"चित्रपटात काम करणे म्हणजे त्याआधी.." संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहा नाईकने घेतले वाणी प्रशिक्षण!

19 Mar 2025 13:49:00
 
Neha Naik took voice training for the role of Sant Muktai!
 
 
 
मुंबई : भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर जबाबदारी अधिक वाढते. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे. या चित्रपटातील संत मुक्ताईची भूमिका ती साकारणार आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
 
 
नेहा नाईक ही अभिनेत्री पुण्यामध्ये रंगभूमीवर अतिशय उत्तमरीत्या कार्यरत आहे. आता ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या एका वेगळ्या विषयावर तितक्याच ताकदीची भूमिका साकारताना नेहाने आपल्या देहबोली सोबत वाणी संस्काराचे खास प्रशिक्षण पुण्यातील ज्येष्ठ नाट्यगुरू प्रा. श्यामराव जोशी यांच्याकडे तब्बल तीन महिने घेतले. मुक्ताई यांनी आपल्या अल्पकालीन आयुष्यात जे अनुभवले आणि त्यायोगे जे भोगले त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगातून आणि काव्यातून उमटले आहे. या चित्रपटाची भाषा ही १३व्या शतकातील मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे उच्चारांमध्ये सहजता यावी यासाठी अनेक अवघड आणि कष्टप्रद अभ्यासाचे प्रकार नेहाला अभ्यासावे लागले. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे भाषेचा हा अभ्यास अत्यंत अनिवार्य होता.
 
 
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नेहा सांगते, "या चित्रपटात काम करायचं म्हणजे आधी या चित्रपटाच्या संहितेवर प्रभुत्व मिळवायला हवं. म्हणून मी त्यातल्या भाषेच्या अभ्यासावर भर दिला. प्रा. श्यामराव जोशींची शिकवण्याची पद्धत अत्यंत शिस्तशीर आणि प्रभावी असल्याने हळूहळू ती भाषा मला आत्मसात व्हायला लागली. यातील संवादांच्या अनेक दिवस तालमी चालू होत्या. भाषेबरोबरच ते शब्द उच्चारताना स्वाभाविकपणे होणारी देहबोली कशी असेल याचे दिग्पाल दादाने धडे दिले. त्याकरता माझ्या गावी जाऊन तिथल्या महिलांच्या देहबोलीचे निरीक्षण मी केले. वयाच्या आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच इतकी कस लावणारी तरीही सुंदर प्रक्रिया मला अनुभवायला मिळाली हा मी मुक्ताईचा आशीर्वादच समजते. चित्रपटात मृणाल कुलकर्णींसारख्या अनुभवी कलाकारांना काम करताना पाहताना माझे एक वेगळेच प्रशिक्षण झाले. अभिनय या बाबतीत या सिनेमाने मला नवा दृष्टिकोन दिला. म्हणून ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’हा चित्रपट माझ्यासाठी कायम हृदयाच्या जवळ असणार आहे."
 
 
कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह किंवा प्रतिमा या भावंडांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांसोबत येऊ नयेत यासाठी ऑडिशन घेऊन सुमारे दिडशे तरुणींमधून नेहाची निवड केल्याचं दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "नेहा जरी नवखी असली तरी तिने खूप मेहनत घेऊन आपली व्यक्तिरेखा चित्रपटात आत्मविश्वासाने साकारली आहे. 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटामध्ये नेहाने साकारलेल्या 'संत मुक्ताई' द्वारे आजच्या पिढीला भाऊ-बहिणीच्या नात्याची नव्याने ओळख व्हायला मदत होईल अशी मला खात्री आहे."
 
 
 
Powered By Sangraha 9.0