२०२५ मध्ये दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटांची लाट; शिवचरित्र आणि संतपरंपरेवर आधारित हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला!
02 Mar 2025 13:39:27
मुंबई : २०२५ हे वर्ष ऐतिहासिक मराठी चित्रपटांसाठी विशेष ठरणार आहे. भक्ती आणि शौर्य यांचा संगम असलेले विविध चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'शिवराज अष्टक' नंतर नवे ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार आणि शिवरायांचा छावा या चित्रपटांद्वारे मराठा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडला. आता ते संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि आनंदडोह हे दोन चित्रपट घेऊन येत आहेत.
संत मुक्ताबाईंच्या जीवनावर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’:
स्त्री-पुरुष भेदांपलीकडे भक्तीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या संत मुक्ताबाईंच्या जीवनावर आधारित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मुक्ताबाई आणि त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षमय प्रवासाचे दर्शन या चित्रपटातून घडणार आहे.
संत तुकारामांच्या अभंगगाथेवर ‘आनंदडोह’
संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेच्या नष्ट होण्याच्या आणि पुनरुत्थानाच्या घटनांवर आधारित आनंदडोह हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. यात तत्कालीन समाज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पाईक आणि संत तुकारामांच्या जीवनावर झालेल्या परिणामांची कथा मांडण्यात आली आहे.
‘वीर मुरारबाजी’ आणि ‘राजा शिवाजी’सुद्धा चर्चेत
पुरंदरच्या वेढ्यात पराक्रम गाजवलेल्या मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याची कहाणी मांडणारा वीर मुरारबाजी : पुरंदरची यशोगाथा हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होईल. यात अंकित मोहन मुरारबाजी देशपांडे यांच्या भूमिकेत असून, सौरभ राज जैन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख राजा शिवाजी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदीमध्ये प्रदर्शित होईल.
ऐतिहासिक चित्रपटांचा अभ्यास महत्त्वाचा – दिग्पाल लांजेकर
“चित्रपट हा प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करताना सत्यता जपून अधिकाधिक ऐतिहासिक दाखले देणे गरजेचे आहे,” असे दिग्पाल लांजेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
२०२५ हे वर्ष ऐतिहासिक चित्रपटांसाठी किती यशस्वी ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.