पीएम इंटर्नशिप योजनेला, भारतातील कंपन्यांचा वाढता प्रतिसाद

20 Mar 2025 14:19:41
internship
 
 
नवी दिल्ली : भारतातील तरुणांना कौशल्य विकासाची तसेच कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला भारतातील मोठ्या उद्योगांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. भारतीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार भारतातील मोठे उद्योग जसे की रिलायन्स, मारुती सुझुकी, ओएनजीसी, ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड या कंपन्यांकडून या इंटर्नशिप योजनेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
 
डिसेंबर २०२४ मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चालवल्या गेलेल्या या प्रकल्पात १ लाख २७ हजार इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध केल्या गेल्या होत्या. यात २८ हजारांपेक्षा जास्त युवक प्रत्यक्ष कामावर रुजू झाले आहेत. मंत्रालयाकडून जाहीर केल्या गेलेल्या अहवालानुसार या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ७२ टक्के पुरुष तर २८ टक्के महिलांनी सहभाग घेतला आहे. लवकरच यात अधिक युवकांची वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
 
राज्यवार बघायला गेले तर या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये उत्तरप्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. या राज्यातून १,२३४ युवक या योजनेत समाविश्ट झाले आहेत. यानंतर आसामधून ९९४, बिहार मधून ७१५, मध्यप्रदेशातून ६९३ एवढ्या युवकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. इंटर्नशिप देणाऱ्या कंपन्यांमध्ये ज्युबिलंट फुटवर्क्सकडून १४,२६३, मारुती सुझुकीकडून १२,४४४ ओएनजीसीकडून ६ हजार एवढ्या संधी उपलब्ध करुन दिल्या गेल्या आहेत.
 
देशातील युवकांना कौशल्यविकासाची तसेच कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी भारत सरकार कडून २०२४-२५ वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषण केली गेली होती. या योजनेत सहभागी झालेल्यांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप संधी मिळते. प्रत्येक महिन्यासाठी ५ हजार रुपये छात्रवृत्ती म्हणून तर ६ हजार रुपये एकदा पगार म्हणून देण्यात येतात. प्रायोगिक तत्वावर पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यातून १लाख २५ हजार युवकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0