’ दहशतवाद्यांनी गोळीबार केलेली एक-एक गोळी एक-एक हत्याराच्या वापराबद्दल इराणलाच जबाबदार ठरवण्यात येईल. ‘हुती’ आताही सुधारले नाहीत, तर त्यांची अवस्था नरकापेक्षाही वाईट केली जाईल,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच म्हणाले. यावर इराणने स्पष्टीकरण दिले की, ‘हुती’ विद्रोही यांचे इराणचे काही संबंध नाहीत, तर ‘हुती’ दहशतवादी संघटनेचे प्रवक्ता मोहम्मद अल-बुखायती यांनी ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर दिले की, “इस्रायलने गाझा पट्टीवर आक्रमण केले आहे. आमचे युद्ध अमेरिकेशी नाही, तर इस्रायलशी आहे. त्यामुळे इस्रायल सहकार्य करणार्‍या प्रत्येक जहाजावर हल्ला करणार. तसेच, अमेरिकेने हल्ला केल्यास अमेरिकेलाही प्रत्युत्तर देणार.” ट्रम्प यांच्या आदेशानुसार, येमेन येथे ‘हुतीं’च्या ३० ठिकाणांवर जोरदार सैनिकी कारवाई झाली, तर अमेरिकेच्या नौसेनेने इराणच्या ‘झॅग्रोस’ जहाजाला जलसमाधी दिली. इराणने या घटनेबाबत मौन बाळगले, तर ‘हुतीं’चे म्हणणे असे की, ‘अमेरिका आमचे काहीही वाकडे करू शकत नाही.’ यावर अमेरिकेचे म्हणणे, हल्ल्यामध्ये हुतींची ठिकाणे नष्ट झाली. अनेक लोक मृत्युमुखी पडले. पण, जगासमोर आपली प्रतिमा बलाढ्य राहावी, म्हणून ‘हुती’ खोटी माहिती देत आहेत.
 
इराणच्या सहकार्याने ‘हुती’ संघटनेने येमेनमध्ये पाय रोवले. येमेनमधील शिया-जौदी या समूहाची ही सशस्त्र संघटना. ९०च्या दशकामध्ये येमेनचे राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या कथित भ्रष्टाचाराला विरोध करावा, म्हणून एका संघटनेचा जन्म झाला. या संघटनेचा संस्थापक होता, हुसैन अली हुती. त्यामुळे या संघटनेला ‘हुती’ म्हणून संबोधण्यात आले. या दहशतवादी संघटनेला ‘हुती’ नाव असले, तरी ही संघटना स्वत:ला ‘असार अल्ला’ असेही म्हणते. ‘असार अल्ला’ म्हणजे ईश्वराचे साथी. २००३ साली अमेरिकेने इराणवर हल्ला केला. यावेळी ‘हुती’ दहशतवादी संघटनेने नारा दिला, “अल्ला महान आहे. अमेरिकेचा विनाश हो, यहुदियांचा विनाश हो आणि इस्लामचा विजय हो!” या संघटनेतील दहशतवादी कृत्यात आर्थिक तसेच, शस्त्रांची रसद इराण पुरवत असतो, असा दावा सौदी अरेबियापासून येमेन ते इस्रायल अगदी अमेरिकेनेही केला आहे.
 
सौदी अरेबियाने तर जाहीर केले होते की, “येमेनमध्ये शिया सत्ता यावी, म्हणून इराणने ‘हुतीं’ना मोठे केले. तसेच, ‘हुतीं’ना ड्रोनपासून आधुनिक शस्त्रास्त्रे इराणने दिली आहेत. त्यामुळे ‘हुती’ सौदी अरेबिया विरोधात कारवाया करत आहे.” सौदी अरेबियाच्या या म्हणण्याचा मागोवा घेतला तर जाणवते की, सौदी अरेबिया हा कट्टर सुन्नी मुस्लीम देश. जगभरातील मुस्लीम देशांमध्ये सौदीला प्राथमिकता दिली जाते. मुस्लीम देश सौदीचे नेतृत्वदेखील मान्य करतात.हे शियापंथीय इराणला पटत नाही. आपण जगभरच्या मुसलमानांचे प्रतिनिधित्व करावे, ही इराणची महत्त्वाकांक्षा. त्यामुळेच स्वत:च्या देशात गदारोळ माजलेला असतानाही इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये इराण हा देश इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात युद्धाची भूमिका घेतो.
 
असो. तर अमेरिकेच्या मते, ‘हुती’ विद्रोही यांनी एका वर्षात लाल सागरामध्ये १९० हल्ले केले. त्यामध्ये जगाचे कोटी अब्जाचे नुकसान झाले. जहाजांवर सशस्त्र दरोडा घालणे, जहाजावरची संपत्ती लुटणे, जहाजावरील कर्मचार्‍यांना जिवे मारणे अशी दहशतवादी कृत्ये हुती करत आहेत. या लाल समुद्रातून जगाच्या वाहतुकीपैकी १५ टक्के वाहतूक होते. लाल समुद्रातून युरोप आणि आशियाच्या मालवाहू आणि इतर जहाजांची वाहतूक होत असते. हा मार्ग सुरक्षित असावा, म्हणून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली २० देशांनी एकी केली. मात्र, इस्रायलला विरोध म्हणून ‘हुती’ विद्रोही लाल सागरातून ये-जा करणार्‍या जहाजांना लक्ष्य बनवत आहेत. त्यामुळे आता वाहतूक कंपन्या हा मार्ग टाळतात. या मार्गाने न जाता, कंपन्या त्यांची जहाजे आफ्रिकेला वळसा घालून नेत आहेत. त्यामुळे इंधन आणि वाहन खर्चासह इतरही खर्चात अनावश्यक वाढ होऊन महागाईचा दर वाढत आहे. या परिक्षेपात लाल समुद्रामध्ये ‘हुतीं’चा दहशतवाद संपवणे गरजेचे आहे. अमेरिकेने याबाबत निर्णय घेतला आहे. ‘हुतीं’च्या दहशतवादाला चाप बसणे आवश्यक आहे.
 
Powered By Sangraha 9.0