इस्रायल-हमास युद्धाची ठिणगी पुन्हा शिलगावली गेली असली, तरी रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरती युद्धबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, युद्ध टाळण्यातच दोन्ही बाजूंचा विजय आहे, इतकी साधी गोष्ट या नेत्यांना कोण समजावून सांगणार, हाच खरा प्रश्न.
रशिया-युक्रेन युद्धात शस्त्रसंधी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर इस्रायल-‘हमास’ युद्धात चालू शस्त्रसंधी संपुष्टात आल्यावर, पुन्हा युद्धाला प्रारंभ झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनच दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. युक्रेनबरोबर शस्त्रसंधी करण्यास आपण तयार असल्याचे पुतीन यांनी सूचित केले असले, तरी शस्त्रसंधीची घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या ताब्यातील युक्रेनचा सर्व भूभाग परत मिळोविण्याच्या भूमिकेवर कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे रशिया-युक्रेन युद्धात शस्त्रसंधी होण्याची शक्यता दुरावली असली, तरी अमेरिकेच्या दबावापुढे झेलेन्स्की यांना झुकावे लागेल, अशीच शक्यता अधिक आहे.
तिकडे इस्रायलचा मात्र कसाबसा धरलेला एक महिन्याचा संयम संपुष्टात आला असून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीतील ‘हमास’च्या तळांवर पुन्हा जोरदार हल्ले चढविले आहेत. त्यात ४००पेक्षा अधिक लोक ठार झाले असून, शेकडो जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील शांतता भंग पावली असून, तेथे पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. गेला महिनाभर इस्रायल व ‘हमास’ यांनी एकमेकांवरील हल्ले थांबविले होते. दोन्ही बाजूंकडून काही ओलिसांची आणि कैद्यांची सुटकाही करण्यात आली होती. ही शस्त्रसंधी आणखी एक महिना वाढवावी आणि त्या काळात आपल्या ओलिस नागरिकांची सुटका करून घ्यावी, यासाठी इस्रायल इच्छुक होता. पण, ‘हमास’कडून अटींना पाठिंबा मिळाला नाही आणि त्यामुळे शस्त्रसंधीची मुदत संपताच इस्रायलने ‘हमास’च्या तळांवर पुन्हा जोरदार हल्ले सुरू केले आहेत.
‘हमास’ या संघटनेचा सुंभ आता जवळपास जळून नष्ट झाला असला, तरी त्यांचा इस्रायलविरोधाचा पीळ अजून कायम आहे. ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ अशीच त्यांची वृत्ती. तशात त्यांच्या ताब्यात अजूनही २४ इस्रायली ओलिस असून, पाच ओलिसांचे मृतदेहही आहेत. इस्रायलला आपल्या एकेका नागरिकाला जिवंत सोडवायचे आहे. त्यामुळे या महिनाभराच्या शस्त्रसंधीलाही तो नाराजीनेच तयार झाला होता. इस्रायलच्या दृष्टीने ‘हमास’ला पूर्ण नष्ट करण्याची हीच सुवर्णसंधी आहे. ही संघटना आता अत्यंत दुबळी झाली असून, तिच्याकडे खमके नेतृत्वही राहिलेले नाही. तिच्याकडील सैनिकबळ, म्हणजे दहशतवादी हेही आता खूपच खालावले आहेत. त्यात इस्रायलने गाझातील सर्व मदत रोखून धरली आहे. अन्न सोडाच, गाझावासीयांना आवश्यक ती औषधेही मिळणे अवघड झाले आहे. तेथे वीज आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते आहे. इतक्या पराकोटीच्या विपरित अवस्थेत असूनही ही संघटना शस्त्रसंधी करण्यास तयार नाही. या महिनाभराच्या काळात ‘हमास’ने इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्रे डागण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली होती. तिला पुन्हा सावरण्यास वेळ मिळण्यापूर्वीच तिची असलेली नसलेली शक्ती घटविण्यासाठी इस्रायलने जोरदार हल्ले चढविले आहेत. त्यामुळे येते काही दिवस इस्रायली आकाशात पुन्हा एकदा जीवघेणी आतशबाजी पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.
वास्तविक, ट्रम्प यांनीही ‘हमास’ला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यालाही या संघटनेने धूप घातलेली नाही. यावरून तिचा इस्रायलद्वेष किती तीव्र आहे, तेच दिसून येते. त्यामुळे नेतान्याहू यांनीही शस्त्रसंधीची मुदत संपताच ‘हमास’च्या तळांवर जबरदस्त हल्ले चढविण्यास प्रारंभ केला आहे. इस्रायलच्या दृष्टीने ही आरपारची लढाई आहे. इस्रायलकडे शत्रूंची कमतरता नाही. म्हणूनच आहेत त्यापैकी निदान एक तरी शत्रू कायमचा नष्ट करण्याची आलेली ही संधी सोडण्यास ते तयार नाहीत. ‘हमास’ने आपल्याकडील पाच ओलिसांचे मृतदेहही सोपविण्यास नकार दिला आहे. यावरून ‘हमास’ची कुटिल वृत्ती दिसून येते. त्यामुळे आता सुरू झालेल्या हल्ल्यांबाबत कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. कारण, नेहमीप्रमाणेच वृत्तपत्रांतून आणि लिब्रांडू मीडियातून इस्रायली हल्ल्यात मरण पावलेल्या लहान मुलांची आणि हताश, असाहाय्य आणि दु:खी लोकांची छायाचित्रे प्रसिद्ध होण्यास प्रारंभ झाला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम!
रशिया-युक्रेन युद्धातही आडमुठेपणाच शस्त्रसंधीच्या आड येत आहे. रशियाची बाजू पुन्हा एकदा वरचढ झाली आहे. युक्रेनने मध्यंतरी आपल्या ताब्यात घेतलेल्या कुर्स्क प्रांताचा काही भाग रशियाने पुन्हा मुक्त केला आहे. तसेच, युक्रेनवर नव्याने हल्ले आणि चढाईच्या योजना तो आखत आहे. गमतीचा भाग म्हणजे, अमेरिका रशियाच्या बाजूने आहे. ट्रम्प यांनी मध्यंतरी युक्रेनला थांबविलेली गुप्तचर माहितीच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली असली, तरी त्या देशाला शस्त्रास्त्रे देण्यास नकार दिला आहे. तसेच, आर्थिक मदतही नगण्यच होत आहे. पश्चिम युरोपीय देशच केवळ रशियाविरोधात डरकाळ्या फोडत असून, युक्रेनला तोंडभरून आश्वासने देत आहेत. पण, त्यांनाही पैशाचे सोंग फार काळ आणणे परवडणारे नाही. अमेरिकेने तर आपले हात आधीच वर केले आहेत. अशा स्थितीत कसेही करून युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, ही गोष्ट झेलेन्स्कींच्या डोक्यात शिरत नाही. रशियाने ताब्यात घेतलेला युक्रेनच्या भूमीचा इंचन्इंच परत मिळविण्याच्या वल्गना ते करीत आहेत. सार्वभौमता हा प्रत्येक देशाचा अधिकार आहे, हे खरे; पण युद्धकाळात आपल्या वास्तव ताकदीनुसारच झेप घेणे श्रेयस्कर असते. आपल्या नुकसानीची भरपाई तहात करता येऊ शकते.
पॅलेस्टिनी भूमीवरील संघर्ष हे अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे जगाच्या अंतापर्यंत भळभळत राहणार आहेत. पण, जिथे शक्य असेल तिथे जखमेतील रक्तस्राव थांबविणे आवश्यक असते. युक्रेनला आपला काही भूभाग गमवावा लागला, तरी जर त्यामुळे युद्धाचा अंत होत असेल, तर ती गोष्ट स्वीकारली पाहिजे. पण, बेगडी प्रतिष्ठा आणि राष्ट्रप्रेमापुढे शहाणपणाच्या गोष्टी पटत नाहीत, हेच युक्रेनचे खरे दुखणे!