अनेक वर्षे नाशिकरोड येथील संघकार्यात सक्रिय असलेल्या प्रभाकर देविदास देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले. संघकार्यात पूर्ण वेळ प्रचारक हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असते. तसेच सहस्त्रावधी गृहस्थी कार्यकर्ते हे आपली नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नियमितपणे व सतत संघकामात व्यग्र असतात. विविध जबाबदार्या सहजगत्या सांभाळतात. असे गृहस्थी कार्यकर्ते हे पुढील पिढ्यांना आदर्शवत असतात. प्रभाकर देशपांडे हे त्यांपैकी एक आदरणीय व अनुकरणीय गृहस्थी कार्यकर्ते होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
प्रभाकर देविदास देशपांडे यांचे बालपण नागपुरात गेले. शिक्षणानंतर १९५५ मध्ये त्या वेळच्या ‘मध्य प्रदेश विद्युत मंडळा’त व त्यानंतर ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा’त त्यांनी अकाऊंट ऑफिसर या वरिष्ठ पदावर नोकरी केली. अमरावती, नागपूर, अकोला, बीड अशा बदल्या होत ते नाशिकला जवळपास दोन दशके नोकरीस होते. स्वाभाविकच त्यानंतर ते नाशिकरोड परिसरात स्थायिक झाले. अकाऊंट ऑफिसर (इन्स्पेक्शन) अशी त्यांची जबाबदारी असताना त्यांचा विविध जिल्ह्यांत व्यापक प्रवास झाला. अकाऊंट्समधील विविध बारकावे त्यांना अवगत होते. मात्र, इन्स्पेक्शन करताना संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना न रागावता, ते प्रेमाने समजावून देत असत. १९९४ मध्ये ते निवृत झाले.
वयाच्या तिसर्या वर्षी १९३९ मध्ये म्हणजे डॉ. हेडगेवार असताना ते नागपूरच्या मोहितेवाडा शाखेत स्वयंसेवक झाले. पुढे नोकरीत असताना विविध ठिकाणी त्यांनी संघाच्या जबाबदारीचे निर्वहन केले. नागपूरमध्ये असताना त्यांच्या घरी ज्येष्ठ संघ प्रचारक आबाजी थत्ते, ‘राष्ट्र सेविका समिती’च्या ज्येष्ठ प्रचारिका सिंधुताई फाटक नियमितपणे येत असत. तसेच ज्येष्ठ संघ कार्यकर्ते मा. गो. वैद्य, श्रीराम जोशी, डॉ. श्री. भा. वर्णेकर, वसंतराव देवपुजारी यांचा निकटचा सहवास लाभला. १९७९ मध्ये नाशिक येथे आल्यावर भैय्याजी जोशी, गिरीश कुबेर व अन्य अनेक प्रचारक त्यांच्या घरी नियमितपणे येत असत. त्यांनी आणीबाणीच्या काळात मिसाबंदी कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे, भूमिगत असलेल्या ज्येष्ठ प्रचारक कार्यकर्त्यांना भोजन व मुक्कामाची व्यवस्था करणे असे काम सांभाळले. हे काम खूप जोखमीचे होते. परंतु, त्यांनी व कुटुंबीयांनी हे कौशल्याने केलेले आहे.
मी १९८० ते १९८२ मध्ये वैतरणा धरण येथे पाटबंधारे खात्यात नोकरीस असताना त्यांची प्रथम भेट झाली. त्या कालावधीत केव्हातरी ‘रेस्ट हाऊस’ला नाशिकहून ‘एमएसईबी ऑफिस’मध्ये इन्स्पेक्शनसाठी आलेले प्रभाकर देशपांडे यांची प्रथम भेट झाली. तत्कालीन जिल्हा प्रचारक गिरीश कुबेर हे मला ओळखत असल्याने त्यांनी माझी भेट घेण्याविषयी सूचित केलेले होते. त्या काळात प्रभाकरराव हे संघाच्या एकत्रित नाशिक जिल्ह्याच्या कार्यकारिणीत होते. त्यांना माझा संदर्भ गिरीश कुबेर यांनी दिला होता. मी नाशिक येथे बदलून आल्यावर १९८९-९० मध्ये शहराच्या संघकामाची जबाबदारी आली. पुढे नाशिकरोड प्रवासात ज्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी होत, त्यांपैकी एक प्रभाकर देशपांडे. त्यांनी नाशिक जिल्हा कार्यकारिणीत काही वर्षे काम करताना तालुक्यांमध्येही प्रवास केला. ग्रामीण तालुक्यात प्रवास करताना तेथील सामाजिक भावविश्व समजावून घेऊन काम करावे लागते. शहरी पृष्ठभूमी असूनदेखील त्यांनी संघरचनेत ग्रामीण क्षेत्राचे मोठे काम केले.
पुढे त्यांच्याकडे संघाची नाशिकरोड नगराची जबाबदारी होती. शहरातील कामाची एक वेगळी आवश्यकता असते. तुलनेने कमी वेळात अधिक शाखा भेटी व अधिक कार्यकर्ता संपर्क होऊ शकतो. तथापि शहरात मात्र जवळपास रोज तीन-चार तास काम करावेच लागते. ती जबाबदारीदेखील त्यांनी चांगली पार पाडली. भरपूर वेळ दिला. संघात बाल-किशोर-तरुण-प्रौढ वयोगटाच्या स्वयंसेवकांशी सहज संपर्क व सहज स्नेह स्थापित करावा लागतो. शाखांच्या चौकशीत त्यांना मार्गदर्शन करणे, शहराकडून आलेले विषय शाखेवर कार्यवाहीत आणणे हे त्यांनी सहजगत्या केले. संघ काम करताना कार्यकर्त्यांची वैयक्तिक शिक्षण/व्यवसाय/नोकरी तसेच कौटुंबिक जबाबदारी याबाबत सहजगत्या माहिती करून घेऊन त्यात आवश्यक तेथे मार्गदर्शनपर सूचना करावी लागते. त्यांच्या संघकामाच्या अनुभवाचा त्यासाठी चांगला उपयोग होत असे. नागपूर येथील संघकामाच्या अनुभवातून मोठे झालेले असल्याने त्यांचा संघकामाचा पीळ पक्का होता.
माझ्याकडे नाशिक शहर सहकार्यवाह-कार्यवाह जबाबदार्या कमी अनुभवात व कमी वयात आल्या. त्यावेळी असलेल्या काही नगर कार्यवाहांचा वयामुळे संघअनुभव माझ्यापेक्षा निश्चित जास्त होता. त्यात प्रभाकररावांचाही समावेश होता. तथापि, या अनुभवाचा अभिनिवेश संघबैठकीत अथवा प्रत्यक्ष भेटीत त्यांच्या वागण्यात-बोलण्यात कधीही जाणवायचा नाही. त्यामुळे शहरस्तरावर बैठकीत ठरलेल्या विषयांची कार्यवाही नाशिकरोड कार्यक्षेत्रात काटेकोरपणे व्हावी, असा त्यांचा प्रयत्न असे. ही संघशरणता सर्वांनाच अनुकरणीय आहे. बैठकीतील टिपणे तपशिलात घेण्याची त्यांची सवय होती. तसे ते शारीरिक विभागात गती असलेले कार्यकर्ते होते. कार्यवाह म्हणून पालकत्वाची भूमिका त्यांनी कौशल्याने सांभाळली.
वयोमानामुळे व मुलांचे वास्तव्य नाशिकबाहेर गेल्याने त्यांचे वास्तव्य पुणे व मुंबई येथे असे. तेथेही त्यांचा शाखेशी नित्य संपर्क असे. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आग्रह असे. श्रीगुरुजी जन्मशताब्दी वर्षात त्यांनी श्रीगुरुजी यांचे विचार १०० पोस्टकार्डवर लिहून १०० संघाबाहेरच्या व्यक्तींना पाठविले.
संघसमर्पित कुटुंब
त्यांच्या कुटुंबात संघसंस्कार त्यांनी सहजगत्या संक्रमित केले. नाशिकरोड प्रवासात त्यांच्या घरी भोजनाचा योग काही वेळा आला. त्यांच्या पत्नी सुनंदा वहिनी घरी येणार्या सर्वच कार्यकर्त्यांचे स्वागत व आदरातिथ्य करीत असत. त्यादेखील ‘राष्ट्र सेविका समिती’च्या कार्यकर्त्या होत्या. त्यांची दोन्ही मुले व मुलगी याच संस्कारांत वाढलेले आहेत. स्वाभाविकच, त्यांची विवाहित कन्या सुहासिनी रत्नपारखी या ‘राष्ट्र सेविका समिती’च्या नाशिक शहराच्या कार्यवाह म्हणून जबाबदारीचे निर्वहन करीत आहेत. तसेच सतीश व संजीव हे दोन्ही पुत्र नोकरी-व्यवसाय सांभाळून संघाची जबाबदारी सांभाळत आहेत. संजीव एक वर्ष पूर्ण वेळ प्रचारक होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर ते नाशिकमध्ये कन्येच्या घरी असताना आम्ही भेटावयास गेलो होतो. त्यावेळी त्यांचे धार्मिक ग्रंथ तसेच स्वामी विवेकानंद यांचे खंड वाचून ते वहीमध्ये लिहिण्याचा परिपाठ सुरू होता. ते उत्साहाने ती वही दाखवत होते. नव्वदीच्या घरातील त्यांचा हा उत्साह प्रसन्नचित्त लक्षणीय होता. संघकार्यात पूर्ण वेळ प्रचारक हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असते. तसेच सहस्त्रावधी गृहस्थी कार्यकर्ते हे आपली नोकरी, व्यवसाय व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नियमितपणे व सतत संघकामात व्यग्र असतात. विविध जबाबदार्या सहजगत्या सांभाळतात. असे गृहस्थी कार्यकर्ते हे पुढील पिढ्यांना आदर्शवत असतात. प्रभाकर देशपांडे हे त्यांपैकी एक आदरणीय व अनुकरणीय गृहस्थी कार्यकर्ते होते. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
बाबांनी दाखविलेल्या सन्मार्गावर चालत राहू
आई आणि बाबा त्यांच्या निष्ठेने केलेल्या दैनंदिन कामातून आम्हा भावंडांसमोर आदर्शवत राहिले. तन, मन आणि धनाने काम करणे काय असते, ते आणीबाणीच्या काळात घरातूनच आम्ही अनुभवले. आज आम्ही तिन्हीही भावंडे समिती आणि संघकार्यात जोडलेले आहोत आणि दायित्व घेऊन काम करत आहोत. हे बघून फार समाधान वाटते, असे बाबांनी बोलूनही दाखवले. त्यांनी जी वाट आम्हाला दाखवली, बोट धरून ज्या मार्गावर आमचे पाऊल ठेवले, त्या सन्मार्गावर आम्ही चालत राहू. आई आणि तीर्थरुप बाबांच्या ऋणाचे आम्ही स्मरण ठेवू.
- सुहासिनी रत्नपारखी,
प्रभाकर देशपांडे यांच्या कन्या आणि ‘राष्ट्र सेविका समिती’च्या नाशिक शहर कार्यवाहिका
तू संघ-संघ जप मंत्र निजांतरात
पुणे येथील अनेक स्वयंसेवकांची बाबांची शेवटची भेट गेल्या गणेशोत्सवामध्ये झाली. सर्वजण आवर्जून घरी दर्शनासाठी आणि बाबांना भेटायला आले होते. बाबांना स्वयंसेवक नुसते बघून पण खूप आनंद व्हायचा. गेल्या गणेशोत्सवातील भेटीत तर ते सर्वांना एकच ओळ सांगत होते. ‘तू संघ-संघ जप मंत्र निजांतरात!’ माझ्या आणि त्यांच्या शेवटच्या संभाषणातही त्यांनी मला जवळ बोलावून हेच विचारले की, आपले सर्व संघबंधु कसे आहेत. त्यांना सांग, मी व्यवस्थित आहे.
- सतीश देशपांडे (पुत्र),
औंध, पुणे
संपर्क - ९४२२२४५५८२
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य आहेत.)