त्रिवेणी स्तोत्र

20 Mar 2025 11:24:56

article explains triveni stotram
 
 
 
नुकताच महाकुंभकाळात अनेक श्रद्धाळूंनी कुंभस्नानाचा अनुभव घेतला. या कुंभस्नानाचे महत्त्व हिंदू धर्मात विशद केले आहेच. तरीही अनेकांनी लौकिक ज्ञानाच्या माध्यमातून अलौकिक अशा स्नानानुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच. त्यापैकी अनेकांचे प्रश्न कुंभस्नानाने काय लाभ होणार आहे? अशा आशयाचेच होते. मात्र, प्रयागमधील त्रिवेणी संगमावर केलेल्या स्नानाचे महात्म्य आदि शंकराचार्य त्यांच्या त्रिवेणी स्तोत्रातून विशद करतात. त्यांच्या या त्रिवेणी स्तोत्राचा हा भावानुवाद...
महाकुंभमेळा नुकताच पार पडला. गुप्त सरस्वती, यमुना आणि गंगा या तीन नद्यांचा संगम, प्रयागराज या क्षेत्री झाला आहे. या त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्यात पर्वणीच्या तिथीला स्नान करण्याचे प्रचंड महत्त्व असून, हे पुण्यकर्म मानले जाते. यातून अनेक जन्मांच्या संचित पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. या त्रिवेणीसंगमावरच आदि शंकराचार्यांनी त्रिवेणी स्तोत्र रचले आहे.
गंगा ही नदी शिवाची पत्नी मानली जाते. यमुना ही विष्णुपत्नी आहे आणि सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी मानली जाते. ब्रह्मतत्त्वाची अर्थात ईश्वराची जी मुख्य कार्ये मानली जातात, त्यात उत्पत्ति, स्थिती आणि लय ही तीन कार्ये सर्वज्ञात आहेत. उत्पत्ति तत्त्वाचे ईश्वरी रूप ब्रम्हदेव आणि त्याची पत्नी सरस्वती ही आहे. स्थिती अवस्थेचे ईश्वरी रूप विष्णु आणि त्याची पत्नी लक्ष्मी आहे. आणि संहार अवस्थेचे ईश्वरी रूप शिवशंकर आणि त्याची पत्नी पार्वती हे आहे. यापैकी सरस्वती ही नदीरूपसुद्धा आहे. स्थिती अवस्थेतील नदीस्वरूप पत्नी ही यमुना आणि संहार अवस्थेतील नदीस्वरूप पत्नी ही गंगा आहे.
 
कोणतीही नदी हा केवळ जलप्रवाह नसतो, तर नदी ही तिच्या उत्पत्ती स्थानानुरूप किंवा तिच्या उत्पत्तीला कारक असणार्‍या ऋषीच्या इच्छेनुरूप, ज्ञानसुद्धा प्रवाहित करते. तिचे जल त्या ज्ञानाचे वाहक म्हणून कार्य करते. त्यामुळे नदी हा केवळ जलप्रवाह नाही, ती ज्ञानप्रदायिनी आहे. सरस्वती ही सृजनचे ज्ञान देऊ शकते, परंतु जगत् उत्पन्न झाल्याने आता सृजनाचे ज्ञान देण्याची गरज नाही. म्हणून ती गुप्त झाली आणि केवळ त्रिवेणी संगमावर प्रकट झाली आहे. यमुना पालन अवस्थेचे ज्ञान देऊ शकते आणि गंगा संहाराचे ज्ञान प्रदान करते. त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्यात स्नान केल्याने, हे ज्ञान साधकाला प्राप्त होऊ शकते. या ज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या आत्मउन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. म्हणून कुंभमेळ्यात स्नान करणे पुण्यकारक आहे, असे मानले जाते. माणूस अज्ञानामुळे पाप करतो, असे हिंदू धर्माचा सिद्धान्त सांगतो. कुंभमेळ्यात स्नान केल्याने उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांचे स्वरूप ज्ञात होते आणि त्यामुळे भविष्यात माणूस पापे करत नाही. म्हणून कुंभमेळ्यात स्नान करणे पुण्याचे मानले जाते. पापक्षालन करण्याचे कार्य गुरू या ग्रहाची विशिष्ट अवस्था आणि त्रिवेणी संगमतील पुण्यजलातील स्नान यांचा समसमा संयोग साधून होतो. म्हणूनच कुंभमेळ्याचे महत्त्व अधिक आहे.
 
याच कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमाची स्तुति करणारे काव्य आदि शंकराचार्यांनी रचले आहे. त्याचा हा भावार्थ.
 
॥त्रिवेणी स्तोत्र॥
 
मुक्तामयालङ्कृतमुद्रवेणीब भक्ताभयत्राणसुबद्धवेणी।
मत्तालिगुञ्जन्मकरन्दवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
मुक्तांच्या अलंकारांनी सुशोभित तिची वेणी, भक्तांचे भय दूर करणारी सुबद्ध वेणी, मधुर परागाने गुंजणार्‍या भ्रमरांनी युक्त अशी असलेली पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
लोकत्रयैश्वर्यनिदानवेणी तापत्रयोच्चाटनबद्धवेणी।
धर्माऽर्थकामाकलनैकवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
तीनही लोकांच्या ऐश्वर्याचे कारण असलेली वेणी, तीन तापांचा नाश करणारी, धर्म, अर्थ आणि काम या त्रयीचे एकमेव साधन असलेली वेणी, ही पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
मुक्ताङ्गनामोहन-सिद्धवेणी भक्तान्तरानन्द-सुबोधवेणी।
वृत्त्यन्तरोद्वेगविवेकवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
मुक्त झालेल्या आत्म्यांना मोहित करणारी सिद्ध वेणी, भक्तांच्या अंतरंगात आनंद उत्पन्न करणारी सुबोध वेणी, अंतःकरणातील चिंता दूर करून विवेक वाढवणारी वेणी पवित्र प्रयागात असलेली ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
दुग्धोदधिस्फूर्जसुभद्रवेणी नीलाभ्रशोभाललिता च वेणी।
स्वर्णप्रभाभासुरमध्यवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
क्षीरसागराच्या लहरींसारखी शुभ्र व सुंदर वेणी, निळ्या मेघासारखी शोभिवंत वेणी, सुवर्णाच्या प्रभेने झळाळणारी मध्य वेणी पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
विश्वेश्वरोत्तुङ्गकपर्दिवेणी विरिञ्चिविष्णुप्रणतैकवेणी।
त्रयीपुराणा सुरसार्धवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
परमेश्वर शंकराच्या जटेतून प्रकट झालेली उच्च वेणी, ब्रह्मा व विष्णू ज्यांना वंदन करतात अशी एकमेव वेणी, वेद, उपनिषदे व पुराणांनी पूज्य असलेली वेणी पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
माङ्गल्यसम्पत्तिसमृद्धवेणी मात्रान्तरन्यस्तनिदानवेणी।
परम्परापातकहारिवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
मंगल व समृद्धी प्रदान करणारी वेणी, मातृसत्तेने पूजलेली वेणी, पापांचा संहार करणारी परंपरागत वेणी पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
निमज्जदुन्मज्जमनुष्यवेणी त्रयोदयोभाग्यविवेकवेणी।
विमुक्तजन्माविभवैकवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
मनुष्यांना यात्रींसारखे निमज्जन व उदय देणारी वेणी, भाग्याचे निदर्शक असलेली त्रयोदश भागांची विवेक वेणी, जन्म व मोक्षाचा एकमेव आधार असलेली वेणी पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
सौन्दर्यवेणी सुरसार्धवेणी माधुर्यवेणी महनीयवेणी।
रत्नैकवेणी रमणीयवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
सौंदर्यपूर्ण वेणी, सुरांच्या स्तुतीची पात्र वेणी, माधुर्याने परिपूर्ण महान वेणी, रत्नासारखी तेजस्वी रमणीय वेणी पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
सारस्वताकारविघातवेणी कालिन्दकन्यामयलक्ष्यवेणी।
भागीरथीरूपमहेशवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
वाणीची प्रेरणा देणारी वेणी, यमुनापुत्रीच्या स्वरूपात दिसणारी लक्ष्यमयी वेणी, गंगारूपात महादेवाच्या जटेतून प्रकट झालेली वेणी पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
श्रीमद्भवानीभवनैकवेणी लक्ष्मीसरस्वत्यभिमानवेणी।
माता त्रिवेणी त्रयीरत्नवेणी श्रीमत्प्रयागे जयति त्रिवेणी।
 
माता भवानीच्या स्वरूपातील वेणी, लक्ष्मी व सरस्वतींच्या तेजाने भरलेली वेणी, सर्व वेदांचे रत्नस्वरूप असलेली माता त्रिवेणी पवित्र प्रयागातील ही त्रिवेणी विजयशाली आहे.
 
त्रिवेणीदशकं स्तोत्रं प्रातर्नित्यं पठेन्नरः।
तस्य वेणी प्रसन्ना स्याद् विष्णुलोकं स गच्छति।
 
जो मनुष्य या त्रिवेणी स्तोत्राचे दशक नित्य प्रभात पठण करील, त्याच्यावर त्रिवेणी प्रसन्न होईल व तो निश्चितच विष्णुलोकास जाईल.
 
 
सुजीत भोगले

९३७००४३९०१
Powered By Sangraha 9.0