गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
किस्तानचा सर्वांत मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. क्वेटाहून पेशावरला जात असलेली ‘जाफर एक्सप्रेस’ ही रेल्वेगाडी ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या (बीएलए) सदस्यांनी ताब्यात घेतली. पाकिस्तानने केलेल्या कारवाईत ‘बीएलए’चे सर्वच्या सर्व म्हणजे, ३३ दहशतवादी मारल्याचा दावा केला असला, तरी ‘बीएलए’ने हा दावा खोडून काढला. या हल्ल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी नुस्खी जिल्ह्यामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये तीन सैनिकांसह पाच जण मारले गेले. बलुचिस्तानचा आकार पाकिस्तानच्या ४० टक्के इतका असला, तरी बलुची लोकांची संख्या अवघी ७० लाखांच्या आसपास आहे. पाकिस्तान सरकारने इतर प्रांतातून सुमारे एक कोटी लोकांना तिथे आणून वसवले असले, तरी बलुचिस्तानचा बराचसा भाग निर्मनुष्य आहे. चांगल्या दूरसंचार व्यवस्थेच्या अभावामुळे आणि पाकिस्तान सरकारने माध्यमांवर या विषयावर वार्तांकन करण्यात निर्बंध लादल्यामुळे सत्य काय आहे, हे समोर येणार नाही. पाकिस्तानच्या ‘जमात उलेमा-इ-इस्लाम (फजल)’ पक्षाचे नेते मौलाना फजलुर रेहमान यांनी गेल्याच महिन्यात पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये बोलताना बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि सैन्याचे अस्तित्व नसल्याचा दावा केला. खैबर पख्तुनख्वा प्रांतातही परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले.
बलुचिस्तानची लोकसंख्या छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये विभागली गेली आहे. ब्रिटिशांच्या काळातही हा सगळा प्रदेश विविध खानांच्या अधिपत्याखाली होता. त्यातील कलात हे सगळ्यात मोठे संस्थान होते. कलातच्या खानाने भारताच्या फाळणीनंतर कलात आणि अन्य संस्थानांसह स्वतंत्र बलुचिस्तान देश तयार व्हावा, यासाठी मोहम्मद अली जिनांना आपला वकील म्हणून नेमले होते. पण, स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने लष्करी बळाचा वापर करून, बलुचिस्तानवर ताबा मिळवला. तेव्हापासून विविध बलुची गट स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानने अमानुष पद्धतीने त्यांचे बंड चिरडण्याचा प्रयत्न केला. ते यशस्वी होत नाही, हे लक्षात आल्यावर प्रमुख टोळीवाल्यांना पैसा चारून किंवा त्यांना सत्तेत वाटा देऊन त्यांच्यावर राज्य केले. पण, आता बलुच लोकांचे नेतृत्व सरदारांच्या हातून जाऊन नवीन पिढीच्या हाती आले आहे. ती सुशिक्षित आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणारी असून, आपली गार्हाणी मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत आहे.
गेल्यावर्षी पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यानंतर बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्य संग्रामाची नवीन लाट उसळली. यावेळी पाकिस्तानच्या मदतीने चीन बलुचिस्तानचे शोषण करत असल्याची तक्रार आंदोलनाच्या केंद्रस्थानी होती. चीनने ‘बेल्ट रोड’ प्रकल्पाच्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली असून, त्यातील अनेक प्रकल्प बलुचिस्तानमध्ये आहेत. ग्वादर बंदरामुळे आसपासच्या लोकांना समुद्रात मासेमारी करता येत नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. तेथे सापडलेल्या नैसर्गिक वायुच्या विक्रीतून मिळणार्या महसुलाचा अवघा १२.५ टक्के वाटा बलुचिस्तानला मिळत असल्यामुळे आपल्याला लुबाडले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्या विरुद्ध विविध बलूच संघटनांनी बैठका आणि स्थानिक पातळीवर सभा घेऊन मोठ्या प्रमाणावर जागृती केली असता, पाकिस्तान सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी मुसाखेल, पिशिन, क्वेटा, सिबि, मस्तुंग, कलात, बोलान, पंजगुर, बेला, तुर्बात, संतसर आणि पासनी येथे हल्ले केले. त्यात पाकिस्तानचे १०२ सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला. बेला येथील हल्ल्यात एकाच ठिकाणी ४० सैनिकांना मारल्याचा दावा करण्यात आला. दि. २६ ऑगस्ट रोजी बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब अकबर शाहबाझ खान बुग्ती यांचा स्मृतीदिन आहे. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानी सैन्य आणि सरकारसोबत जुळवून घेणार्या बुग्तींनी जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या काळात सशस्त्र बंड केले होते. २००६ साली याचदिवशी पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या कारवाईत त्यांची हत्या करण्यात आली होती.
बलूच लोक टोळ्यांमध्ये विभागले असून, त्यात बुग्ती आणि मर्री या टोळ्या सगळ्यात मोठ्या आहेत. गेल्या सात दशकांमध्ये बलुचिस्तानमध्येही छोटी मध्यम शहरे विकसित झाली आहेत. पुढच्या पिढीतील बलूच तरुणांनी पाकिस्तान किंवा ब्रिटन आणि अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यातून नवीन नेतृत्व उदयास आले आहे. त्यांना पाकिस्तानच्या सत्तेमध्ये समान वाटा हवा आहे. आपल्या प्रांतासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार हवे आहेत. पण, त्यांना विकास प्रक्रियेत सामील न करता, पाकिस्तानने त्यांची चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने आपल्या पंजाब आणि अन्य प्रांतांतून लोक आणून बलुचिस्तानची लोकसंख्या बदलण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
यावर्षी जवळपास प्रत्येक दिवशी बलुचिस्तानमध्ये विविध संघटना आणि पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये चकमक झाली आहे. बलुचिस्तानमधील सशस्त्र टोळ्या इस्लामिक मूलतत्त्ववादी नसून फुटीरतावादी आहेत. त्यांच्यावर डाव्या-साम्यवादी चळवळीचा प्रभाव आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी त्या एकत्र आल्या असल्या, तरी श्रीलंकेतील तामिळ वाघांप्रमाणे एकत्र न लढता विकेंद्रीकृत पद्धतीने त्या लढत आहेत. बलूच टोळ्यांमध्ये आत्मघाती हल्ले करणार्या महिलांची संख्या मोठी आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आज बलूच तरुण आणि तरुणी इंटरनेट आणि समाजमाध्यमांद्वारे आपली बाजू प्रभावीपणे मांडत आहेत. एकीकडे ‘बीएलए’ आणि अन्य बलूच संघटना सशस्त्र संघर्ष करत असताना, डॉ. महरंग बलूचच्या नेतृत्वाखाली लाखो लोक शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. अवघ्या ३३ वर्षांच्या महरंग बलूचने वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. त्या लहान असताना पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या वडिलांचे अपहरण करून हत्या केली होती. कालांतराने त्यांच्या भावाचेही अपहरण केल्यानंतर त्या मैदानात उतरल्या. त्यांच्या अहिंसक आंदोलनांना मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतात.
बलुचिस्तानप्रमाणेच खैबर पख्तुनख्वा भागातही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. तिथे ‘तेहरीक-ए-तालिबान’ पाकिस्तानचे लोक मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले करत आहेत. त्यांना अफगाणिस्तानमधील तालिबानची मदत मिळत आहे. खैबर आणि बलुचिस्तानमधील मूलभूत फरक म्हणजे, बलूच जनतेचा ‘बीएलए’ आणि अन्य संघटनांना पाठिंबा आहे, तसा खैबर प्रांतामध्ये तालिबानला पाठिंबा नाही. अशा बिकट परिस्थितीतही पाकिस्तान राजकीयदृष्ट्या दुभंगलेला आहे. एप्रिल २०२२ साली पाकिस्तानच्या लष्कराने इमरान खानचे सरकार पाडल्यानंतर मे २०२३ साली भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली इमरान खान यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून इमरान तुरुंगात असले, तरी जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांत त्यांच्या पक्षावर निवडणूक लढायला बंदी घातली गेली असली, तरी पक्षाचे सदस्य अपक्ष म्हणून उभे राहिले आणि मोठ्या संख्येने विजयी झाले. लष्कर आणि शाहबाझ शरीफ यांचे सरकार त्यांच्याशी ज्या सूडबुद्धीने वागले ते लक्षात ठेवून, इमरान खान समर्थक पत्रकार आणि विचारवंत या प्रकरणात पाकिस्तानच्या सरकारच्या बदनामीत आघाडीवर आहेत.
हे घडत असताना मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईद याचा पुतण्या अबु कतलची अज्ञात बंदुकधार्यांनी हत्या केली. या हल्ल्यामध्ये हाफिज सईदही जखमी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. अबु कतलही काश्मीर खोर्यात तसेच, राजौरी आणि पूंछ या भागातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. हा हल्ल्यांनंतर पाकिस्तानमधील पत्रकार, विचारवंत, राजकीय नेते आणि निवृत्त लष्करी अधिकारी भारताला जबाबदार धरू लागले असून, पुन्हा एकदा भारताविरोधात जिहाद सक्रिय करण्याची भाषा बोलू लागले आहेत. बलुचिस्तानमधील घटनांमध्ये अमेरिकेचाही सहभाग असू शकतो, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानच्या मदतीला धावून येईल, अशी त्यांना आशा आहे. चीन धावून आला तरी पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.