आंबोलीमधून कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध; जैवसमृद्ध गावातून आजवर २५ नव्या प्रजातींचा उलगडा

    20-Mar-2025   
Total Views |
new spider species from amboli


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या जैवविविधता संपन्न गावामधून कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new spider species from amboli). या प्रजातीचे नामकरण आंबोली गावाच्या नावे 'इंडोथेल आंबोली', असे करण्यात आले आहे (new spider species from amboli). या प्रजातीच्या शोधामुळे आंबोली-चौकुळ या जैवसंपन्न प्रदेशामध्येच सापडणाऱ्या प्रजातींची संख्या २५ झाली आहे. (new spider species from amboli)
 
 
वन्यजीव संशोधक ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम, डॅनिएला शेरवूड आणि अंबालापारंबिल वसू सुधीकुमार यांनी पश्चिम घाटामधून कोळ्याच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. यासंबंधीचे शोधवृत्त 'युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी'मध्ये प्रकाशित झाले आहे. यामधील एक प्रजात ही महाराष्ट्रातील आंबोलीमधून आणि दुसरी प्रजात ही केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमधून शोधण्यात आली असून तिचे नामकरण 'इंडोथेल सायलेंटव्हेली', असे करण्यात आले आहे. या दोन्ही प्रजाती 'इंडोथेल' या कुळातील असून या कुळाचा समावेश 'इश्नोथेलिडे' या कुटुंबात होतो. 'इश्नोथेलिडे' कुटुंबातील कोळी हे आफ्रिका, मादागास्कर, भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतात. भारतात 'इश्नोथेलिडे' कुटुंबातील 'इंडोथेल' या कुळातीलच कोळी आढळून येतात. या कोळ्यांच्या अधिवासाचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण भारतात असून भारतात पाच आणि श्रीलंकेत त्याची एक प्रजात आढळते.
 
 
आंबोलीतून शोधण्यात आलेली 'इंडोथेल' कुळातील 'इंडोथेल आंबोली' ही प्रजात जाळे विणणारी आहे. 'व्हिसलिंग वूड्स आंबोली' याठिकाणी गौतम कदम यांना ही प्रजात आढळून आली होती. हा कोळी साधारण १ सेंटीमीटर आकाराचा आहे. तो फिशिंग स्पायडर नामक कोळ्यासारखे जाळे विणतो.
 
 
आंबोलीचे वैशिष्ट्य
सांवतवाडी तालुक्यात ५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रावर आंबोली गाव पसरलंय. उत्तर आणि मध्य पश्चिम घाटाला जोडणारा हा भाग आहे. त्यामुळे याठिकाणी दक्षिण भारतातील प्रजाती मोठ्या संख्येन सापडतात. आंबोली-चौकुळ या एवढ्या छोट्याशा भागामधून २००५ पासून २५ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातींमध्ये काही साप, उभयचर, खेकडे, कोळी आणि स्काॅरपियनप्रजातीबरोबरच 'शिस्टुरा हिरण्यकेशी' या माशाचाही समावेश आहे. या गावामध्ये शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसास्थळ असून येथील वनक्षेत्राचा समावेश आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये होतो. त्यामधील जवळपास आठ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजेच जगात त्यांचा अधिवास आणि अस्तित्व हे केवळ अन् केवळ आंबोली या गावामध्येच सापडते. एखाद्या ठिकाणी प्रदेशनिष्ठ जीवांचा भांडार असणे ही जैवविविधतेच्या अनुषंगाने एक अनोखीच गोष्ट आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.