बुलढाणा : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामना वृत्तपत्रात वापरलेल्या एका शब्दामुळे हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात 'हिंदू तालिबान' असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्याविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. शेखर त्र्यंबक जोशी यांनी ही तक्रार दाखल केली असून या तिघांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे वाचलंत का? - नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंडचे नाव समोर! कोण आहे दंगलीला जबाबदार?
राज्यात सध्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय नागपूरमध्ये याच मुद्यावरून हिंसाचार उसळल्याची घटना घडली. अशा परिस्थितीत आपल्या मुखपत्रात हिंदू तालिबान असा शब्दप्रयोग करणे उबाठा गटाला चांगलेच महागात पडले आहे.