संघ शताब्दीनिमित्त सामाजिक सहभाग वाढविण्यावर विचारमंथन

19 Mar 2025 15:46:37

RSS AB Pratinidhi Sabha Press Conference

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS ABPS 2025)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळुरू येथे होत आहे. चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्राच्या प्रांगणात २१ ते २३ मार्च या कालावधीत ही तीन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत संघ शताब्दी वर्षात समाजाचा सहभाग कसा वाढवता येईल, यावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले. बुधवार, दि. १९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सदर बैठकीला २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात होईल. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे उपस्थितांसमोर वर्ष २०२४-२५ चा कार्यवृत्तांत मांडतील. त्यावर पुढे विवेचनात्मक चर्चा करता येईल. त्याचबरोबर संघप्रेरीत संघटनांचे इतर मुख्य पदाधिकारी प्रांत स्तरावर झालेल्या कार्यांचे निवेदन मांडतील.

संघ शताब्दी संदर्भात सांगताना सुनील आंबेकर म्हणाले की, विजयादशमी २०२५ ला संघाला १०० वर्ष पूर्ण असून '२०२५ ते २०२६' हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष म्हणून मानले जाईल. या काळात होणाऱ्या विविध कार्यक्रम, उपक्रमांबाबत बैठकीत चर्चा होईल. त्याचप्रमाणे शताब्दीवर्षात समाजातील लोकांपर्यंत संघ विचार व कार्य पोहोचवण्याबाबत विचारमंथन केले जाईल. संघ स्वयंसेवकांनी हाती घेतलेल्या कार्यात समाजाचा सहभाग कसा वाढवता येईल, याबाबत आवाहनही शताब्दी वर्षात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत एकूण दोन प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. बांगलादेशातील सध्याचा घटनाक्रम आणि त्याला धरून संघाची पुढील भूमिका काय असेल यावर चर्चा केली जाईल. तसेच संघाची शंभर वर्षाची वाटचाल आणि येणाऱ्या काळात संघाचा विचार काय व आगामी योजना काय असतील यावरही बैठकीत चर्चा होईल.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहा सहसरकार्यवाह तसेच अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ३२ संघप्रेरीत संघटनांचे मुख्य पदाधिकारी उपस्थित असतील. दि. २३ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे माध्यमांना संबोधित करतील.

'औरंगजेब' प्रासंगिक नाही
नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबाबत संघाचे मत काय आणि औरंगजेब आज प्रासंगिक आहे का? असे दोन प्रश्न एका महिला पत्रकाराने विचारले. त्यापैकी पहिल्या प्रश्नावर उत्तर देताना सुनील आंबेकर म्हणाले, कोणत्याही प्रकारची हिंसाचार समाजाच्या आरोग्यासाठी चांगला नाही, पोलिसांकडून याबाबत उचित कारवाई सुरुच आहे. ते याविषयी अधिक माहिती शोधतीलच. दुसऱ्या प्रश्नावर उत्तर देत औरंगजेब प्रासंगिक नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

Powered By Sangraha 9.0