अंजू उडाली भुर्र बालनाट्य लवकरच रंगभूमीवर!

19 Mar 2025 11:26:53
 
anju udali bhurr childrens play to hit the theatres soon
 
मुंबई : ‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा मुहूर्त नुकताच झाला. श्री अशोक पावसकर आणि सौ चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्य. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या साथीने ‘अंजू उडाली भुर्र’ हे एक भव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य नरेंद्र बल्लाळ लिखित हे नाटक ५५ वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालं होतं.त्या वेळी आताच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे ह्यांनी अंजूची भूमिका केली होती. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिगंबर राणे आणि स्वतः पावसकर दांपत्य ह्या नाटकात अभिनय करत असत.
 
 
प्रेरणा थिएटर्स निर्मित ‘अंजू उडाली भुर्र’ हे नाटक १९ एप्रिल रोजी रंगमंचावर येणार आहे गुरुवारी नरेंद्र बल्लाळ ह्यांची जयंती आणि ठाणे वैभव ह्या वर्तमानपत्राचा सुवर्णमहोत्सव हा योग साधून १९ एप्रिल रोजी डॉ. क्काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे याचा पहिला प्रयोग होणार आहे, त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे बालनाट्य रसिकांचे मनोरंजन करत फिरणार आहे. आता ह्या नाटकाचे पुनर्लेखन, गीत लेखन आणि दिग्दर्शन कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक, ती फुलराणी, हिमालयाची सावली, करून गेलो गाव आणि इतर अनेक नाटकांचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार आहेत.
 
 
नेपथ्य ‘अलबत्या गलबत्या’या गाजत असलेल्या नाटकाचे आणि इतर अनेक नाटकांचे नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे करत आहेत. प्रकाश योजना सुप्रसिद्ध प्रकाशयोजनकार श्याम चव्हाण तर संगीत हवा येऊ दे मध्ये आपल्या संगीताने विनोदी पंचेसना फुलवणारे तुषार देवल ह्यांचं आहे. रंगभूषा उदयराज तांगडी आणि वेशभूषा श्रद्धा माळवदे आणि पूजा देशमुख करत आहेत. ध्वनी संयोजन सुनील नार्वेकर करणार आहेत.जाहिरात संकल्पना आणि डिझाइन अक्षर शेडगे ह्यांचे आहे. जाहिरात प्रसिद्धी बी.वाय.पाध्ये पब्लिसिटी ही अनेक वर्षांपासूनची विश्वासार्ह जाहिरात एजन्सी करत असून नाटकाचे सूत्रधार नितीन नाईक आहेत.
 
 
या बालनाट्यात ९ हरहुन्नरी कलाकार असून त्यात ‘हवा येऊ दे फेम’ अंकुर वाढवे, ‘यदाकदाचित’ मधील धमाल गांधारी पूर्णिमा अहिरे, सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतून तयार झालेले गुलाब लाड, चिंतन लांबे, विजय मिरगे, प्राची रिंगे, गौरवी भोसले, प्राधीर काजरोळकर , बाबली मयेकर आणि अंजूच्या भूमिकेत नवोदित बाल अभिनेत्री स्कंदा गांधी दिसणार आहेत. संगीत नृत्य आणि चमत्कारपूर्ण नेपथ्य प्रकाश योजनेने सजलेले हे बालनाट्य फक्त बाल प्रेक्षकांच्याच नाही तर त्यांच्या पालकांच्या आणि नातेवाईकांच्या पण पसंतीस उतरेल असा विश्वास या सगळ्या चमूला आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0