मुंबई : आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, २० मार्च रोजी केली. त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, "कुणावरही विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप असल्यास पहिल्यांदा त्याला अटक करून चौकशी करावी लागते, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे एका व्यक्तीसाठी हा निर्णय बदलता येणार नाही. चित्रपटातील शक्ती कपूरसारखे लोक इकडेतिकडे फिरत असल्यास त्यांना अटक करायला हवी."
हे वाचलंत का? - फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल! सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; तपासात खळबळजनक माहिती
आदित्य ठाकरेंची पळवाट का?
आमच्यावर दबाव आणण्यात आला, असे दिशा सालियानच्या वडीलांनी सांगितले. या प्रकरणातील व्यक्ती आमदार असल्यास तो हे प्रकरण दाबण्यासाठी काहीही प्रयत्न करू शकतो. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी यावर स्पष्टीकरण द्यावे. तसेच जोपर्यंत हे आरोप स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी आमदारकीच्या पदावर राहणार नाही, असे स्पष्ट करावे. ८ जून आणि १३ जून रोजी ते कुठे होते? दिशा सालियानला ओळखतात की, नाही? हे त्यांनी सांगून टाकावे. २ ते ३ वर्षांपासून हे आरोप होत आहेत. आपण तो काळा ठपका का लावून घेत आहोत, याचा विचार आदित्य ठाकरेंनी केला पाहिजे. यातून पळवाट काढून उपयोग नाही," असेही ते म्हणाले.
"एका मुलीचा बलात्कार आणि खून झाला असून तिला न्याय देणे आमचे काम आहे. हा राजकीय मुद्दा नाही. आदित्य ठाकरेंना वाटत असेल की, कुणीतरी त्यांना टार्गेट करत आहेत, तर त्यांनी बाहेर येऊन यावर स्पष्टीकरण द्यावे. ते पळतात कशाला?" असा सवालही नितेश राणे यांनी केला आहे.