महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रोखे वितरणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

20 Mar 2025 19:45:20
ajit pawar
 
 
मुंबई : रिझ्रर्व्ह बँकेने घालून दिलेल्या आर्थिक सक्षमतेच्या निकषांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ५०० कोटी रुपयांच्या कर्जरोखे वितरणास परवानगी मिळाली आहे. या रोखे वितरणाचा शुभारंभ गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यास महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नॅफस्कॉबचे कार्यकारी संचालक भिमा सुब्रमण्यम तसेच राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर,तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, पतसंस्थांचे अध्यक्ष, साखर कारखान्यांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी ५ साखर कारखान्यांना रोखे वाटप करुन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
 
हे कर्जरोखे दहा वर्षांच्या मुदतीसाठी असून त्यांवर ८.५ टक्क्यांनी व्याज मिळणार आहे. यात सहकारी बँकांना गुंतवणुकीसाठी परवानगी नाही. सहकारी पतसंस्था, साखर कारखाने, गृहनिर्माण संस्था, ट्रस्ट यांसारख्या संस्था या कर्जरोख्यांत गुंतवणुक करु शकतात. या कर्जरोख्यांत गुंतवणुक करणाऱ्या संस्थांना यावरील व्याजावर आयकरातून सूट मिळणार आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याप्रसंगी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्य सहकारी बँकेकडून वाशी येथे सायबर ऑपरेशन सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मुदतीतच हे सर्व कर्जरोखे विकले जातील असा विश्वास व्यक्त केला.
 
सहकार टिकवण्यासाठी सर्व संस्थांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर झाले आहे. या वर्षात सहकार क्षेत्र टिकावे, त्यात आवश्यक सुधारणा व्हाव्यात यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सर्व सहकारी संस्थांनी महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेचा कित्ता गिरवावा आणि आपल्या कामात सुधारणा करावी असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. याचबरोबर बदलत्या युगातील तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन कार्यशैलीत बदल करावे असे आवाहन देखील पवार यांनी केले.
 
 
  
Powered By Sangraha 9.0