शेअर बाजाराची ८०० पेक्षा जास्त अंकांची उसळी, गुंतवणुकदार मालामाल

20 Mar 2025 18:55:09
bullish
 
 
मुंबई : शेअर बाजारातील चढत्या भाजणीने आता चांगलाच वेग धरला आहे. बुधवारी १ हजारापेक्षा जास्त अंशांनी उसळी घेतलेल्या शेअर बाजारातील निर्देशांकाने गुरुवारी त्यातुलनेत कमी परंतु ८९९ अशांची उसळी घेतली आहे. सेन्सेक्स ७६ हजारांची पातळी ओलांडत ७६,३४८ अंशांवर थांबला. शेअर बाजारातील या उसळीमागे माहिती तंत्रज्ञान तसेच वाहन कंपन्यांच्या शेअर्सचा वाटा आहे. निफ्टीमध्येही निर्देशांकांनी २८३ अंशांची उसळी घेत २३,१९० अंशांवर पोहोचला.
 
गुरुवारी जोरदार फायद्यात असलेल्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, टायटन, ब्रिटानिया, इथर मोटर्स, बजाज ऑटो या कंपन्यांचा समावेश होतो. क्षेत्रांनुसार बघितले तर वाहन क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान. एफएमसीजी, धातू उत्पादने, माध्यमे, गृहबांधणी, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, ग्राहकोपयोगी वस्तु, आरोग्य या क्षेत्रांतील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. गुरुवारी दिवसाच्या सुरुवातीस विक्रीचा जोर असला तरी त्यानंतरच्या सत्रांत मात्र खरेदीचा जोरदार सपाटाच राहील्यामुळे शेअर्सचे भाव वधारले.
 
जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथींमुळे डॉलर्सच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांचा कल हा भारतीय बाजारांत गुंतवणुक करण्याचा आहे. याचा फायदा भारतीय गुंतवणुकदारांना होतो आहे. तसेच यासर्व गोष्टींमुळे तयार झालेल्या अनुकुल वातावरणामुळे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनाही गुंतवणुकीस उत्तेजन मिळत आहे. या सर्वांचा अनुकुल परिणाम शेअर बाजारावर दिसतो आहे. भारतीय रिझ्रर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत व्याजदरांत अजून कपातीचे संकेत दिले जात आहेत. तसेच भारतीय उद्योग क्षेत्राची कामगिरीचा यंदाच्या तिमाहीचा अहवालही अनुकुल असण्याचा अंदाज आहे. हे सर्वच गुंतवणुकदारांचा उत्साह वाढणारे आहे. ही स्थिती अजून काही महिने अशीच राहण्याचा अंदाज उद्योग क्षेत्राकडून व्यक्त केला जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0