मुंबई : देशातील तिसऱ्या क्रमांकाची खासगी दूरसंचार कंपनी असलेल्या वोडाफोन – आयडिया आता त्यांची ५ जी सेवा सुरु करणार आहे. बुधवारी त्याचे मुंबईत लाँचिंग होणार आहे. यामुळे दूरसंचार ग्राहकांना आता एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. फक्त २९९ रुपयांत हा अनलिमिटेड ५ जी प्लॅन उपलब्ध होणार आहेत. या ५ जी सेवेसाठी वोडाफोन - आयडिया ने नोकिया कंपनीसोबत ५ जी मोबाईल उपकरण निर्मितीसाठी करार केला आहे. यामुळे वोडाफोन – आयडीआ (वी) च्या ग्राहकांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.
वोडाफोन कंपनीकडून कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित नेटवर्क प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वोडाफोनची संपर्क क्षमता अजून सुधारण्यास मदत होईल. त्यातून कंपनीला आपले संपर्क जाळे वाढवणे उपयुक्त ठरणार आहे. वर्षभरापासून वोडाफोन कंपनी यासाठी निधी उभारण्याचे काम करत आहे. आतापर्यंत कंपनीकडून २६ हजार कोटींचा निधी उभारण्यात आला आहे. त्यातील ४ हजार कोटी हे प्रवर्तकांकडून तर बाकीचे १८ हजार फॉलो ऑन पब्लिक ऑफर मधून उभारण्यात आले आहेत. याच माध्यमातून येत्या तीन वर्षात वोडाफोन कंपनी ५५ हजार कोटींचा निधी उभारणार आहे.
वोडाफोनच्या या नवीन प्रक्रियेबद्दल प्रतिक्रिया देताना वोडाफोनचे मुख्य व्यापार अधिकारी जगबीर सिंग यांनी सांगीतले की, आमचा मुख्य हेतू हा आमची ५ जी सेवा आमच्या वापरकर्त्यांना जास्तीत जास्त उपयुक्त कशी करता येईल याकडे लक्ष देणे हा आहे. आतापर्यंत १६ मंडळांत वोडाफोन कडून ५ जी सेवा देण्याची तयारी सुरु आहे. असेही त्यांनी सांगीतले.