नऊ टक्के नागरीक काचबिंदूने त्रस्त !

19 Mar 2025 18:38:31

Glaucoma Week at Thane Civil Hospital
 
ठाणे: ( Glaucoma Week at Thane Civil Hospital ) आरोग्य तपासणी करतेवेळी अनेकजण डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करत असले तरी याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांना काचबिंदू झाल्यास प्रथम दर्शनी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र दुर्लक्ष झाल्यास कायमच अंधत्व येण्याचा धोका उद्भवतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हील रुग्णालयात नुकताच काचबिंदू सप्ताहात नऊ टक्के रुग्णांना काचबिंदूची कमी अधिक लक्षणे दिसून आली आहेत.
 
शरीराच्या नाजूक भागांपैकी एक असणाऱ्या डोळ्यांची काळजी घेणे हे सर्वांसाठी क्रमप्राप्त आहे. सुरुवातीच्या दिवसात डोळ्यांना काही त्रास असेल तर त्याचं निदान करण्यासाठी आज अत्याधुनिक यंत्रणा आहेत. मात्र, दुर्लक्ष केल्यास डोळे निकामी होण्याची दाट शक्यता असते. डोळ्यांचा काचबिंदू हा गंभीर आजार आहे. डोळ्यातील अंतस्त्राव बाहेर पडतेवेळी अडथळा निर्माण होतो. त्यानंतर पाणी आतमध्ये साठून राहिल्यावर दाब वाढतो. त्यामुळे डोळ्यांची नस खराब होते. कालांतराने डोळ्यांना कमी दिसून कायमचे अंधत्व येते, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.
 
ठाणे सिव्हील रुग्णालयात नुकताच जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी नेत्र विभागात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली २७५ व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये २३ जणांना काचबिंदूची लक्षणे आढळून आली. या सप्ताहात जिल्हा नेत्रशल्य चिकीत्सक डॉ. संगीता माकोडे, डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. शुभांगी अंबाडेकर, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. कल्पना माले, ज्योती गरड, नम्रता काशीद आदींनी अथक परिश्रम घेतले.
 
डोळ्यांचा काचबिंदू कोणालाही होऊ शकतो.काचबिंदूची लक्षणे पटकन समजून येत नाहीत. वयाच्या चाळीशी नंतर प्रत्येकाने डोळे तपासणे आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा घरात कोकणा काचबिंदू असेल तर अशा व्यक्तींना काचबिंदू होण्याची अधिक शक्यता आहे. काचबिंदूवर आता आय ड्रॉप अथवा लेझर मशिनद्वारे उपचार करता येतात.
 
- डॉ. शुभांगी अंबाडेकर (नेत्रतज्ज्ञ सिव्हील रुग्णालय)
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0