सुवर्णपदकाचा मानकरी

    20-Mar-2025
Total Views |

article on division forest officer dr. sujit nevse
 
  
 
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
 
काही माणसं आपल्या दैनंदिन कामाला नावीन्याचा वर्ख लावतात. वन आणि वन्यजीव संवर्धनाच्या कामाला नावीन्याचा वर्ख लावून चौकटीबाहेर विचार करणारा हा अधिकारी. नाशिकमधील वन्यजीव संरक्षण, अधिवासाची निर्मिती, तस्करी, व्यवस्थापन, बचावकार्य अशा सर्व कामांना लिलया पार पाडणारे अधिकारी म्हणजे डॉ. सुजित नामदेव नेवसे. पशुवैद्यक असूनही वनसंवर्धनाचा विडा उचललेल्या डॉ. नेवसे यांच्या कामाविषयी...
 
नेवसे यांचा जन्म दि. १८ मे १९८७ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यानजीकच्या सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थान असणार्‍या नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील नामदेव नेवसे हे कृषी खात्यात कामाला होते, तर आई शोभा नेवसे या गावच्या सरपंच. शिवाय त्यांची शेतीदेखील होती. शेती आणि त्याला पूरक असणार्‍या पशुपालन इत्यादी कामात हे कुटुंब रमलेले असायचे. वडिलांनी सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत रोपवाटिका तयार करण्याचे काम घेतले असल्याने डॉ. नेवसे यांचा वेळ त्या रोपवाटिकेच्या निर्मितीमध्ये जात असे. रोपवाटिकेसाठी बीजांचे संकलन करणे, रोपे तयार करणे, त्यांना पाणी देणे यामुळे त्यांच्या मनात झाडांविषयी प्रेम निर्माण झाले. घरातील जनावरांमुळे त्यांच्याप्रति आस्था निर्माण झाली. त्यामुळे पुढील शिक्षण हे पशुवैद्यकीयशास्त्रामध्ये करायचे, हे त्यांच्या मनी निश्चित होते. शिरवळ येथील क्रांतिसिंह नानापाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००९ ते २०१२ या कालावधीत गुजरातमधून ‘व्हेटनरी पॅथोलॉजी’ या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१२ साली ते पशुवैद्यक झाले; मात्र त्यांना खुणावत होती स्पर्धा परीक्षेची वाट आणि त्याद्वारे अधिकारीपदापर्यंत मजल मारण्याचे स्वप्न!
 
पशुवैद्यकीय शिक्षणादरम्यान त्यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी सुरू केली. २०१२ साली त्यांनी ‘एमपीएस’अंतर्गत वनसेवेची परीक्षा दिली आणि ते राज्यात पहिले आले. २०१३ ते २०१७ या कालावधीत त्यांचे प्रशिक्षण पार पडले. २०१७ साली ते वन विभागात रुजू झाले. नाशिक जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या सुरगणा वनपरिक्षेत्रात ‘साहाय्यक वनसंरक्षक’ या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि कामाला सुरुवात झाली. सुरगणा हा सीमावर्ती भाग असल्याने लाकूड तस्करीच्या अनुषंगाने हा संवेदनशील भाग. नेवसे यांनी तातडीने लाकूड तस्करीवर वचक बसवण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सुरगणा उपविभागातील टिमने खैर, सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या कम्युनिस्टधार्जिण्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या. प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये मुख्य सूत्रधारांना गुजरातमधून अटक केली. तसेच, गणेश वाघमारे यांसारख्या तस्करांचे मनपरिवर्तन करून त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात आणले. सराईत गुन्हेगारांचा वावर असलेल्या ठिकाणाचा नकाशा तयार करून ‘व्हिजिबल पेट्रोलिंग’वर भर दिला. तसेच, परिक्षेत्रातील संपूर्ण वाढ झालेल्या खैर वृक्षांची जीपीसी रिडिंग घेऊन प्रगणना केली. ज्यामुळे तोडीस योग्य वनसंपदेचा अंदाज आला.
 
२०१९ साली नेवसे यांची बदली मनमाडमध्ये झाली. कार्यरत होताच त्यांनी वन्यजीव गुन्ह्यांची दखल घेण्यास सुरुवात केली. सागरी इंद्रजालीसह, घोरपडीच्या अवयवांची तस्करी असो वा मांडूळ तस्करीचा साखळी उद्ध्वस्त करणे असो, या माध्यमातून त्यांनी वन्यजीव गुन्ह्यांची महत्त्वपूर्ण प्रकरणे धसास लावली. बिबटप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी ‘अ‍ॅडव्हान्स रेस्क्यू टीम’साठी तज्ज्ञांच्या कार्यशाळा आणि सराव शिबिरे आयोजित केली. वनविभाग, पोलीस, महसूल आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या सहकर्याने ‘मॉक ड्रील’ घेतली. त्यामुळे लोकांची मानसिक आणि तांत्रिक तयारी झाली. गिधाड संवर्धनाचे काम केले. तसेच, आईपासून दुरावलेल्या दहा बिबट्याच्या पिल्लांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणली. निफाड तालुक्यात राज्यातील पहिले खुले मानव बिबट सहजीवन जागृत केंद्र त्यांनी उभारले. सद्यपरिस्थितीत अनेक शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक या केंद्राला भेट देत आहेत. ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रामध्ये २०० हेक्टर क्षेत्रावर ‘गवती कुरण विकास’ कार्यक्रम राबविण्यास डॉ. नेवसे यांनी चालना दिली. महत्त्वाचे म्हणजे, आधुनिक बचाव पथाकरिता नवीन रेस्क्यू वाहन खरेदी न करता, अवैध वनगुन्ह्यातील जप्त करण्यात आलेली व सरकार जमा झालेली वाहने त्यांनी रेस्क्यू कार्यासाठी तयार केली, ज्यामुळे वेळेत वन्यजीव बचाव करणे शक्य झाले.
 
२०२३ साली डॉ. नेवसे यांना विभागीय वनअधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली. सध्या ते नाशिकमध्ये ‘महाराष्ट्र वन विकास महामंडळा’चे विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. नाशिकमधील महामंडळाच्या ताब्यातील ४४ हजार हेक्टर क्षेत्राच्या व्यवस्थापनाचे काम त्यांच्याकडे आहे. लवकरच ते पं. जवाहरलाल नेहरू वन उद्यानाच्या विकासाच्या कामाला सुरुवात करणार आहेत. नेवसे स्वत: उत्तम वन्यजीव छायाचित्रकार आहेत. या कामात नेवसे यांना पशुवैद्यक असणार्‍या त्यांच्या पत्नी डॉ. ललिता नेवसे यांची मोलाची साथ मिळत आहे. नावीन्यपूर्णतेचा वसा घेऊन नवमताच्या उर्जेने काम करणार्‍या नेवसे यांच्यासारखे अधिकारी वन विभागाच्या चेहरा मोहरा बदलण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!