परदेशी गुंतवणुकदारांची पहिली पसंती महाराष्ट्रच

20 Mar 2025 16:17:39
fadnavis
 
 
मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार काम करत आहे. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण हे उद्योग क्षेत्रासाठी अधिकाधिक पूरक आणि विश्वासाचे बनत चालले आहे. याच दृष्टीने एक महत्वाचा करार झाला आहे. स्वीडीश कंपनी कँडेला कंपनीसोबत १९९० कोटींचा करार करण्यात आला आहे. यातून परदेशी गुंतवणुकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास अधोरेखित होतो असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला. ही गुंतवणुक प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात होणार असून त्यातून ६ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. या करारामुळे महाराष्ट्र आणि स्वीडन यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
हरित ऊर्जेबरोबरच राज्यातील जलटॅक्सी सेवेलाही या करारामुळे बळ मिळणार आहे. मुंबईत बिझनेस स्वीडनचे कार्यालय उभे राहत आहे त्यामुळेही या व्यापार भागीदारीला चालना मिळणार आहे. यावेळी स्वीडन सरकारचे प्रतिनिधी आणि बिझनेस स्वीडनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जान लार्सन, डेप्युटी काऊंसिल जनरल जोआकिम गुन्नार्सन, वॉल्वोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमल बाली, सँडविकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी किरणकुमार आचार्य आणि भारतातील विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात येणाऱ्या स्वीडीश कंपन्याचे स्वागत केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या धोरणात्मक सुधारणांचीही महाराष्ट्र सरकारची तयारी आहे असेही नमुद केले. भारतात सध्या कार्यरत असलेल्या २८० स्वीडीश कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या या महाराष्ट्रातच कार्यरत आहेत त्यामुळे महाराष्ट्रच स्वीडीश कंपन्यांची पहिली पसंती आहे हे दिसून येते. स्वीडीश प्रतिनिधींनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार करत असलेल्या कामाची स्तुती केली.
 
२०१६ साली झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीडन दौऱ्यात इंडिया – स्वीडन बिझनेस लीडर्स राऊंटेबल ही परिषद स्थापन करण्यात आली होती. या परिषदेत मुख्यत: स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधांवर चर्चा होते. बिझनेस स्वीडन ही स्वीडीश सरकारची कंपनी असून ती स्वीडीश कंपन्यांना आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी आणि परदेशी गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देते.
 
 
Powered By Sangraha 9.0