भारतातील स्टील उद्योगासाठी सरकारचे मोठे पाऊल, आयात स्टीलवर १२ टक्के कर
डीजीटीआरकडून कारवाई, शेअर बाजारात उधाण
19-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारतातील स्टील उद्योगाला सहाय्यक ठरु शकेल अशी एक बातमी समोर आली आहे. डीजीटीआर म्हणजे व्यापार उपाय महासंचालनालयाने भारतात आयात होणाऱ्या स्टीलवर १२ टक्के डंपिंगविरोधी कर लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील स्टील उद्योगाचे सर्वेक्षण डीजीटीआर कडून करण्यात आले होते त्यात त्यांना असे आढळून आले की भारतात होणाऱ्या स्टील आयातीमुळे भारतातील स्टील उत्पादनावर विपरित परिणाम होत असून त्यामुळे भारतातील स्टील उद्योगाची क्षमतेवर परिणाम होत आहे, तसेच त्यामुळे त्यांच्या नफ्यावरही परिणाम होत आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.
भारतात मिश्रधातू असलेल्या तसेच मिश्रधातू नसलेल्या स्टील शीट्सची आयात एकदम वाढल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनावर अतिशय विपरित परिणाम होत होता. या आयातीमुळे भारतीय स्टील उत्पादकांना आपली उत्पादने कमी किंमतीत विकावी लागत होती. परिणामी त्यांचे नुकसान होत होते. डीजीटीआरने हे सर्वेक्षण १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत केले होते. त्यात बाजारातील स्थितीच्या अहवालांचाही अभ्यास करण्यात आला होता. देशांतर्गत स्टील आयातीचा गंभीर फटका बसत असून त्यातून पुढे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत असे निरीक्षण डीजीटीआरने आपल्या अहवालात नोंदवले आहे.
देशांतर्गत स्टील उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन स्टील असोसिएशननेही या आयातीविरोधात आवाज उठवला होता व याबाबत कठोर पावले उचलण्याचे आवाहन डीजीटीआरकडे केले होते. जगभरातील देशांकडून आपल्या देशात होणाऱ्या स्टील आयातीविरोधात डंपिंगविरोधी कर लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
भारतात घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे भारतातील स्टील उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी ४ टक्क्यांची झेप घेतली. टाटा स्टीलच्या शेअर्सनी २ टक्क्यांची तर जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सने १ टक्क्यांची वाढ अनुभवली. एकूणच भारतीय स्टील उद्योगाने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे.